“थिसेनक्रुप’च्या कामगारांना 15 हजारांची वेतनवाढ

पिंपरी – येथील थिसेनक्रुप इंडस्ट्रिज इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये कामगारांना ऐतिहासिक मुदतपूर्व वेतनवाढ करार पार पडला. या करारानुसार कामगारांना सरासरी 15 हजार 250 रुपयांची वेतनवाढ मिळणार आहे.

थिसेनक्रुप इंडस्ट्रिज इंडिया कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्यात हा करार झाला. सध्या सुरु असलेल्या कराराची मुदत 30 सप्टेंबर 2018 पर्यंत होती. परंतु, कामगार संघटना व व्यवस्थापन यांनी एकजुट दाखवत मुदत संपण्याच्या आधीच करार मार्गी लावला. अवघ्या आठ तासात करार संपन्न झाल्याचे दोन्ही बाजूकडून सांगण्यात आले. 1 ऑक्‍टोबर 2018 ते 30 सप्टेंबर 2012 या तीन वर्षांसाठी हा करार करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

करारानुसार प्रत्येक कामगाराला महिन्याला सरासरी 15 हजार 250 रुपये वेतनवाढ मिळणार आहे. त्यानुसार, कामगारांचे वेतन किमान 60 हजार तर कमाल 82 हजार होणार आहे. व्यवस्थापन व कामगार यांच्यातील चांगल्या संबंधाबद्दल व्यवस्थापनाने प्रत्येक कामगारास एक रकमी 12 हजार रुपये देण्याचे मान्य केले आहे. संपुर्ण कुटुंबासाठी 3 लाखांचा मेडिक्‍लेम विमा व 4 लाखांचा वाढीव इन्श्‍युरन्स जाहीर करण्यात आला आहे.

कामगाराला 22 लाखांचा मृत्यू सहाय्य विमा, निवृत्त कामगारांना वयाच्या 100 वर्षापर्यंत मेडिक्‍लेम विमा देण्यात आला आहे. दुबार घर खरेदीसाठी 3 लाख, शैक्षणिक, विवाह, घर दुरुस्ती कर्जाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. सेवानिवृत्त कामगारांना 4 लाख 40 हजार रुपये कामगारांच्या पत्नीच्या नावे देण्यात येणार आहेत. शेवटच्या महिन्यात या कामगारांना दोन इन्क्रीमेंट देण्यात येणार असल्याने निवृत्त कामगारांना ग्रॅज्युइटी (सेवा उपदान) मध्ये फायदा होणार आहे.

करारावर व्यवस्थापनातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी मलय दास, मॅन्युफॅक्‍चरिंग विभागाचे संचालक एस. एम. तलाठी, आर. एस. नागेशकर, एम. एम. राणे, शितल कुलकर्णी यांनी तर कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष रामचंद्र वाईंगडे, सरचिटणीस शांताराम कदम, कार्याध्यक्ष विपुल बिरंजे, खजिनदार शरद लांडगे, उपाध्यक्ष सोनबा गव्हार यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)