– वंदना बर्वे पाच राज्यांपेक्षा पश्चिम बंगालच्या सिंहासनावरून दिदीला पायउतार करण्यात भारतीय जनता पक्षाला यश येतं की नाही, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. कारण, भाजपची अख्खी फौज निवडणुकी दरम्यान बंगालमध्ये तंबू गाडून बसली होती! ……………………………………………………………….. पाच राज्यांसाठी आज सोमवारचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या चार राज्यांतील आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील मतदारांनी आपापल्या राज्यांची धुरा कुणाच्या हाती सोपविली आहे याचा आज फैसला होणार आहे. सायंकाळपर्यंत चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेले असेल. मात्र, पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल हा अन्य निवडणुकीच्या निकालांपेक्षा बराच वेगळा आहे. दक्षिणच्या जनतेने भाजपला अद्यापपर्यंत स्वीकारलेलं नाही. यावेळी भाजपच्या पदरात काहीतरी पडतं का हे बघायला मिळणार आहे. भाजपने पाचही राज्यांमध्ये पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढविली असली तरी सर्वाधिक फोकस हा पश्चिम बंगालवर होता, हे सर्वविदित आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या तामिळनाडूत काही तरी पदरात पाडून घेण्यापेक्षा पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारला सत्ताच्यूत करून झेंडा गाडणे हे भाजपचे स्वप्न आहे. यासाठी भाजपने आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. लक्ष देण्यासारखी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा जास्त घेण्यात आल्या होत्या. यामुळे बंगालची लढाई ममता बॅनर्जी विरूद्ध अमित शहा अशी झाली होती का? असा प्रश्न जर कुणी उपस्थित केला तरी ते चुकीचे होणार नाही. भाजपने ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढविली असली तरी बंगालच्या निवडणुकीत सर्वाधिक चेहरा कुणाचा पुढे होता तर तो गृहमंत्री यांचा. एकटे शहा यांनी बंगालमध्ये 63 ठिकाणी 66 प्रचार सभा घेतल्या आणि रोड शो केले, तर पंतप्रधानांच्या 18 सभा झाल्या. निवडणुकीच्या प्रचाराशिवाय गृहमंत्री जवळपास महिनाभर बंगालमध्ये होते. त्यांनी तेथेच ‘वॉर रूम’ तयार केले आणि त्याचे नेतृत्व करीत होते. पक्षाच्या निवडणूक प्रचाराच्या प्रगतीवर लक्ष ठेवले आणि ममता बॅनर्जी व टीएमसीच्या तुलनेत भाजपची कामगिरी कशी आहे याचे मूल्यांकन करण्यासाठी नियमित सर्वेक्षणे केली. भाजपला बंगालमध्ये यश मिळाले तर ते यश शहा यांची कामगिरी आणि मायक्रो मॅनेजमेंटचा परिणाम असेल, अशी चर्चा आतापासून भाजपात ऐकायला मिळत आहे. दुसरीकडे, ममता बॅनर्जी यांनीसुद्धा भाजपचा प्रत्येक डाव हाणून पाडण्यात कोणत्याही प्रकारची कमतरता राहू दिली नाही. निवडणूक आटोपल्यानंतर स्ट्राँग रूममध्ये त्यांनी स्वतःला कितीतरी तास तैनात करवून घेतले होते. दिदी भाजपला पुरून उरतील असं भाजपच्या नेत्यांचचं म्हणणं आहे. दहा नेते एकीकडे आणि ममता दिदी एकीकडे असं वर्णन भाजपच्या नेत्यांकडून ममता बॅनर्जींबाबत ऐकायला मिळतं. ममता बॅनर्जी लोकांमध्ये एक मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर ‘दिदी’ म्हणून आजही तेवढ्याच लोकप्रिय आहेत जेवढ्या आधी होत्या. एक महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ, त्यांचे जनसंपर्क कौशल्य आणि एक लढाऊ नेत्या अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. यांमुळे लोकांमध्ये त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. तृणमूल काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागले तरी आपण मागे-पुढे पाहणार नाही, हे त्यांचं बोलणं बंगालच्या नागरिकांना खूप भावलं आहे. दिदी भाजपच्या विरोधात किती आक्रमक आहेत याची प्रचिती वारंवार आली आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या वेळी त्यांनी भाजपला केवळ धारेवर धरले नाही, तर या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात पक्षाची बाजू मांडण्यासाठी स्वतः हजर झाल्या. याशिवाय, लक्ष्मी भंडार, कन्याश्री, स्वास्थ्य साथी आणि नुकतीच सुरू झालेली युवा साथी यांसारख्या योजनांमुळे दिदींची प्रतिमा उजळली आहे. