थरमॅक्‍सचा स्वराजवर सहा गडी राखून विजय

पुणे – थरमॅक्‍स संघाने स्वराज संघाचा सहा गडी राखून पराभव करत स्व. सदू शिंदे साखळी क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच केली आहे. येथील लॉ कॉलेजच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील सामन्यात थरमॅक्‍सने वर्चस्व गाजविले.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना स्वराज संघाने 20 षटकांत सर्वबाद 124 धावा केल्या. विजयासाठी 125 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या थरमॅक्‍स संघाने 16.5 षटकांत 4 गडी बाद 125 धावा करताना एकतर्फी विजयासह स्पर्धेत आगेकूच केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

थरमॅक्‍सचे सलामीवीर अमोल जाधव आणि निशांत प्रिया यांनी संघाला सावध सुरुवात करुन दिली. यावेळी अमोलने 39 तर निशांतने 17 धावांची खेळी केली. तर मधल्या फळीतील फलंदाज रघू शेट्टी (15) आणि संदीप जगताप (16) यांनी संघाच्या विजयावर शिक्‍कामोर्तब केले. यावेळी स्वराज संघाकडून आकाश शेळकेने 18 धावात 3 गडी बाद केले तर शैलेश निवंगुणेने एक गडी बाद करत त्याला साथ दिली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना स्वराज संघाने सुयोग कामठे, आकाश शेळके आणि श्रीकांत काटकर यांच्या फलंदाजीच्या जोरावर 20 षटकांत 124 धावांपर्यंत मजल मारली. सुरुवातीलाच बसलेल्या दोन धक्‍क्‍यांमधून सावरताना सुयोग कामठे याने 29 धावांची उपयुक्‍त खेळी केली. तर तो बाद झाल्यानंतर आकाश शेळके (29) आणि श्रीकांत काटकर (नाबाद 16) धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. थरमॅक्‍स संघाकडून विवेक सरनाने 3 गडी बाद केले तर विशाल गवळीने 2 गडी बाद करताना त्याला सुरेख साथ दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)