#दक्षिणरंग: तमिळी राजकारणाला आता नवी दिशा कोणती? 

प्रा. अविनाश कोल्हे 
डॉ. एम. करूणानिधी यांचे निधन हे फक्‍त एका प्रादेशिक पक्षाच्या नेत्याचे नव्हते तर गेली 60 वर्षे देशाचे राजकारण जवळून बघितलेल्या बुजूर्ग नेत्याचे काळाच्या पडद्याआड जाणे होते. डिसेंबर 2016 मध्ये अण्णा द्रमुकच्या जयललिता यांचे निधन झाले व आता करूणानिधींचे. या दोन नेत्यांच्या अनुपस्थितीत तामिळनाडूचे राजकारण आता आमुलाग्र बदलणार आहे. 
दाक्षिणात्य नेते एम. करूणानिधी 94 वर्षे जगले पण त्यापैकी सुमारे 70 वर्षे ते राजकारणात सक्रिय होते. त्यांच्यासारख्या अनेकांचे गुरू असलेल्या पेरियार स्वामी नायकर यांनासुद्धा असेच दीर्घ आयुष्य लाभले होते. पेरियार स्वामी दक्षिण भारतात तेव्हाचा मद्रास प्रांत द्रविडांची चळवळ उभी केली. त्यांच्या मांडणीनुसार भारतात पुरातन काळापासून “आर्य विरूद्ध अनार्य’ असा संघर्ष सुरू आहे. उत्तर भारतातील आर्यांनी दक्षिण भारतातील अनार्यांचा (द्रविड) पराभव केला. तेव्हापासून हा संघर्ष सुरू आहे. त्यांच्या आत्मसन्मान चळवळीचे लवकरच द्रविडांच्या चळवळीत रूपांतर झाले. याचेच नाव “द्रवीड कळहम’. रामस्वामींचे उजवे हात म्हणजे सी. एन. अण्णा दुराई. स्वातंत्र्यानंतर रामस्वामी व दुराई यांच्यातील राजकीय मतभेद विकोपाला गेले. दुराईंनी रामस्वामींच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली व स्वतःचा “द्रवीड मुन्नेत्र कळहम’ हा पक्ष 17 सप्टेंबर 1949 रोजी स्थापन केला. तेव्हापासून करूणानिधी अण्णा दुराईंच्या बरोबर होते.
दुराई यांनी रामस्वामींचीच वैचारिक मांडणी प्रमाण मानींर आर्यांच्या वाढत्या दादागिरीबद्दल वेळोवेळी आवाज उठवला. दुराई यांना राजकीय संधी उपलब्ध झाली ती सन 1965 मध्ये; जेव्हा केंद्र सरकारने इंग्रजी हटवून देशभर हिंदी भाषा लागू केली! दक्षिण भारतात या निर्णयाविरूद्ध प्रचंड असंतोष निर्माण झाला, जो द्रमुकच्या माध्यमातून समोर आला. राज्यभर प्रचंड दंगे झाले. शेवटी केंद्राने हिंदी भाषेच्या सक्‍तीचा हुकूम मागे घेतला व हिंदीबरोबरच इंग्रजीसुद्धा राहिल, असे जाहीर केले.
द्रमुकसाठी हा मोठा राजकीय विजय होता. त्यानंतर सन 1967 मध्ये झालेल्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकांत द्रमुकने कॉंग्रेसचा पराभव करत, तामिळनाडूची सत्ता हस्तगत केली. तेव्हापासून आजपर्यंत तेथे द्रविडी पक्षांचीच सत्ता असते. राज्यकर्ता पक्ष एक तर द्रमुक असतो किंवा (17 ऑक्‍टोबर 1972 रोजी एम. जी. रामचंद्रन यांनी स्थापन केला) अण्णा द्रमुक असतो.
आता मात्र, तामिळनाडूच्या राजकारणात जयललिता आणि करूणानिधीही नाहीत. गेल्या दीड वर्षात तेथे रजनीकांत व कमल हासन या दोन लोकप्रिय सिनेअभिनेत्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. शिवाय अण्णाद्रमुक फुटून आणखी एक प्रादेशिक पक्ष स्थापन झाला आहे. थोडक्‍यात आता द्रमुक, अण्णाद्रमुक, रजनीकांतचा पक्ष, कमल हासनंचा पक्ष व नवा प्रादेशिक पक्ष, असे पाच प्रादेशिक पक्ष रिंगणात असतील.
करूणानिधींनी “प्रादेशिक अस्मिता’ तेवत ठेवत राजकारण केले. कॉंग्रेसप्रणीत युपीए-1 च्या काळात (2004 ते 2009) द्रमुकचे लोकसभेत 16 खासदार होते. त्यांनी स्वतःच्या पक्षासाठी सात मंत्रीपदे व एक राज्यसभेची जागा मिळवली होती. युपीए-2 च्या काळात (2009 ते 2014) द्रमुकचे 18 खासदार होते व त्यांनी पाच मंत्रीपदे मिळवली होते. याच काळात “टू जी’ घोटाळा गाजला. तामिळ वाघांचा मुद्दा पुढे करत द्रमुक सन 2013 मध्ये केंद्र सरकारातून बाहेर पडला होता.
