#दिल्ली वार्ता: राहूल गांधींच्या विधानांमुळे अहमद पटेल अडचणीत 

वंदना बर्वे 
कॉंग्रेस पक्षाची केंद्रासह अनेक राज्यांमधली सत्ता गेल्यानंतर राहूल गांधी पक्षाचे अध्यक्ष झाले आहेत. मात्र, कॉंग्रेसची तिजोरी हळूहळू रिती होत गेल्याने, पक्षासाठी निधी आणायचा कसा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गुजरातमधील विजयानंतर अहमद पटेल यांना खजिनदारपदी नियुक्त करण्यात आले, कारण कॉर्पोरेट जगतात त्यांच्या शब्दाला बराच मान आहे. मात्र, राहूल यांनी नुकतीच उद्योजकांवर टिका करुन, ते मोदी सरकारचे बाहुले बनल्याचे सांगितल्याने पटेल यांच्यापुढे निधी संकलनाचा पेच उभा राहिला आहे. 
लोकसभा निवडणुकीचा आगामी सामना भारत-पाकिस्तानच्या सामन्याएवढा रंगतदार होईल. कॉंग्रेसप्रणित संपुआ सरकारच्या भ्रष्टाचारामुळे देशवासीयांचा कॉंग्रेसवर जो राग उघडपणे प्रगट होत होता; तो संपलेला आहे. आता मोदी सरकार निशाण्यावर आहे. विरोधकांसह रालोआच्या घटक पक्षांनीही आपल्या तलवारी उपसल्या आहेत. आगामी निवडणुकीत 2014 सारखं यश मिळणार नाही, याची जाणीव भाजपालाही झाली आहे. अन्यथा चार वर्षापर्यंत घटक पक्षांकडे ढुंकुनही न बघणारा पक्ष आता त्यांची मनधरणी करत आहे.
दरम्यान, भाजपाचे पहिले पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्ट रोजी निधन झाले. वाजपेयी हिमालयाच्या उंचीचे नेते होते. स्वपक्षासह विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्येही त्यांना आदराचे स्थान होते. भाजपने त्यांच्या अस्थींचे विसर्जन देशभरात करण्याचे ठरविले. जवळपास 30 राज्यांमध्ये वाजपेयी यांच्या अस्थींचे विसर्जन केले गेले. वाजपेयी हे भाजपचे “दधिची’ ठरत आहेत. महर्षी दधिचींनी आपली हाडं दान केली होती. अशात वाजपेयी यांच्या अस्थी भाजपसाठी खरंच वरदान सिध्द होणार काय? याचे उत्तर लोकसभेचा निकाल लागेल तेव्हाच स्पष्ट होईल. भाजपच्या या कृतीस विरोधकांनी व्होटबॅंकेच्या राजकारणाचे नाव दिले आहे. वाजपेयी यांचे देशभरात अस्थी विसर्जन करून त्यांच्यावर श्रध्दा ठेवणाऱ्या लोकांची मते मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी केला आहे. वाजपेयी यांच्या नातेवाईकांनीसुध्दा यास दुजोरा दिला आहे.
दुसरीकडे, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा परदेशात गेले आहेत. राहुल जेव्हा परदेशात सुट्टी घालविल्यानंतर मायदेशी परत येतात, तेव्हा त्यांच्या अंगात बारा हत्तींचे बळ संचारते. म्हणून, पंतप्रधान आणि भाजपाध्यक्षांसह पक्षाच्या अन्य नेत्यांनी “व्हिटॅमिन’च्या एक्‍स्ट्रा डोस घेण्यास सुरूवात करायला पाहिजे. राहुल आता ब्रिटन, जर्मनीसह अन्य देशांच्या दौऱ्यावर गेले आहेत. मायदेशी परतताच त्यांची कुऱ्हाड भाजपवर कोसळणार.
संसदेच्या अधिवेशनापूर्वी राहुल गांधी 58 दिवसांच्या रजेवर गेले होते. ते भारतात आले तेव्हा मोदी सरकारवर भारी पडले होते. शेवटी पंतप्रधानांना मोर्चा सांभाळावा लागला होता. राहुल यांच्या अंगात एवढ्या मोठ्या शक्तीचा संचार कसा झाला, असा प्रश्‍न त्यावेळी भाजपला पडला होता. याच कारणामुळे, राहुल गांधी 58 दिवसाच्या काळात कुठे-कुठे गेले? काय-काय केलं? या प्रश्‍नाची उत्तरे शोधून काढण्यासाठी गुप्तचर यंत्रणा कामाला लावण्यात आली होती.
