दिवे घाटातील सेल्फी बहाद्दरांना आवरा

  • क्रेझ जीवावर बेतण्याची शक्‍यता : प्रशासनाचे कोणतेही सूचना फलक नाही
    एन.आर.जगताप

सासवड – पावसाळा सुरू झाला की पुरंदर तालुक्‍यातील दिवे, बापदेव घाटांमध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असते. मात्र, हे पर्यटक बेफामपणे या घाटात वावरतात आहेत. त्यातच प्रत्येकाला “सेल्फी’ची “क्रेझ’ असल्याने प्रत्येकजण जीवघेण्या “सेल्फी’ काढण्यात मग्न आहे. जर या “सेल्फी’च्या नादात कोणाचा जीव गेला तर परत प्रशासनाला “टोमणे’मारणाऱ्यांचे तुंतुणे सुरू होईल, त्यामुळे घाटात सेल्फी काढणाऱ्या बहाद्दरांना आवरा म्हणण्याची वेळ आली आहे.
प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. दिवेघाटात हे प्रकार रोजच घडत आहे. सेफ्ली काढणाऱ्यांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे महिला आणि लहान मुलांना एखादी दुर्घटना घडून गंभीर दुखापत होण्याची दाट शक्‍यता आहे. घाटात वनविभाग आणि पोलीस प्रशासनाचे कोणतेही सूचना फलक नाही तसेच वनविभाग आणि पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दिवेघाटात महामार्गावरतीच वाहने उभे करून डोंगर कड्यांच्या तिथे उभे राहून व घाटाच्या अगदीकडेला धोकादायक स्थितीत उभे राहून “सेल्फी’ काढण्याचे प्रकार वाढत आहे. यामुळे वाहनचालकांनाही वाहन चालवताना अडचणी निर्माण होत असून या ठिकाणी बऱ्याचवेळा वाहतूककोंडीही होत आहे. पावसाळ्यामध्ये रिमझिम पाऊस चालू असल्यामुळे खडकांवर डोंगर कड्यांवरती शेवाळ वाढलेली असते त्यामुळे या निसरड्या खडकांवर उभे राहणे धोकादायक असते; मात्र सेफ्लिच्या नादात अनेक तरुण-तरुणी अशाप्रकारे जीवघेण्या सेल्फी काढत असून निसरड्या खडकांवरून पडून अनेक सेल्फी बहाद्दर जखमी झालेले आहेत.

मद्यपिंचा धिंगाणा
दिवे घाट आणि बापदेव घाटात तळीरामांनीही उच्छाद मांडलेला आहे. घाटात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या मद्यपींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. घाटमाथ्यावर बसून दारू पिण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून हे तळीराम याठिकाणी मद्यधुंद अवस्थेत “सेल्फी’ काढण्याचे धाडस करतात व यातून अनेक दुर्घटना ही घडलेल्या आहेत . घाटमाथ्यावरती तळीरामांनी दारू पिल्यानंतर दारूच्या बाटल्या तेथेच फोडतात व यामुळे घाटमाथ्यावर ती काचांचा खच पडलेला आहे.

आभासी दुनियेतून बाहेर पडा…
सध्या प्रत्येकावरच सोशल मीडियाने गारुड घातले आहे. तरी नागरिकांनी सोशल मीडियाच्या आभासी जगाच्या आहारी न जाता कुठलेही जीवघेणे धाडस करणे टाळावे केवळ फोटोच्या काही लाईक्‍स वाढविण्यासाठी आपला जीव धोक्‍यात घालणे कितपत योग्य आहे याचाही सारासार विचार करणे गरजेचे आहे.
 घाटात अनधिकृतपणे दुकाने थाटले
दिवेघाटातील तीव्र वळणांवरती पर्यटक व वाहनचालक वाहने उभी करतात व या ठिकाणी “सेल्फी’ काढण्याच्या अट्टाहासपाई महामार्गावरतीच उभे केलेल्या वाहनांमुळे वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. रस्त्याच्या मधोमध उभे केलेल्या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. दिवेघाटात अनधिकृतपणे अतिक्रमण करून दुकाने थाटलेली आहेत. या अतिक्रमण केलेल्या दुकानांभोवती गिऱ्हाईकांची मोठी गर्दी असते, यात ग्राहकांची वाहने महामार्गावरती घाटात तीव्र वळणावरती उभी असतात यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे; मात्र पोलीस प्रशासन व वन विभाग मात्र हातावर हात ठेवून या गंभीर समस्येकडे कानाडोळा करीत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)