दिल्ली वार्ता : वरुण गांधी कॉंग्रेसच्या वाटेवर?

वंदना बर्वे

6, दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजप आणि 24 अकबर रोडवरील कॉंग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षाच्या मुख्यालयात सध्या एकाच विषयाची चर्चा सर्वाधिक सुरू आहे, ती म्हणजे वरुण गांधी कॉंग्रेसमध्ये सामील होणार का?

देशाची राजधानी दिल्लीच्या लुटियन झोनमध्ये सध्या एकच चर्चा जोरात आहे ती भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची. भाजपाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी एका दीर्घ मुदतीनंतर जाहीर केलेल्या कार्यकारिणीत फायरब्रॅंड नेते वरुण गांधी यांना स्थान दिलेलं नाही. माजी महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी, विनय कटियार, सुरेश प्रभू, विजय गोयल, सी. पी. ठाकूर, चौधरी वीरेंद्र सिंग, राम माधव आणि सुब्रमण्यम स्वामी यांनाही “मार्गदर्शक’ मंडळात टाकलं आहे.
भाजप वरुण गांधी यांच्यावर नाराज आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामकाजावर वरुण गांधी यांनी अनेकदा नाराजी व्यक्‍त केली आहे.

2014 च्या निवडणुकीत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात एकही शब्द काढणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. तेव्हापासून ते भाजपमध्ये एकाकी पडल्यासारखे आहेत. परंतु, वरुण गांधी यांना डच्चू देणं राजकीय विश्‍लेषकांच्या खूप जिव्हारी लागलं आहे. सध्या राजकीय घडामोडींची सुई गांधी कुटुंबाच्या सर्वात धाकट्या वारसदाराच्या अवतीभोवती फिरत आहे, असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. वरुण गांधी यांचं पुढचं पाऊल कोणत्या दिशेने पडणार? याची उत्सुकता जवळपास सर्वांनाच लागली आहे.

प्रियंका गांधी-वढेरा कॉंग्रेसच्या महासचिव झाल्या आणि लगेच उत्तर प्रदेशचा प्रभार मिळाला. तेव्हापासून वरुण गांधी यांच्या कॉंग्रेसमध्ये आगमनाची चर्चा सुरू आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी न भूतो न भविष्यति असं यश मिळविलं होतं. मोदींचा झंझावात पाहता “2019 सोडा, 2024 च्या तयारीला लागा’, अशी विधानं नेत्यांकडून केली जात होती.

अशा परिस्थितीत प्रियंका गांधी यांनी वरुण गांधी यांना कॉंग्रेसमध्ये आणण्याची गुप्त मोहीम छेडली होती. 2017 मधील यूपी विधानसभेच्या निवडणुकीत तर हा हॉट टॉपिक होता. यानंतर 2019 मधील लोकसभेच्या निवडणुकीतही या चर्चेने जोर धरला होता. यावेळेस भाजपनं मनेका गांधी आणि वरुण गांधी यांना लोकसभेचं तिकीट नाकारलं असतं तर धाकटे महाराज तेव्हाच कॉंग्रेसमध्ये आले असते.

ही चर्चा सुरू होती तेव्हा मनेका गांधी केंद्रात मंत्री होत्या. वरुण गांधी खासदार होते. यामुळे, आपल्याला महासचिव आणि उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार बनविण्याची अट वरुण गांधी यांनी घातली होती. तर, राहुल गांधी यांनी आता पक्षाचा प्रचार करा आणि निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बनविण्यात येईल, असा संदेश पाठविला होता. यामुळे हा विषय तिथेच संपला.

मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. मनेका गांधी आणि वरुण गांधी भाजपात उपेक्षित आहेत. आपलं राजकीय भविष्य सावरण्यासाठी वरुण गांधी यांना कोणतं तरी ठोस पाऊल उचलावं लागेल. हे पाऊल गांधी घराण्याकडे पडण्याची शक्‍यता जास्त आहे.

खरं सांगायचं म्हणजे, वरुण गांधी यांनी भाजपात राहून बराच संयम पाळला असं म्हणायला हरकत नाही. मनेका गांधी जोपर्यंत मंत्री होत्या तोपर्यंत ते दोघे शांत होते. मात्र, मोदी यांच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात मनेका गांधींना स्थान मिळाले नाही. ‘मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा आईच्या जागी आपल्याला संधी मिळेल’, असा विचार करून वरुण गांधी पुन्हा शांत बसले. परंतु, मंत्रिमंडळाच्या फेरविस्तारातही त्यांना संधी मिळाली नाही. यामुळे आता कुठलीही आशा राहिली नाही.

वरुण गांधी आता कोणत्याही क्षणी भाजपच्या होडीतून उतरू शकतात. गांधी कुटुंबातील धाकट्या वारसदाराचे संबंध भावंडांसोबत खूप चांगले आहे. विशेषतः प्रियंका गांधी यांच्यासोबत. काही दिवसांपूर्वी वरुण गांधी यांनी भावंडांसोबत परदेशात सुट्टीचा आनंद घेतला असल्याचीही चर्चा आहे. वरुण गांधी आज नाही तर उद्या कॉंग्रेसमध्ये जाणारच असं दस्तुरखुद्द भाजपच्या नेत्यांनाही वाटत आलं आहे. कदाचित म्हणूनच मोदी आणि शहा यांच्या मर्जीतील त्यांना होता आले नाही.

विश्‍लेषकांच्या मते, कॉंग्रेसच्या माध्यमातून वरुण गांधी यांना यूपीत आपला जम बसविता येईल. पिलभीत या मतदारसंघात तराईपट्टी हा भाग येतो. हा शीखबहुल भाग आहे. तीन कृषी कायद्यांना विरोध आणि आता लखीमपूर घटनेमुळे शेतकऱ्यांच्या मनात भाजपविरुद्ध प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. पंजाबच्या निवडणुकीत कॉंग्रेसला शेतकऱ्यांचे चांगले समर्थन मिळाले तर वरुण गांधी यांचा मार्ग सुकर झाल्याशिवाय राहणार नाही, यात दुमत नाही.

अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते तेव्हा सोनिया गांधी यांना यूपीत रोखण्यासाठी गांधी कुटुंबातीलच एखादा सदस्य हवा, असं भाजपला वाटत होतं. याच कारणामुळे भाजपनं मनेका गांधी यांना पुढं केलं होतं. राजनाथ सिंग यांच्या काळातही वरुण गांधी यांची चलती होती. ते महासचिव होते. बंगालचा प्रभारही मिळाला होता. परंतु, भाजपची धुरा मोदी आणि शहा यांच्या हाती आल्यानंतर त्यांना वाईट दिवस आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.