दांडेकर पुलावर जलतांडव

कालवा फुटल्याने शेकडो झोपड्यांमध्ये घुसले पाणी

– सातशे कुटुंबे बेघर
– लाखो लिटर पाण्याची नासाडी
– आपत्ती व्यवस्थापनात महापालिकेला अपयश
– नागरिकांसाठी महापालिकेच्या शाळांमध्ये सुविधा
– कालवा दुरुस्तीचे काम तातडीने सुरू
– शहरातील पाणीपुरवठा 2 दिवस विस्कळीत राहणार
– रात्री उशिरा प्रशासनाकडून पंचनामे सुरू
– आपातग्रस्तांना राज्य शासन करणार मदत
– कालवा दुरुस्तीवरून आरोप-प्रत्यारोप
– लाखो रुपयांचे नुकसान
– शहरातील वाहतूक तीन तास विस्कळीत

पुणे : शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या खडकवासला कालव्याला गुरुवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास दांडेकर पुलाजवळ भगदाड पडले. त्यामुळे लाखो लीटर पाणी पूल परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये घुसले, अचानक आलेल्या या पाण्याने सर्वत्र एकच खळबळ माजली होती. या पाण्याचा वेग इतका होता की, तब्बल शंभरहून अधिक घरे वाहून गेली; तर जवळपास तीनशेहून अधिक झोपड्यांमध्ये पाणी घुसले. शेकडो नागरिक बेघर झाले असून त्यांचे संसार वाहून गेले आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, जलसंपदा विभागाकडून दुपारी 12 वाजता खडकवासला धरणातून कालव्यात सोडण्यात येणारे पाणी बंद केले. हे पाणी ओसरण्यास तब्बल तीन तासांहून अधिक कालावधी लागला. सुदैवाने या भागातील नागरिकांनी तसेच युवकांनी सावधगिरी बाळगत तातडीने घरे सोडल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, दांडेकर पुलापासून पर्वती पायथ्याकडे जाण्यासाठी या कालव्यावर एक छोटा पूल आहे. या पुलाजवळच कालव्यातून ओढ्यात पाणी सोडण्याची चावी आहे. या चावीच्या बाजूला असलेल्या मातीची भिंत गेल्या काही दिवसांपासून ढासळत होती. याची कल्पना स्थानिक नागरिक तसेच नगरसेवकांकडून महापालिका आणि जलसंपदा विभागाला देण्यात आली होती. मात्र, या दोन्ही यंत्रणांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. गुरुवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास मातीचा ढीगाराच वाहून गेल्याने अचानक पाण्याचा लोंढा दांडेकर पुलाच्या दिशेने गेला. त्यामुळे या भागात एकच गोंधळ उडाला होता.

700 झोपड्या बाधित
सुरुवातीला वाहतूक पोलीस व नागरिकांनी सुरुवातीला जलवाहिनी फुटली असल्याचे समजून लक्ष दिले नाही. मात्र अचानक पाणी वाढत असल्याने या रस्त्यावर चार ते पाच फूट पाणी साचण्यास सुरुवात झाली. हे पाणी हळूहळू सिंहगड रस्त्याच्या पलीकडे असलेल्या स.नं. 133 मध्ये घुसले. याठिकाणी सुमारे 700 झोपड्या बाधित झाल्या तर, 50 झोपड्या पूर्ण पडल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. त्यानंतर हे पाणी पुढे दांडेकर पुलाकडून सिंहगड रस्त्याच्या दिशेने जात रामकृष्ण मठासमोरून स.नं. 130 मध्ये घुसले, त्यानंतरही पाण्याचा वेग सुरूच असल्याने हे पाणी दांडेकर पुलावरून शास्त्री रस्त्याच्या दिशेने गेले. हे पाणी पुन्हा उतारावून दांडेकर पूल झोपडपट्टीच्या स.नं. 214 मधील जवळपास 60 हून अधिक घरात घुसले. त्यामुळे सकाळच्या वेळी घरात असलेल्या महिला आणि मुलांना जीव मुठीत घेऊन घरातून बाहेर पडावे लागले.

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा केवळ कागदावरच
ही घटना घडल्यानंतर पहिल्या तासभर केवळ पोलीस यंत्रणाच घटनास्थळी होती. त्यांच्याकडूनही दांडेकर पूल परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. त्यानंतर महापालिकेचे अग्निशमनदल घटनास्थळी पोहोचले, त्यांच्याकडून तातडीने या घरांमधील सिलेंडर हलविण्यात आले. मात्र, ही मदत येईपर्यंत या भागातील तरुणांनी घरांमध्ये तसेच गल्ली बोळात नऊ ते दहा फूट पाणी घुसल्याने महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना घराच्या छतावरून बाहेर काढत सुरक्षित स्थळी हलविले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, हा सर्व घटनाक्रम पाहाता महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रना केवळ कागदावरच असल्याचे समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)