दिव्यांगाने व्हीलचेरअवरुन फोडली मोबाइल शॉपी

दिला महिनाभर गुंगारा : समर्थ पोलिसांनी चिकाटीने तपास करत केले जेरबंद

प्रभात वृत्तसेवा
पुणे,दि.7- घरफोडी करणाऱ्या दिव्यांग व्यक्‍तीने पोलिसांना तब्बल महिनाभर गुंगारा दिला. मात्र, समर्थ पोलिसांनी चिकाटीने तब्बल दोन राज्यांत तपास करत आरोपीला जेरबंद केले. इतकेच नव्हे, तर त्याने घरासमोरील लाकूडफाट्यात लपवून ठेवलेले 11 मोबाइल संच आणि रोख 26 हजार 700 रुपये असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला.
विजयभाई मशरुभाई जिलीया (20, रा. नवसारी, गुजरात) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो दोन्ही पायाने अपंग असून व्हीलचेअरवरुन वावरतो. याप्रकरणी मुश्‍ताक शमशुद्दीन मोमीन (40, रा. बालाजीदर्शन, कात्रज) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी यांचे रास्तापेठ पॉवर हाऊस चौकात मोबाइलचे दुकान आहे. ते दि.30 ऑक्‍टोबर रोजी पहाटे आरोपीने फोडले. त्यातून 13 मोबाइल फोन आणि रोख रक्कम असा 1 लाख 41 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरला. फिर्यादी यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे यांच्याकडे तपास सोपवण्यात आला. कापुरे यांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांना दोन्ही पायाने दिव्यांग व्यक्ती चोरी करताना दिसला. तेथून तो पुणे स्टेशन येथे गेलेला दिसला. तेथील चित्रीकरणाआधारे तो मुंबई गेल्याचे समजले. पथक मुंबईला गेल्यावर तो सीएसएमटी येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळला. मात्र, तेथून बाहेर पडल्यावर तो कोठे गेला याचा माग लागत नव्हता.
पोलिसांनी तब्बल तीन दिवस मुक्कम ठोकून शोधले असता, एका प्रार्थनास्थळाजवळ बसलेल्या फिरस्त्यांनी तो “येथे दोन दिवस भीक मागत होता,’ असे सांगितले. त्याने बोलताना “अहमदाबादला गाडी कधी असते’ याची विचारणा केल्याचेही सांगितले. यामुळे तो गुजरातला गेल्याची खात्री पटली. पोलिसांचे पथक रवाना झाले. मात्र, तो कोणत्या शहरात उतरला असेल, हा मोठा प्रश्‍न होता. दरम्यान, माग काढत पोलीस नवसारी येथे पोहचले. तेथे त्यांना आरोपी हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या कारखान्यात बिगारी कामगार असल्याचे समजले. त्याला तब्बल 12 हजार रु. पगारही मिळत आहे. आरोपी तेथे चोरीच्या पैशांतून जुनी दुचाकी घेण्याचा प्रयत्न करत होता. यामुळे त्याचा नवसारी पोलिसांच्या मदतीने तपास सुरुवात केली. तो एका जागेत ओढ्याच्या काठी बांधलेल्या झोपडीवजा घरात सापडला. त्याला चोरीचे सीसीटीव्ही फुटेज दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. त्याने घरासमोरील लाकडांखाली चोरीचा मुद्देमाल आणि रोकड ठेवली होती. ती हस्तगत करण्यात आली. यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस उपायुक्त प्रदीप आफळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, हवालदार सुशील लोणकर, संतोष काळे, राजस शेख, प्रमोद टिळेकर, पोलीस शिपाई गणेश कोळी, नीलेश साबळे, सुमीत खुट्टे, साहिल शेख, अनिल शिंदे, सचिन पवार, स्वप्निल वाघोले यांच्या पथकाने केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)