दिवस होता म्हणून…रात्र असती तर

रडक्‍या स्वरात तुळसाबाईंनी सांगितली हकीकत : समजण्याच्या आतच होयाचं नव्हतं

पुणे : सकाळी साडेअकरा वाजले होते. घरातील मंडळी कामावर गेल्याने मी एकटीच होते. मात्र, अचानक घरासमोरून पाण्याचा मोठा लोंढा आला, काही समजायच्या आतच घरात गुडघ्यापर्यंत पाणी घुसले. म्हणून आहे, तसं सगळं सोडून शेजारच्या उंचावरील घरात गेले, मग तिंथही पाणी घुसले… काय कराव काही समजण्याच्या आतच होत्याचं नव्हतं झाल. पण हा प्रकार दिवसा घडला, रात्र असती तर आम्ही काय केलं असतं, हे सांगताना 60 वर्षांच्या तुळसाबाई गायकवाड यांना रडूच कोसळल. कारण मुलीसह राहणाऱ्या तुळसाबाईंच्या घरात घुसलेल्या पाण्याने त्यांचा सगळा संसार उध्द्वस्त केला होता. ही माहिती तुळसाबाईंनी आपल्या कामावर गेलेल्या मुलीला कळविली. त्यानंतर त्यांची मुलगी घरी आली, मात्र, हे सारे पाहून तिला तापच भरल्याचे सांगताना, त्यांना अश्रू अनावर झाले.’ मात्र, तुळसाबाईंनी व्यक्त केलेली ही भीती दांडेकर पुलावरील स.नं. 130 आणि 133 मधील प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर होती. मुठा कालवा फुटल्याने दांडेकरपुल वसाहतीमधील जवळपास 500 हून अधिक घरांमध्ये पाणी घुसले. त्यामुळे रोज पोट भरण्यासाठी दिवसभर घराबाहेर राहून कष्ट करणाऱ्या अनेकांना आयुष्यभराची कमाई या दुर्घटनेत गमवावी लागली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ज्या ठिकाणी कालव्याला भगदाड पडले, त्या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून पाणी गळती होती. त्यानंतर महापालिकेनेही त्या ठिकाणी 2200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकलेली होती. तसेच काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी केबल टाकण्याचे काम सुरू होते. ही केबल अक्षरश: कालव्याची भिंत खोदून टाकण्यात आली आहे. त्यामुळे कालव्याची भिंत खचण्यास सुरुवात झाली होती. त्याची कल्पना महापालिका तसेच पाटबंधारे विभागासही होती. मात्र, त्यानंतरही जुलै महिन्यापासून सुमारे 1326 क्‍यूसेक पाण्याची क्षमता असतानाही कालव्यातून प्रत्यक्षात 1277 क्‍यूसेकने पाणी सोडणे सुरूच होते. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.

नागरिकांना पत्र्यावरून काढले बाहेर
दांडेकर पूल वसताहीमध्ये ज्या ज्या ठिकाणी पाणी घुसले त्या ठिकाणी प्रामुख्याने कष्टकरी कुटुंबे राहातात. त्यामुळे बहुतांश घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच महिला होत्या. सकाळची वेळ असल्याने जवळपास प्रत्येक घरात दुपारच्या जेवणासाठी तयारीची लगबग सुरू होती. तर अनेक घरांमध्ये मुलांना दुपारच्या शाळेसाठी पाठविण्याची तयारी सुरू होती. सुरुवातीला वस्तीत पाणी घुसल्यानंतर काही लोकांनी आरडाओरड सुरू केली. मात्र, अनेक नागरिकांना काहीतरी घडले असेल असे वाटले आणि ते घरासमोर आले. तेवढ्यात अचानक पाण्याचा प्रवाह थेट घरात घुसला त्यामुळे घरातील महिला तसेच मुलांची चांगलीच तारांबळ उडाली; तर अनेक घरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक घरात एक आजारी व्यक्ती होती. त्यामुळे घरातून बाहेर पडल्यास वाहून जाण्याच्या भीतीने अनेकजण घरातच देवाचा धावा करत होते. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या भागातील युवकांनी थेट घराच्या छताचा आधार घेतला. या ठिकाणी असलेली घरे एकमेकांना जोडून असल्याने, युवकांनी जागा मिळेल तिथून या महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना छतावर घेऊन सुरक्षीत स्थळी हलविले.

दोरीच्या साह्याने काढले बाहेर
घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या दहा गाड्या तातडीने दांडेकर पुलाकडे रवाना करण्यात आल्या. त्यांच्याकडून तातडीने दोरी तसेच इतर साहित्य घेऊन पाणी घुसलेल्या ठिकाणी मदतकार्य सुरू करण्यात आले. यावेळी या कर्मचाऱ्यांनी घरातच थांबलेल्या महिला तसेच लहान मुलांना दोरीच्या साह्याने बाहेर काढले. मात्र, अग्निशमनदलाने मोठी भूमिका बजाविली ती म्हणजे, प्रत्येक घरातील गॅस सिलिंडर बंद करून ते बाहेर काढण्याचे काम हाती घेतले. त्यामुळे घरात घुसलेल्या पाण्याने आणि पाण्याच्या प्रवाहामुळे नागरिकांनी तातडीने घरबाहेर काढलेले शेकडो सिलेंडर पाण्याच्या प्रवाहासोबत आंबील ओढ्यात वाहत गेले होते. हे सिलिंडर नंतर थेट मुठा नदीत जाऊन पोहोचले. त्यामुळे अग्निशमन दलाकडून वैकूंठ स्मशानभूमी ते नव्या पुलापर्यंत सिलेंडर शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)