दिग्गजांचे भवितव्य ठरवणाऱ्या पूर्वांचलमध्ये कोण बाजी मारणार?

राजकीयदृष्ट्या सर्वांत महत्त्वपूर्ण राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशातील पूर्वेकडील प्रदेशातील निवडणुकीचे रणांगण यंदा देशाच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे. पूर्वांचलमधील या भागात लोकसभेच्या 26 जागा आहेत. या 26 जागांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांच्या जागांचा समावेश आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणातील दिग्गजांच्या भवितव्याचा प्रदेश म्हणून सर्व राजकीय विश्‍लेषक, जाणकार, अभ्यासक आणि त्याचबरोबर रणनीतीकारांचे लक्ष पूर्वांचलकडे लागून राहिले आहे.

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये आलेल्या मोदी लाटेमध्ये पूर्वांचलात विरोधी पक्षांचा सफाया केला होता. आझमगड वगळता उर्वरित 25 जागांवर भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने कब्जा केला होता. यंदा याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपाचा आटापिटा सुरू आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उत्तर प्रदेशात 74 प्लसचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचबरोबर यंदा पुन्हा एकदा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वांचलमध्येच असणाऱ्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

2014 च्या निवडणुकीत मोदींनी आम आदमी पक्षाचे सुप्रिमो अरविंद केजरीवाल यांचा जवळपास तीन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. यंदा गतवेळीपेक्षा अधिक मताधिक्‍याने मोदींना विजयी करण्याचे आव्हान भाजपापुढे आहे. मोदी पुन्हा काशीमधून निवडणूक लढवणार असल्यामुळे पूर्वांचलमधील 26 जागांवर त्याचा भाजपाच्या दृष्टीने अनुकूल परिणाम होणार आहे. भाजपाच्या उत्तर प्रदेशातील नेत्यांच्या मते, मोदींनी आपल्या पाच वर्षांच्या शासनकाळात उत्तर प्रदेशासह संपूर्ण देशात जो विकासाचा डोंगर उभा केला आहे तो जनता जाणून आहे. त्यामुळे जनता यंदा पुन्हा भाजपालाच विजयी करून विकासयात्रा अशीच पुढे सुरू ठेवेल.

पूर्वांचलचे रणांगण कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधींची लोकप्रियता आणि नेतृत्त्वक्षमतेचा कस लावणारे ठरणार आहे. यापूर्वी केवळ रायबरेली आणि अमेठीमध्येच निवडणुकीच्या प्रचारापुरत्या सहभागी होणाऱ्या प्रियांकांकडे यंदा पहिल्यांदाच मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्यावर वाराणसीसह संपूर्ण पूर्वांचलमधील भाजपाचा दबदबा आणि प्रभाव कमी करण्याचे मोठे आव्हान आहे. अर्थात त्यादृष्टीने प्रियांकांनीही जोरदार आणि नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केले आहेत. अलीकडेच त्यांनी अलाहबाद ते वाराणसीपर्यंत गंगायात्रा करून आपल्या निवडणूक अभियानाची सुरुवात केली. पूर्वांचलमध्ये कधी काळी कॉंग्रेसचा वरचष्मा होता. पण कालौघात येथे कॉंग्रेस जनाधार हरवत गेली. हा जनाधार मिळवून देण्याचे सर्वांत मोठे आव्हान प्रियांकांपुढे आहे. लोकांमध्ये कॉंग्रेसविषयीचा विश्‍वास पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न त्या कसोशीने करत आहेत. अलीकडेच त्यांनी पक्षाने परवानगी दिल्यास मी स्वतः वाराणसीतून लढण्यास तयार असल्याचे सांगून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्‍का दिला आहे. राहुलबाबा आणि त्यांच्या सल्लागारांनी काढलेले हे प्रियांकास्र कितपत प्रभावी ठरते हे 23 मे रोजी समजणार आहे.

कॉंग्रेस-भाजपासह पूर्वांचलमध्ये सपा-बसपा आघाडीची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. 2017 मध्ये पक्षात मोठी फूट पडल्यानंतर समाजवादी पक्षाची कमान सांभाळणाऱ्या अखिलेश यादव यांच्यासाठी 2019 च्या निवडणुका या त्यांच्यातील राजकीय कौशल्याची परीक्षा पाहणाऱ्या आहेत. यंदा अखिलेश आपले वडील आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांच्या आझमगड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मुलायमसिंगांना यंदा पक्षाने मैनपुरीमधून रिंगणात उतरवले आहे. मायावतींसोबत केलेल्या गठबंधनामध्ये समाजवादी पक्षाला पूर्वांचलमधील अधिक जागा मिळाल्या आहेत. या जागांवर विजय मिळवण्यासाठी सपाला मायावतींच्या बसपाच्या कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे समर्थन आणि मते मिळणे आवश्‍यक आहे.

2014 मध्ये उत्तर प्रदेशातील 80 पैकी 71 जागा जिंकणाऱ्या भाजपाने पूर्वांचलमधील भदोही, गाजीपूर, चंदौली, वाराणसी कुशीनगर, बस्ती, जौनपूर, डुमरियागंज, सोनभद्र, घोसी, अलाहबाद, महाराजगंज, बांसगांव, फुलपूर, फतेहपूर, कोशांबी, मछलीशहर, गोरखपूर, देवरिया, लालगंज, रॉबटस्‌गंज आणि संत कबीरनगरमध्ये विजय मिळवला होता. याखेरीज भाजपाच्या मित्र पक्षाने मिर्झापूर आणि प्रतापगडमध्ये विजय नोंदवला होता.

सध्याचे एकूण राजकीय वातावरण पाहता भाजपासाठी गतवेळची पुनरावृत्ती करणे तितकेसे सोपे राहिलेले नाही. अर्थात, सपा-बसपा गठबंधनमुळे होणाऱ्या मतविभागणीचा फटका कॉंग्रेसलाही बसणार आहेच. त्यामुळे पूर्वांचलमध्ये कोण बाजी मारणार यावर उत्तर प्रदेशच्या आणि पर्यायाने देशाच्या पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे. पाहूया, घोडा मैदान लांब नाही !

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.