थकबाकीदार गाळेधारकांवर कारवाई करण्याचे आदेश !

महापालिकेच्या मार्केट व जन्म, मृत्यू नोंदणी विभागाचा महापौरांनी घेतला आढावा

नगर: महापालिकेच्या मार्केट विभागाची गाळेधारकांकडे भाडे पट्ट्याची असलेली सुमारे 12 कोटी 94 लाखांची थकबाकी वसुलीसाठी संबंधित गाळेधारकांना तातडीने नोटीसा काढाव्यात, नोटीसा दिल्यानंतरही त्यांनी थकबाकी न भरल्यास प्रशासनाने त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, असे आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी मार्केट विभागाला दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाकळे यांनी बुधवारी दुपारी महापालिकेत मार्केट व आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. बैठकीस उपमहापौर मालनताई ढोणे, उपायुक्‍त प्रदीप पठारे, सुनील पवार, नगरसेविका सोनाली चितळे, गणेश नन्नवरे यांच्यासह मार्केट विभागाचे प्रमुख कैलास भोसले, आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत मार्केट विभागाच्या थकबाकीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. महापालिकेचे शहरात 742 गाळे आहेत. 8 शाळांच्या 83 खोल्या भाडेतत्वावर दिलेल्या आहेत. 72 खुल्या जागा आहेत. गंजबाजारात 82 ओटे, तर सावित्रीबाई फुले मार्केटमध्ये 86 ओटे आहेत. या सर्व गाळ्यांची वर्षाखेरीस फक्‍त 58 लाख वसुली झाली असून 12 कोटी 94 लाखांची थकबाकी आहे. गतवर्षी गाळेधारकांना रेडीरेकनर दरानुसार वाढीव बिले दिली होती. मात्र त्यास विरोध झाल्याने महासभेत फेरसर्व्हे करण्याचा आणि तो पर्यंत जुन्या दरानेच भाडेपट्टी वसुलीचा ठराव करण्यात आलेला आहे. मात्र तरीही अनेक गाळेधारकांनी थकबाकी भरलेली नसल्याचे मार्केट विभागाच्या वतीने निदर्शनास आणून दिल्यानंतर वाकळे यांनी थकबाकी वसुलीसाठी संबंधित गाळेधारकांना तातडीने नोटीसा काढाव्यात, नोटीसा दिल्यानंतरही त्यांनी थकबाकी न भरल्यास प्रशासनाने त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी असे आदेश मार्केट विभागाला दिले आहेत.

महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी तसेच विवाह नोंदणी विभागात सुरु असलेल्या गलथान कारभारामुळे शहरातील नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. दाखले घेण्यासाठी नागरिकांना या कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी वाढल्याने वाकळे यांनी याची गांभीर्याने दखल घेत आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. या विभागाचे प्रमुख असलेले आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांना याचा जाब विचारला.यावेळी डॉ.बोरगे यांनी या विभागातील यंत्रणा अतिशय जुनाट अशी आहे. त्यामुळे वारंवार या विभागातील कामकाज ठप्प राहते. सॉफ्टवेअर असलेला सर्व्हर डाउन होण्याचे प्रमाणही जास्त आहे. तसेच या विभागाकरिता मनुष्य बळाचीही कमतरता आहे. अशा समस्या मांडल्या. त्यामुळे जन्म, मृत्यू नोंदणी विभागात अद्ययावत संगणक यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी त्यांनी केली. यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना वाकळे यांनी उपायुक्‍त सुनील पवार, प्रदीप पठारे, यांच्यासह संगणक विभाग प्रमुख ए.डी. साळी यांना दिले.

माहिती सुविधा केंद्रासह जन्म-मृत्यू नोंदणी तसेच विवाह नोंदणी विभागात नागरिकांची अडवणुक होवू नये, यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी. या विभागातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना योग्य रीतीने कामाला लावून नागरिकांची होणारी अडवणूक थांबवावी. महापालिकेच्या सर्वच विभागाच्या कार्यालयांना आपण आता अचानक भेटी देणार आहोत. त्यावेळी कामचुकारपणा कर्मचाऱ्यांची कुठलीही गय न करता कारवाई केली जाईल, असा इशाराही वाकळे यांनी यावेळी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)