दुष्काळासाठी तातडीने उपाययोजनांची गरज

हर्षवर्धन पाटील : हर्षवर्धन पाटील यांचा दुष्काळी दौरा

रेडा- इंदापूर तालुक्‍यात सध्या गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने आवश्‍यक दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करून शेतकरी व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

इंदापूर तालुक्‍यातील बोराटवाडी, पिठेवाडी, चाकाटी, खोरोची, रेडणी येथे रविवारी (दि.5) दुष्काळी गावांचा पाहणी दौरा पाटील यांनी केला. या दौऱ्यात हर्षवर्धन पाटील यांनी बोराटवाडी येथील नीरा नदीवरील कोरड्या पडलेल्या बंधाऱ्याची पाहणी केली. तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे जळून गेलेल्या पिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोराटवाडी येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्‍यातील नीरा नदीकाठची गावे, नीरा डावा कालवा कार्यक्षेत्रातील 22 गावे, खडकवासला कॅनॉल कार्यक्षेत्रातील गावे तसेच शेटफळ तलाव लाभक्षेत्रातील 9 ते 10 गावांमध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती गंभीर झाली आहे. उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. नीरा नदीकाठच्या गावांमधील पिके व फळबागा जळून गेल्या आहेत. जळून गेलेल्या पिकांचे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, शेतमजुरांसाठी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, बारोटवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू करावेत, चारा टंचाईमुळे चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू तातडीने सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

पाटील म्हणाले की, आम्ही सत्तेवर असताना 20 वर्षे इंदापूर तालुक्‍यातील शेतीला वेळेवर पाणी मिळत होते. मात्र, गेल्या काही वर्षांत नियोजनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांचे पाण्याअभावी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या नीरा नदीवरील बंधारे कोरडे पडलेले आहेत. या सर्व बंधाऱ्यांचे नादुरुस्त ढापे बदलणे, बंधारे वेळेवर अडविताना गळती थांबविण्यासाठी जलसंपदाशी बोलून मार्ग काढला जाईल. नीरा-भीमा स्थिरीकरण योजनेत नीरा नदीवरील सर्व बंधाऱ्यांत वर्षभर पाणी राहिल, अशी कायदेशीर तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली.
याप्रसंगी इंदापूर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष ऍड. कृष्णाजी यादव, नीरा भीमा कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, संचालक विकास पाटील, अजिनाथ बोराडे, विश्‍वासराव काळकुटे, भीमराव काळे, मारुती गायकवाड, दत्तू सवासे, कृष्णा बोराडे, दयानंद गायकवाड, लक्ष्मण खाडे, राहुल कांबळे, लालासाहेब हेगडकर, रघुनाथ सवासे, शिवाजी इंगवले, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.