दिल्लीत कॉंग्रेस व आपमध्ये आघाडी नाहीच

सर्व सातही जागा स्वबळावर लढवण्याचा कॉंग्रेसचा निर्णय

नवीदिल्ली – लोकसभा निवडणुकीत दिल्लीत कॉंग्रेस व आम आदमी पक्ष यांच्यात आघाडी होणार की नाही या विषयीचा सस्पेंस आता संपला आहे. आम आदमी पक्षाशी दिल्लीसह कोणत्याच राज्यात आघाडी केली जाणार नाही अशी स्षष्ट भूमिका कॉंग्रेस पक्षाने घेतली असून दिल्लीतील सातही जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय या पक्षाने घेतला आहे. दिल्लीचे कॉंग्रेसचे प्रभारी पी. सी चाको यांनीही ही माहिती दिली.

ते म्हणाले की आम आदमी पक्षाच्या अडेलपणामुळेच ही आघाडी होऊ शकली नाही. अन्यथा आप पक्षाला चार जागा आणि कॉंग्रेस पक्षाला तीन जागा या प्रस्तावावर त्यांच्याशी आघाडी करण्याची आमची आजही तयारी आहे. त्यांनी पंजाब आणि हरियानातही आघाडी करण्याचा आग्रह धरला होता. पण तसे करणे अवघड होते. त्यांच्या या आग्रही मागणीमुळेच दिल्लीतही आघाडी होऊ शकली नाही असे चाको म्हणाले.

ते म्हणाले की गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला 21 टक्के आणि आम आदमी पक्षाला 26 टक्के मते मिळाली होती. दोन्ही पक्षांमध्ये आघाडी झाली असती तर या आघाडीला 47 टक्के मतांचा आधार मिळाला असता. लोकसभा निवडणुकीच्या गेल्या वेळच्या मतदानानुसारच आम्ही 4-3 असा फॉर्म्युला त्यांना दिला होता. त्यांच्यावतीने संजयसिंह यांनी आमच्याशी चर्चा केली. या फॉर्म्युल्याला त्यांनी मान्यताही दिली होती असे चाको यांनी निदर्शनाला आणून दिले. पण आता त्यांनी भूमिका बदलल्याने आम्हालाही दिल्लीत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.