दारूसाठी पैसे न दिल्याने एकाचा खून

पुणे – दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकाच्या डोक्‍यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. खडक पोलिसांनी आरोपीला पकडले असून मृत्यूमुखी तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही.

बाबासाहेब कुऱ्हाडे (32, रा.शंकरमठ वस्ती, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना मामलेदार कचेरीजवळील फुटपाथवर पहाटे पावणेदोन वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले, की “बाबासाहेब कुऱ्हाडे याने काल रात्री एका तरुणाकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. त्याने नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. तेव्हा कुऱ्हाडे हा त्याच्यामागोमाग गेला व तो कोठे राहतो हे पाहिले. त्यानंतर हा तरुण मामलेदार कचेरी जवळील एका दुकानाच्या बाहेरील फुटपाथवर झोपला.

पहाटे पावणेदोनच्या सुमारास कुऱ्हाडे हा तेथे आला व त्याने तेथील दगड उचलून त्या तरुणाच्या डोक्‍यात घातला. त्यात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या आरडाओरडाने आजूबाजूच्या लोकांनी पळून जाणाऱ्या कुऱ्हाडेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मृत्यू झालेल्या तरुणाची अद्याप ओळख पटली नसून त्याच्या कपड्यांवरून तो फिरस्ता असावा, असा संशय आहे.’ याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.