दुष्काळी जनतेच्या येरळवाडी तलावातील पाणी खाजगी उद्योजकांच्या घशात

सातारा, दि. 18 (प्रतिनिधी)- सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण-खटावच्या जनतेला पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागत आहे. दुष्काळ हा त्यांच्या पाचवीलाच पुजला आहे. असे भयानक वास्तव असताना येरळवाडी तलावातील पाणी एका खाजगी उद्योजकाच्या कारखान्याला खुलेआम दिले जात आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी राजकीय दबावाखाली जनतेच्या तोंडचे पाणी विकत असल्याची चर्चा आहे. दरम्यान आठ दिवसात येरळवाडी तलावातील पाणी उपसा बंद न केल्यास मनसेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
खटाव तालुक्‍यातील जनतेला बारमाई पाणी मिळावे यासाठी ब्रिटिश सरकाने लॉर्ड बोकील यांच्या कल्पकतेतून 1906 साली येरळवाडी तलावाच्या निर्मितीला प्रारंभ केला. आसमानी व सुलतानी अडचणीनंतर राज्यात पडलेल्या दुष्काळावेळी 1978 साली या तलावाचे काम पूर्णत्वाकडे गेले. पावसाळ्या पुर्वी हा तलाव दुथडी भरून वहात होता. पण अलीकडच्या काळात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने या तलावात पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या खटाव तालुक्‍यातील गारवडी, मांजरवाडी, मोळ, मांडवे, पाचवड, गारूडी अशा 6 गावांना व आवळेपठार गावठाण, कठरेवस्ती, पाटीलवस्ती अशा 7 वाड्यांमधील 5 हजार 223 नागरिकांना, 981 जनावरांना 6 टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. येरवाडी तलावाच्या परिसरातील अंबवडे, गोरेगाव, पिंपरी, मरडवाक, दातेवाडी, मराठानगर, चितळी, मायणी, मासुर्णे, निमसोड, होळीचेगाव, शिरसवडी, गुरसाळे, गोपूज, खरशिंगे, औंध आदी गावांना येरळावाडी तलावातून पिण्याचा पाणी योजनेद्वारे दिले जाते.
सध्या येरळवाडी तलावातील पाणी पातळी घटली आहे. तरीही खाजगी उद्योजक 25 हाऊस पॉवरच्या पंपानी पाणी उचलून खाजगी कारखान्यांना घेवून जात आहेत. त्यामुळे परिसरातील विहिरींची पाणी पातळी खोलवर गेली आहे, तर काही विहिरी आटल्या आहेत. सध्या क्षारयुक्त पाणी पिण्यामुळे लोकांचे आरोग्य बिघडले आहे. तर दुसऱ्या बाजूला महाकाय जनरेटरच्या कर्कश आवाजाने अनेकांची झोप उडाली आहे. दोन विभिन्न राजकीय पक्षाशी संबधित असणारे हे उद्योजक तलावातील पाणी पळवत आहेत. असे असतानाही पाटबंधारे विभागाचे अधिकारी आपले हात आले करून याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या तलावातील पाणी हे ऊस उत्पादित पिकासाठी न देण्याचा निर्णय झालेला आहे. तरीही काही शेतकरी दिवस-रात्र मोटारी लावून येरळवाडी तलावातील पाणी उपसा करत आहेत. शेतकऱ्यांच्या मोटारी बंद करा नंतर आम्ही आमचा जनरेटर बंद करतो असा पवित्र खाजगी उद्योजकांनी घेतल्यामुळे बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मनसे नेते धर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यासाठी या परिसरात जनजागृती मोहिम हाती घेतली असल्याचे मनसे तालुका अध्यक्ष दिंगबर शिंगाडे, वैभव सकट यांनी दिली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)