थांबलो नाही, आताही थांबणार नाही

माजी खासदार आढळराव पाटील : लांडेवाडी येथे जनता दरबार

मंचर- एका व्यक्‍तीच्या प्रतिमेचा मालिकेचा प्रभाव व जातीच्या समीकरणामुळे निवडणुकीत पराभव झाला. मालिका पाहणाऱ्या महिलांनी राजाला मतदान करायचे, असे म्हणत त्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे वैयक्तिक कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. यापूर्वीही मी थांबलो नाही व आताही थांबणार नाही. अभिनेत्याच्या प्रतिमेचा व मालिकेचा प्रभाव तसेच जातीचे राजकारण यामुळे लोकसभेला पराभव झाला. या पराभवाला डॉ. कोल्हे जबाबदार नसून वळसे पाटील हेच प्रामुख्याने जबाबदार आहेत, असा आरोप माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच लांडेवाडी येथे येऊन आढळराव पाटील यांनी जनता दरबारात कार्यकर्ते आणि नागरिकांच्या भावना समजावुन घेतल्या. यावेळी झालेल्या मेळाव्यात माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले की, देशात मोदी लाट असताना शिरूरमधील पराभवाने अनेकांना वाईट वाटले, तर काहींना आत्ताच पश्‍चाताप होतोय. 15 वर्षे जे बरोबर राहिले ज्यांनी साथ दिली त्यांचे आभार मानत एका पराभवाने घरी बसणे शहाणपणाचे नव्हते. त्यामुळे मतदारसंघात राष्ट्रवादीची गुंडगिरी व दहशत वाढली असती. म्हणून पुन्हा कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करण्यासाठी आलो आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वळसे पाटील यांना पराभूत करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने प्रयत्न केले जातील. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसारखे दिग्गज नेते निवडणुकीत पराभुत होतात. मग वळसे पाटील का पराभुत होणार नाही. आंबेगाव विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन त्यांनी केले.

पराभवाने खचुन न जाता आगामी विधानसभा निवडणुक डोळ्यांसमोर ठेवून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संदेश पावला आहे त्यात म्हटले आहे की, सरकार तुमच्या पाठीशी असून कामांना प्राधान्य राहिल, असे आश्‍वासन त्यांनी दिले आहे. या मेळाव्याचे सुत्रसंचालन राज्य युवासेनेचे विस्तारक सचिन बांगर यांनी केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×