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत दिदीच्या विजयात महिला आणि मुस्लीम मतदारांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. यावेळीसुद्धा हा गट आपल्याला तारेल असे दिदींना वाटत आहे. गेल्या निवडणुकीत दिदीच्या पक्षाला 294 पैकी तब्बल 215 जागा मिळाल्या होत्या. आता तृणमूल काँग्रेस विरूद्ध भाजप असा सामना रंगला असतानाच काँग्रेस आणि डावे पक्ष स्वतंत्र लढत असल्यामुळे ही निवडणूक अधिक रोमांचक झाली होती. एसआयआर प्रक्रियेत बंगालमध्ये जवळपास 91 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली. यामुळे मतदारांची संख्या 7 कोटी 66 लाखांवरून 6 कोटी 7 लाखांवर आली. अशात, मतदानाची टक्केवारी वाढली असली तरी एकूण मतांमध्ये फारशी वाढ झालेली नाही. मात्र, आपला मतदार मतदान करायला बाहेर पडेल यासाठी भाजप आणि दिदींनी पूर्ण प्रयत्न केले. ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तृकाँच्या कार्यकर्त्यावर कारवाई झाली, तर सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि त्यांना सरकारी नोकरीत सामावून घेतले जाईल, असे आश्वासन दिल्यामुळे कार्यकर्तेसुद्धा जोमात कामाला लागले होते. भाजपला रोखण्यासाठी मुस्लीम मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे ही त्यांची हाक ऐकली गेली असेही दिसून आले. मात्र, भाजपचा वोटरसुद्धा यामुळे बाहेर पडला. शिवाय, मतदारांना पूर्ण सुरक्षा देण्यासाठी राखीव दलाच्या तुकड्या मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आल्या होत्या. पहिल्या टप्प्यातील मतदानाच्यावेळी राखीव दलाच्या 2,407 कंपन्या, 2,193 क्वीक रिस्पाँस टीम आणि 40 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. कोणतीही अडचण आल्यास राखीव दलाचे जवान लगेच घटनास्थळी पोहचत होते. यामुळे मतदारांना सुरक्षेची हमी मिळाली आणि ते मतदान करायला मोठ्या प्रमाणावर बाहेर पडू लागले. थोडक्यात, सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि मुख्य विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत आपली पूर्ण ताकद झोकून दिली होती. बंगालमधील ममता दिदीच्या सरकारला सिंहासनावरून खाली खेचण्यासाठी भाजप खूप दिवसांपासून आग्रही आहे. आता भाजपला दिदींची सत्ता उखडून टाकण्यात यश येतं की ममता दिदी आपली सत्ता कायम राखण्यात यशस्वी ठरतात हे आज सायंकाळीपर्यंत पूर्णपणे स्पष्ट होईल. मात्र, या निवडणुकीच्या निकालाचे दूरगामी परिणाम होणार आहे. संपूर्ण देश भाजपच्या झेंड्याखाली आणण्याची भाजपची योजना कितपत यशस्वी होते ते बंगालच्या निकालावर अवलंबून आहे. भाजपला बंगालमध्ये यश मिळाले तर ज्या ठिकाणी सत्ता नाही तेथे कमळ फुलविणे भाजपला फारसे अवघड जाणार नाही. कारण, भाजपला आडवे जाणार्या नेत्यांमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आपचे अरविंद केजरीवाल. त्यातही ममता दिदी सर्वात मोठा अडसर आहे. ममता बॅनर्जी दूर झाल्या तर राहुल गांधी यांच्यावर भाजपला फोकस करता येईल. कारण, भाजपने ‘आप’ला मोठे खिंडार पाडल्यामुळे केजरीवाल हे सध्या त्यांचा पक्ष सावरण्यात गुंतले आहेत. आगामी निवडणुकांच्या वार्याची दिशी आताच्या निवडणुकांचे निकाल ठरवणार आहेत, हे नक्की.