दु:ख कमी करण्याची किमया हास्यांमध्ये आहे – प्रा. मिलिंद जोशी

लोणावळा – हल्लीच्या जगातील दुःखे नाहीसे करता येत नाही, मात्र ती हलकी करण्याची किमया हास्यांमध्ये आहे. हास्य हे जीवनाचे संगीत असून, त्याच्यात जीवन सुरेल करण्याची ताकद आहे. संयुक्‍त महाराष्ट्राच्या चळवळीत विनोदाचे मोठे योगदान आहे. या काळात विनोदाने केवळ रंजनच केले नाही, तर समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम केले आहे. हसण्यातच माणसाचे खरे सौंदर्य आहे. परंतु सध्या ते सौंदर्य आपण विसरत चाललो आहे. त्यासाठी प्रत्येकाने हास्य आणि विनोदाकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा, असे मत प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्‍त केले.

लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमाला समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 16 व्या वसंत व्याख्यानमालेत पाचवे पुष्प गुंफताना ते “जीवनात विनोदाचे महत्व’, या विषयावर ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर, ऍड. माधवराव भोंडे, व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष पत्रकार प्रशांत पुराणिक, उपाध्यक्ष संजय वाड, सचिव बापू पाटील हे उपस्थित होते.

या वेळी मार्गदर्शन करताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, जीवनाची व्याख्या प्रत्येकाने वेगवेगळी केली आहे. जन्म आणि मृत्यू, उत्पती आणि विनाश या नियतीच्या गोष्टी कोणालाही चुकल्या नाहीत. मात्र या दोघांच्या मधलं जगणं हे अधिक सुंदर कसे करता येईल, याचा विचार करायला हवा. जो देह आणि जे जीवन आपल्याला मिळाले आहे. ते आपल्याला निश्‍चितच सुंदर करता येईल. ते कसे सुंदर करता येईल, याचा विचार आपल्या संस्कृतीने मांडला आहे. तो ज्ञान, प्रेम, कर्म व त्याग या मूल्यांमध्ये आहे.

प्रेम हे कुठल्याही जगाच्या संस्कृतीची सर्वोच्च भावना आहे, असे सांगत जोशी पुढे म्हणाले की, सध्या जीवनातील स्वाभाविकता आपण विसरत व हरवत चाललो आहे. ताण, तणाव आणि नैराश्‍य नाहीसे करण्यासाठी परमेश्‍वराने निवडलेला उत्तम योग म्हणजे हास्य योग होय. जीवनात हास्य असलेच पाहिजे, परंतु जीवनाचे हसू होता कामा नये. आपण जसा देवाला नैवद्य दाखवितो, तसा हास्य हा आत्म्याचा नैवद्य आहे. प्रत्येकाने आपला चेहरा नेहमी हसरा ठेवला पाहिजे. सर्व औषधांपेक्षा हास्य सर्वश्रेष्ठ आहे. सध्या साधेपणातील सौंदर्य हरविले असून, दिखावूपणाला महत्व प्राप्त झाले आहे. आज आपण जीवनातील समग्रता हरवत चाललो आहे. मतभेदाचे रूपांतर मनभेदात करून नये. जर मतभेदाचे रूपांतर मनभेदात झाल्यास जीवनातील हास्य लोप होवून, नैराश्‍य व ताण तणावाचे गडद काळोख निर्माण होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री पाटील यांनी केले. आनंद गावडे यांनी मानले आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)