ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई : पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
शिरूर- पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक रात्री गस्त घालत असताना शिरूर- पाषाण मळा रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबलेल्या कारची झडती घेतली असता त्यामध्ये दोन गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे व कार असा एकूण पाच लाख तीन हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी तीन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ही कारवाई (दि. 17) रात्री साडेनऊच्यादरम्यान घडली. अझहर सफदर खान (वय 27, रा. शिरूर भाजीबाजार, ता. शिरूर), प्रदीप श्रीकिशन तिवारी (वय 36, रा. शिरूर), सागर रामचंद्र धणापुरे (वय 20 वर्षे, रा. सूर्यनगर अहमदनगर), असे अटकेतील आरोपींची नांवे आहेत.
पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना शिरूर शहराजवळ बाह्यवळण मार्गावर पेट्रोलपंपाजवळ गुन्हेगार दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती बातमीदारांकडून मिळाली. त्यानुसार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक बारामती जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनवट, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, दयानंद लिम्हण, हवालदार उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, पोलीस नाईक राजू मोमीन, जनार्दन शेळके, बाळासाहेब खडके, प्रमोद नवले यांचे पथक पेट्रोल पंपाजवळ आले. त्याठिकाणी कार उभी असलेली दिसली. यावेळी पथकातील पोलीस कर्मचारी कारजवळ जाताना त्यातील दोघेजण कारमधून उतरून पळून जाऊ लागले. त्याचवेळी पोलिसांनी त्या दोघांची धरपकड केली. त्यानंतर कारचालकालाही ताब्यात घेतले.
यावेळी त्यांची चौकशी केली असता त्यांची नावे अझहर खान, प्रदीप तिवारी व सागर धनापुरे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ बेकायदेशीर बिगर परवाना दोन गावठी बनावटीचे रिव्हॉल्व्हर व तीन जिवंत काडतुसे व कार, असा एकूण पाच लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी तीन आरोपींवर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार संजय कोलते करीत आहे.