दहावीची परीक्षा संपताच विद्यार्थ्यांचा जल्लोष

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा शेवटचा पेपर शुक्रवारी झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला. पेपर संपल्याबरोबर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र परिसरात एकच जल्लोष केला.

शैक्षणिक वर्षातील दहावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकतेबरोबरच भीती देखील होती. यामुळे शेवटचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी परस्परांना भेटून पेपर संपल्याचा आनंद व्यक्त केला. शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत भूगोल या विषयाचा पेपर होता. शेवटचा पेपर दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला. काही विद्यार्थ्यांनी मित्रमैत्रिणींसोबत सेल्फी काढत होते. गेल्या 22 दिवसांपासून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा ताण कमी झाल्याचे पाहावयास मिळाले.

दहावी परीक्षा दि.1 मार्चपासून सुरू झाली. या परीक्षेसाठी राज्यभरात 17 लाख 813 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ही सर्व परीक्षा यंदा सुरुळीपणे पार पडली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा व्हॉट्‌स ऍपच्या पेपरफुटीचे प्रकार थांबविण्यात बोर्डाला यश आले आहे. पेपर संपल्यानंतर पुढील पेपरची चिंता नसल्याने परीक्षा केंद्रांबाहेर पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळाली. आता मात्र दहावीच्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात याबाबत उत्सुकता आणि चिंतादेखील असल्याचे दिसून आले.

Leave A Reply

Your email address will not be published.