#दिल्ली वार्ता: सरकारच्या मानगुटीवर बसलंय राफेलचं भूत   

वंदना बर्वे 
राफेल जेटच्या खरेदी व्यवहारात खरंच भ्रष्टाचार झाला की नाही, हा एक वेगळा मुद्दा आहे. मात्र, या प्रकरणात फ्रान्स सरकारचं भारत सरकारच्या मदतीला वारंवार धावून येणं संशय वाढविणारं आहे. एक मात्र नक्‍की, निवडणुकीच्या तोंडावर राफेलचं भूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या मानगुटीवर बसलं आहे…! 
फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांच्या गौप्यस्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. “राफेल जेट’ खरेदी व्यवहाराच्यावेळी भारत सरकारनेच “रिलायन्स डिफेन्स’चे नाव भागीदार म्हणून सुचविलं होतं. यानंतर फ्रान्स सरकारसमोर कोणताही पर्याय उरला नव्हता, असा गौप्यस्फोट ओलांद यांनी नुकताच केला. ओलांद यांनी असं करून तेलाच्या उकळत्या कढईत पाणी शिंपडण्याचे काम केले आहे.
ओलांद यांच्या विधानानंतर अंगात बारा हत्तीचे बळ संचारलेला कॉंग्रेस पक्ष खूप आक्रमक झाला आहे. राफेल जेटची किंमत आणि “हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स’ला डावलून अनिल अंबानी यांच्या “रिलायन्स डिफेन्स’ला भागीदार म्हणून घेण्याच्या मुद्द्यावर कॉंग्रेसने आक्रमक रूप धारण केले आहे.
ओलांद यांच्या दाव्यानंतर फ्रान्स सरकार लगेच समोर आली. राफेल विमान बनवणाऱ्या “दसॉल्ट एव्हिएशन’ या कंपनीने या कराराचे निकष पूर्ण करण्यासाठी “रिलायन्स डिफेन्स’ला आपला भागीदार निवडलं आहे. कॉंग्रेस पक्षाचा आरोप आहे की, केंद्र सरकारने अंबानी यांच्या कंपनीला लाभ व्हावा म्हणून “हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स’च्या जागी अंबानींच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्‍ट मिळवून दिलं.
ओलांद यांच्या आरोपांचा हवाला देत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. गांधी म्हणाले, “पंतप्रधानांनी वैयक्‍तिकपणे बंद खोलीत चर्चा करून हा करार बदलला. दिवाळखोरीत असलेल्या अनिल अंबानी यांना त्यांनीच डील देऊ केली. पंतप्रधानांनी भारताला धोका दिला असून हा सैन्यांच्या रक्‍ताचा अपमान आहे.’
कॉंग्रेसचे प्रवक्‍ते रणदीप सुरजेवाला यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. “मोदी असत्याच्या मागे लपले आहेत. ते स्वतः खोटं बोलत आहेत आणि संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, कायदा मंत्री यांनाही खोटं बोलायला लावलं जात आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या मित्राला हा व्यवहार देऊ केला, हे आता उघड झालं आहे,’ असं सुरजेवाला म्हणाले.
“राफेल जेट’ प्रकरण सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. “सरकार जेटची किंमत सांगणार’, असं आधी सांगण्यात आलं. नंतर गोपनीयतेचा आधार घेत “किंमत सांगितली जाणार नाही,’ असं स्पष्ट करण्यात आलं.
मात्र, राफेलच्या मुद्द्यावरून भारतात जेव्हा जेव्हा वाद निर्माण झाला, फ्रान्स सरकार भारत सरकारच्या मदतीला वारंवार धावून आलं आहे. फ्रान्स सरकारकडून अनेकदा खुलासा केला गेला. अंबानी यांच्या कंपनीनेसुद्धा एकदा खुलासा केला होता. यानंतर, कॉंग्रेसचे नेते आणि मीडियाला नोटीसही पाठविण्यात आली. हे प्रकरण भारत सरकार, विरोधी पक्ष आणि भारतातील कंपन्यांशी संबधित आहे. असं असताना फ्रान्स सरकारकडून जेट खरेदी व्यवहाराच्या बाबतीत वारंवार वक्‍तव्य का जारी केले जातात?
यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारची तुलना होऊ लागली आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारप्रती लोकांच्या मनात निर्माण झालेला राग हा भ्रष्टाचार आणि सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांमुळे झाला होता.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या आग्रहाखातर भारत सरकारने चर्चा करण्याची तयार दर्शविली. मात्र, पाकिस्तानने पुन्हा पाठीत खंजीर खुपसला. काश्‍मिरातील तीन पोलिसांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या केली. यापूर्वीसुद्धा हा प्रकार घडला होता. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी लान्स नायक हेमराज यांचे शीर कापले होते. मुंबईवरील 26/11 चा हल्ला, पठाणकोटच्या हवाई तळावर हल्ला आणि सीमेवर रोज शहीद होणारे जवान. डॉ. मनमोहन सिंग यांचं सरकार एकदा आरपारची लढाई का करीत नाही? असा प्रश्‍न लोकांच्या मनात निर्माण झाला होता. आता हाच प्रश्‍न मोदी सरकारप्रती निर्माण झाला आहे.
मोदींच्या काळातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. बॅंकांना हजारो कोटींचा चुना लावणारे मद्यसम्राट विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चौक्‍सी फरार झाले आहेत. यामुळे जनता कमी-जास्त प्रमाणात केंद्र सरकारवर नाराज आहे. मात्र, सर्वाधिक नाराजी आहे ती नोटबंदी केल्यामुळे.
मोदी सरकारच्या एखाद्या कार्याने सव्वाशे कोटी भारतीय सुखावले असतील तर ते म्हणजे “सर्जिकल स्ट्राईक’. या एका कारवाईने प्रत्येक भारतीयाला मिशीवर ताव मारण्याची संधी दिली. मोदी यांनी “सर्जिकल स्ट्राईक’च्या संधीचं सोनं केलं. “मिलिट्री ऑपरेशन’चे तत्कालीन महासंचालक लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी सरकारच्या सांगण्यावरून देशवासीयांना ही माहिती दिली. याचा फायदा आता सरकारला होत आहे.
मोदी यांचे सरकार आता “राफेल जेट’च्या किमतीवरून विरोधकांच्या चक्रव्युहात सापडले आहे. अशातच, वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल वीरेंद्र सिंग धनोआ यांनी “राफेल जेट’मुळे सेनेची शक्‍ती वाढणार असल्याचे सांगितले. सरकार सगळे काही बोलायला तयार आहे. पण किमतीवर बोलायला तयार नाही.
विजय मल्ल्या यांच्या फरारीप्रकरणी दररोज नवा खुलासा होत आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांना सगळं काही माहीत होतं. किंबहुना, लंडनकडे निघण्यापूर्वी आपण जेटली यांची भेट घेतली होती, असा गौप्यस्फोट करून मल्ल्या यांनी आगीत तेल ओतले आहे. यामुळे भारताच्या राजकारणात भूकंप आला आहे. त्याचे धक्‍के सात-आठ महिन्यांपर्यंत बसत राहतील. यामुळे सरकारची अवस्था भांबावल्यासारखी झाली आहे.
“राफेल जेट’ प्रकरणी विरोधकांच्या प्रश्‍नाला कसं सामोरं जावं, हे सरकारला कळत नाही. म्हणूनच आधी “सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती देण्यासाठी मिलिट्री ऑपरेशनचे महासंचालकांना समोर केले आणि आता एअर चीफ मार्शल यांनी “राफेल’मुळे सेनेची ताकद वाढणार असल्याचे सांगितले.
मुळात, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी कॉमनवेल्थ घोटाळा, टू-जी घोटाळा, कोळसा घोटाळा, हेलिकॉप्टर घोटाळ्याच्या माध्यमातून डॉ. सिंग यांच्या सरकारला लोकसभेत धारेवर धरले होते. हेमराजच्या एका डोक्‍याऐवजी दहा डोके आणण्याची मागणी केली होती. पंतप्रधान प्रामाणिक असताना घोटाळे झालेच कसे? असा प्रश्‍न सुषमा स्वराज यांनी एक शेर म्हणून उपस्थित केला होता. आता केंद्र सरकारही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. यामुळे खुलासा करण्याची वेळ सरकारची आहे. एक मात्र नक्की की, नरेंद्र मोदी यांच्या सरकारला राफेल जेट आणि हजारो कोटी घेऊन पसार झालेल्या भ्रष्टाचाऱ्यांची किंमत लोकसभेच्या निवडणुकीत चुकवावी लागू शकते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)