दीपक मानकर यांना घरगुती जेवण, औषधे देण्यास न्यायालयाची परवानगी

पुणे – मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेले माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांना घरचे जेवण आणि राव नरसिंग होमने लिहून दिलेल्या पित्ताशयाच्या आजारासाठी, मधुमेह आणि हायपरटेन्शनसाठीची औषधे उपलब्ध करून देण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. विशेष न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी हा अर्ज मंजुर केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी मानकर यांना मोक्काअंतर्गत अटक करण्यात आली होती. ते सध्या येरवडा कारागृहात आहेत. मानकर यांच्याकडे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या जगताप यांनी 2 जूनला घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी जितेंद्र जगताप यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये दीपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हंटले होते. त्यानुसार मानकर यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील सात जणांना अटक करण्यात आली होती. राव नर्सिंग होम यांनी कोलायटीस, डायबेटीस नियंत्रण आणि हायपर टेन्शनच्या आजारासाठी घरगुती जेवण सेवण करण्याचा सल्ला दिलेला आहे. त्यानुसार मानकर यांनी घरगुती जेवण आणि सांगितलेली औषधे कारागृहात उपलब्ध करून देण्यासाठी ऍड. सुधीर शहा आणि ऍड. पुष्कर दुर्गे यांनी अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने मंजुर केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)