करूणानिधींचा दबदबा असला तरी त्यांचे राजकीय अपयश भरपूर होते. रामचंद्रन यांच्या मृत्यूनंतर तब्बल 12 वर्षे त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले होते. 2014 च्या मोदी लाटेत करूनानिधींच्या द्रमुकचे अक्षरशः पानिपत झाले होते. आज तामिळ नाडू विधानसभेत द्रमुक विरोधी पक्षांच्या बाकावर बसलेला आहे.
करूणानिधींच्या मृत्यूनंतर पक्षाचे नेतृत्व त्यांचा सुपूत्र स्टालीन यांच्याकडे आले आहे. भारतीय राजकारणात घराणेशाही नवीन नाही. मुख्य म्हणजे भारतीय मतदारांचा याला आक्षेप नाही. आज भारतीय संघराज्याच्या जवळजवळ प्रत्येक घटक राज्यांत घराणेशाही दिसते. कुठे दुसरी तर कुठे तिसरी पिढी पक्षाची धूरा सांभाळत आहे. तामिळ नाडूतील द्रमुक याला अपवाद डिसेंबर 2016 मध्ये जयललितांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अण्णा द्रमुक पक्षात सुरू झालेली सुंदोपसुंदी दुर्लक्षून चालणार नाही. त्या अविवाहित होत्या. त्यांनी त्यांच्या हयातीत आपला अधिकृत वारसदार तयार केला नव्हता. परिणामी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या खुर्चीवर बसायला अनेक इच्छूक पुढे सरसावले. आज द्रमुकमध्येही कोणाचा पायपोस कोणास नाही.
करूणानिधींच्या निधनामुळे तामिळनाडूच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होतील यात शंका नाही. पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणूका व्हायच्या आहेत. तामिळनाडूतून लोकसभेत 39 खासदार निवडून जातात. येत्या लोकसभा निवडणूकीत भाजपाला लोकसभेच्या प्रत्येक जागेसाठी जीवतोड मेहनत करावी लागणार आहे. अशा स्थितीत भाजपा काही तरी मार्ग काढून द्रमुक किंवा रजनीकांत किंवा अण्णाद्रमुकमधील एखाद्या फुटीर गटाशी हातमिळवणी करेल व या 39 जागांपैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करेल.
नेमका असाच प्रयत्न कॉंग्रेसही करेलच. कॉंग्रेसने द्रमुकशी 1967 पासून एक अनौपचारिक समाझोता केलेलाच होता. राज्याची सत्ता द्रमुक व नंतर अण्णा द्रमुककडे असेल मात्र लोकसभेच्या जास्त कॉंग्रेस लढवेल. हा समझोता बरीच दशकं टिकला. जेव्हा 90 च्या दशकापासून कॉंग्रेसचा राष्ट्रीय पातळीवरर्‌ ऱ्हास सुरू झाला, तेव्हा हा समझोता संपला. द्रमुक व अण्णा द्रमुकच्या धुरिणांना जाणवले की, आता आघाडीच्या राजकारणाचे दिवस आहेत. अशा स्थितीत ज्या प्रादेशिक पक्षाचे जास्त खासदार, त्या पक्षाला सत्तारूढ आघाडीत जास्त मान व सत्तेत वाटा जास्त. त्यानंतर द्रमुक व अण्णा द्रमुक जमेल तेव्हा स्वबळावर लोकसभेच्या निवडणूका लढवायला लागले व निकालानंतर सौदेबाजी करायला लागले.
सन 1998 मध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तारूढ होती त्यात जयललितांचा अण्णा द्रमुक घटक पक्ष होता. तेरा महिने टिकलेल्या वाजपेयी सरकारला सतत जयललितांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागत. तेव्हाच्या सरकारातील संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिसांची व जयललितांची खास मैत्री होती. फर्नांडीस अनेकदा चेन्नईत असत व जयललितांची चर्चा करत.
सरतेशेवटी जयललितांनी सरकारचा पाठिंबा काढलाच व एप्रिल 1999 मध्ये वाजपेयी सरकार अवघ्या एका मताने पडले.
असाच प्रकार त्यानंतर दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या वाजपेयी सरकारबद्दल घडला. जसा त्रास जयललिता वाजपेयी सरकारला देत असत तसाच त्रास 1999 ते 2004 काळात सत्तेत असलेल्या वाजपेयी सरकारला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू देत असत. आता तामिळ नाडूच्या राजकारणात जयललिता नाहीत आणि करूणानिधी नाहीत. त्यांच्या मृत्यूनंतर तामिळ नाडूचे राजकारण कोणते वळण घेते याबद्दल उत्सुकता आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)