एखादं मोठं काम हाती घ्यायचं असेल तर आधी स्वतःला सक्षम करावं लागतं. आता तर लोकसभेची निवडणूक लढवायची आहे. ती सुध्दा पहिली. राहुल एकांतातील तपस्येसाठी आता लंडनला गेले आहेत. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममधील कॉंग्रेसचे “जन वेदना सम्मेलन’ आठवत असेल. कॉंग्रेसचं एकदिवसीय अधिवेशनच होतं ते. राहुल गांधी या कार्यक्रमात प्रचंड आक्रामक दिसले. त्यांनी मोदींचा असा काही समाचार घेतला की, उपस्थितांचं हसून-हसून पोट दुखायला लागलं होतं. “मेरे प्यारे देशवासीयों’, “भाईयों और बहनो’, “मित्रों’ या मोदींच्या शैलीतील वाक्‍यांची नक्कल करून, मोदी देशवासीयांना कसे फसवत आहेत, याचं चित्र राहूलनी उभं केलं होतं.
राहुल यावेळेसही एवढे फॉर्मात कसे काय आलेत? तर त्याचं साधं सरळ उत्तर म्हणजे, ते सात दिवस परदेशात राहून आले होते. राहुल गांधी जेव्हा भारतातच असतात आणि भारताच्या हवामानात वावरतात तेव्हा तेव्हा “आलूच्या फॅक्‍टरी’सारखी विधाने करतात. मात्र, परदेशात जावून परत येतात तेव्हा ते शहाण्यासारखं वागतात. याचाच अर्थ, राहुलबाबांना आपल्या देशातील वातावरण सूट होत नाही. राहुल यांच्यात खूप मोठे परिवर्तन आले आहे. ते आता पूर्वीसारखे राहिले नाहीत. संघटनेला मजबूत करण्यासाठी काय आवश्‍यक आहे हे जाणून ते पुढचं पाउल टाकतात. परंतु, कॉंग्रेसची तिजोरी बुडाला लागली आहे.
गुजरात निवडणुकीच्या निकालामुळे कॉंग्रेसला संजीवनी मिळाली असली तरी; पक्षाचा गाडा चालवायचा कसा, असा प्रश्‍न राहुल यांना पडला होता. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस 10 वर्षे सत्तेत होती. या काळात “देवी लक्ष्मी’ कॉंग्रेसवर प्रसन्न होती. सन 2014 मधील लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांनी कॉंग्रेसला केंद्राच्या सत्तेतून बेदखल केले. इकडे निकाल लागला आणि तिकडे “देवी लक्ष्मी’ने आपला पत्ता बदलला. त्या काळात “24, अकबर रोड’ हा देवी लक्ष्मीचा पत्ता होता. आता “पंडित दीनदयाल उपाध्याय मार्गावरील भाजपचे मुख्यालय’ असा पत्ताबदल झाला आहे. कॉंग्रेस केंद्रातून गेली तशी अनेक राज्यांतूनही गेली. यामुळे पक्षासाठी फंड येण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. म्हणून महासचिवांना गरज असेल तरच विमानाने प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सचिवांना तर ट्रेनने प्रवास करण्यास सांगण्यात आले आहे. विविध राज्यांतील प्रदेश कार्यालयाची निम्मी जागा भाड्याने देण्यात आली आहे. यातून मिळणाऱ्या रकमेतून राज्याचा खर्च भागविला जात आहे. कॉंग्रेसची एवढी वाईट अवस्था कधीच नव्हती.
राहुल गांधी यांनी यावर हुकमी उपाय शोधून काढला आहे. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांना खजिनदार बनविले आहे. अर्थात, कॉंग्रेसची तिजोरी भरण्याची जबाबदारी आता पटेल यांची. गुजरात राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. तरीसुध्दा, अहमद पटेल निवडडून आलेच. कॉर्पोरेट जगात पटेल यांच्या शब्दाला प्रचंड मान आहे. यामुळे पक्षाची तिजोरी त्यांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम आयोगाने अद्याप जाहीर केलेला नाही. तरीसुध्दा, राहुल यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी कोर कमेटी, जाहीरनामा कमेटी, प्रसिध्दी कमेटी बनविली आहे.
आता राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि मिझोरम या राज्यांमध्ये विधानभेची निवडणूक होणे आहे. या निवडणुका लोकसभेबरोबर होण्याची दाट शक्‍यता आहे. लोकसभेसोबत तेलंगण आणि ओडिशाचीही निवडणूक होणे आहे. जर पक्षाच्या तिजोरीत ठणठणाट असेल, तर निवडणुका लढवायच्या कशा? गुजरात निवडणुकीतील कामगिरीमुळे कॉंग्रेसचे यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परंतु, निवडणुका केवळ उत्साहाच्या जोरावर लढविता येत नाहीत. आता, कॉर्पोरेट जगाला कॉंग्रेसच्या बाजूने करायचे कसे? हा प्रश्‍न पटेल यांना पडला आहे. कारण, राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी उद्योगपतींवर निशाणा साधला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातचे बाहुले झाले आहेत, असा आरोप त्यांनी व्यापाऱ्यावर केला होता. त्यामुळे आता अहमद पटेल कोणत्या तोंडाने उद्योजकांकडून पक्षासाठी निधी मागणार, हा प्रश्‍नच आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)