दिवसभरात तीन ऋतू उकाडा, पाऊस अन गारठा…

पिंपरी- सप्टेंबर महिन्यामध्ये “ऑक्‍टोंबर हीट’ची अनुभूती घडवणाऱ्या वातावरणात पुन्हा बदल पहावयास मिळत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून शहरात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतुंचा अनुभव दिवसभरात मिळत आहे. शनिवारी देखील दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार पाऊस पडला. त्यानंतर वातावरणात गारठा जाणवू लागला होता.

गेल्या तीन दिवसांपासून दिवसभर उकाडा जाणवत असून सायंकाळच्या वेळी पाऊस पडत आहे. पुणे वेधशाळेने शनिवारी सकाळी नोंदवलेल्या तापमानानुसार कमाल तापमान 33 अंश सेल्सियसच्या पुढे गेले होते, तर किमान तापमान 21च्या खाली येऊ शकले नव्हते. परंतु आद्रतेचे प्रमाण तब्बल 85 टक्‍के इतके होते. वेधशाळेने व्यक्‍त केलेल्या अंदाजानुसार पुढील संपूर्ण आठवडा हा उकाड्याचा असणार आहे. 5 ऑक्‍टोंबरपर्यंत पारा 32 अंश सेल्सियसच्या पुढे जाणार आहे आणि आकाश अंशतः ढगाळ असण्याची शक्‍यता आहे. याचाच अर्थ की पुढील संपूर्ण आठवडा हा उष्णता आणि उकाडा नागरिकांना त्रास देणारा ठरणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मॉन्सूनचा परतीचा प्रवास
स्कायमेट वेदर या खासगी हवामान संस्थेने वर्तवलेल्या निरीक्षणानुसार दक्षिण पश्‍चिम मानसून 2018 ने 29 सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास सुरू केला आहे. यावर्षी “डे’ या चक्रावातामुळे मॉन्सून लांबला असून परतीचा प्रवास काहीसा उशिरा सुरू झाला आहे. मॉन्सूनने राजस्थान आणि गुजरातच्या कच्छ क्षेत्रातून परत फिरण्यास सुरुवात केली आहे. परतीची प्रक्रिया यंदा वेगाने पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. एक आठवड्याच्या आत मॉन्सून उत्तर-पश्‍चिम भारताच्या बहुतेक भागांमधून परतेल. यामुळे पुढील काही दिवस परतीच्या पावसाच्या हलक्‍या सरी अनुभवयास मिळतील.

सायंकाळी धुके
मॉन्सून आता परतीच्या वाटेवर असण्याची चिन्हे दिसू लागली आहे. दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळी पाऊस पडून गेल्यानंतर धुके दिसू लागले होते. शहरातील कित्येक ठिकाणी हलके धुके असल्याची जाणीव डोळ्यांना होत होती. तसेच हवेतील गारठा आद्रता वाढल्याचे भासवून देत होता. एरव्ही पहाटे किंवा सकाळी धुके पडते. परंतु सायंकाळी धुक्‍यासारखे वातावरण दिसू लागल्यास ही पावसाळा संपत आल्याची चिन्हे असल्याचे काही लोकांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)