दीपिका, जोश्‍ना व सौरव यांना कांस्यपदक

 सांघिक स्क्‍वॅशमध्ये सुवर्णाचे लक्ष्य 
जकार्ता – दीपिका पल्लीकल-कार्तिक आणि जोश्‍ना चिनाप्पा या भारतीय खेळाडूंना महिलांच्या एकेरी स्क्‍वॅशमधील, तसेच सौरव घोषालला पुरुष एकेरी स्क्‍वॅशच्या उपान्त्य फेरीत पराभव पत्करावा लागल्यामुळे या तिघांनाही कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. दीपिकाचे आशियाई क्रीडास्पर्धेतील हे सलग दुसरे कांस्यपदक ठरले. याआधी इंचेऑन-2014 आशियाई स्पर्धेतही दीपिकाने कांस्यपदकच मिळविले होते.

मलेशियाच्या निकोल डेव्हिडने उपान्त्य फेरीच्या लढतीत दीपिकाचे आव्हान दोन्ही गेममध्ये पिछाडीवरून मोडून काढताना अंतिम फेरीत धडक मारली. वास्तविक पाहता दीपिकाने निकोलविरुद्ध पहिल्या दोन्ही गेममध्ये 5-2 आणि 4-1 अशी आघाडी घेतली होती. परंतु चार वेळच्या माजी विजेत्या निकोलने आपला अनुभव पणाला लावताना दीपिकाचे आव्हान 11-7, 11-9, 11-6 असे मोडून काढले. तसेच जोश्‍नाला मलेशियाच्या शिवसंगारी सुब्रह्मण्यमकडून 10-12, 6-11, 11-9, 7-11 असा पराभव पत्करावा लागला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत अग्रमानांकित सौरव घोषालला हॉंगकॉंग चीनच्या चुंग मिंग आऊ याच्याविरुद्ध दोन गेमच्या आघाडीनंतरही पराभव पत्करावा लागला. चुंग मिंगने आपल्यापेक्षा सरस मानांकित असलेल्या सौरवला 10-12, 11-13, 11-6, 11-6, 11-6 असे पराभूत करताना अंतिम फेरीत धडक मारली. स्क्‍वॅशमध्ये कांस्यपदकाची लढत नसल्यामुळे उपान्त्य फेरीत पराभूत झालेल्या सर्वांना कांस्यपदक देण्यात आले.

विश्‍वक्रमवारीतील माजी अग्रमानांकित निकोल डेव्हिडविरुद्ध कधीही खेळणे खूपच आव्हानात्मक असते, असे सांगून दीपिका म्हणाली की, अफाट अनुभवामुळे कोणत्याही परिस्थितीत सामन्याचे पारडे फिरविण्याची तिची क्षमता आहे. ती सलग 10 वर्षे जगातील अव्वल खेळाडू होती ती उगाचच नव्हे. तिला मी कडवी झुंज दिली, यातच मला समाधान वाटते. किंबहुना उपान्त्य फेरीपूर्वीच निकोलशी खेळावे लागणे दुर्दैवी आहे. परंतु तिच्यासारख्या उच्च दर्जाच्या खेळाडूविरुद्ध पराभूत होणे ही नामुष्की नाही.

पंचांचे काही निर्णय विरुद्ध गेल्यामुळे दीपिकाला सामना गमवावा लागल्याचे दिसून आले. परंतु अशा गोष्टी घडतातच, असे सांगून दीपिका म्हणाली की, निकोल दीर्घकाळपासून आशियाई स्तरावर वर्चस्व गाजवीत आहे. या पराभवातून बहुमोल धडा घेऊन मला भविष्याकडे पाहिले पाहिजे. मी केवळ 26 वर्षांची आहे आणि आणखी किमान दोन-तीन आशियाई स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकेन. निकोल 35 वर्षांची असून ती जगातील सर्वाधिक तंदुरुस्त खेळाडूंपैकी एक आहे. अखेर स्क्‍वॅश म्हणजे तंदुरुस्ती हेच समीकरण आहे. सध्या तिला जिंकू द्या, पण भविष्यकाळ माझा आहे.

निकोलविरुद्धचा पराभव विसरून महिलांच्या सांघिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्‍यक असल्याचे सांगून दीपिका म्हणाली की, एखाद्या पराभवानंतर पुन्हा जुळवाजुळव करून पुनरागमन करणे सोपे नसतेच. परंतु आम्हाला ते केलेच पाहिजे, कारण आमच्यासमोर खूपच मोठे लक्ष्य आहे. गेल्या इंचेऑन आशियाई स्पर्धेत भारतीय महिलांनी सांघिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. त्यापेक्षा सरस कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

भारतीय स्क्‍वॅश संघाने अनेक दिवसांपासून प्रशिक्षकांविनाच सराव केला. त्यानंतर संघटनेने सायरस पोंचा आणि भुवनेश्‍वरी कुमारी यांना प्रशिक्षक म्हणून पाठविले. परंतु भारतीय संघातील खेळाडू एकमेकांकडून शिकणे किंवा मार्गदर्शन घेणेच अधिक पसंत करतात, असे सांगून दीपिका म्हणाली की, खेळाडू परस्परांशी मोकळेपणाने संवाद साधू शकतात. खेळाडूंनी कोणतीही जाहिरात न करता हा निर्णय घेतला आहे असे म्हणता येऊ शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)