त्यांचे बदललेले रूप…

सामान्यपणे काही व्यवसायांबद्दल आपली मते अगदी रेडीमेड असतात. किंवा असायची म्हटले पाहिजे. शिक्षक, डॉक्‍टर, वकील, नर्स हे असेच काही व्यवसाय. आता सारेच चित्र बदलले आहे. मतांचा-भावनांचा प्रश्‍नच नाही राहिला कुठे, सारा उघड व्यवहार. पैसा फेको, तमाशा देखो असा. आता हॉस्पिटल्सचीही वृत्तपत्रातील काही प्रकरणे वाचली आणि आजूबाजूच्या परिचितांच्या कहाण्या ऐकल्या की डॉक्‍टर आणि हॉस्पिटल याबद्दलची भावना बदलून जाते.

पूर्वी डॉक्‍टर म्हटले की तो देवमाणूस अशीच कल्पना असायची. आणि क्वचित कधीकाळी एखादा अपवाद वगळला तर ते खरेही होते. डॉक्‍टर आणि पेशंट यांच्यात एक जिव्हाळा असायचा. तेव्हाचे दवाखाने-तेव्हा ते दवाखानेच होते, त्यांचे क्‍लिनिक वगैरे झाले नव्हते-साधेसुधे असायचे. आत डॉक्‍टर आणि बाहेर कंपौंडर असायचा. डॉक्‍टरांनी तपासल्यानंतर कंपौंडर औषधेगोळ्या द्यायचा. औषधाच्या बाटलीवर डोसांची पट्टी चिकटवलेली असायची. तेव्हा डॉक्‍टर व्हिजीटला यायचे. आता सारेच बदलले आहे. आता पेशंट मरत असला तरी त्याला डॉक्‍टरकडे न्यावे लागते. तेथेही आधी बिल भरा, मग ऍडमिट व्हा असा कायदा झाला आहे. असो, तो विषय नाही आपला. विषय आहे वकिलाचा. वकिली पेशाही असाच काहीसा बदनाम.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही दिवसांपूर्वी मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. फार दिवसांनी भेटीचा योग आला होता. तिचे वडील वकील होते. आता वकील या व्यक्तीबद्दल पटकन कोणी चांगले मत देत नाही ही वस्तुस्थिती आहे. काळा कोट घालणारे वकील आणि कावळे यांच्यात कोठेतरी साम्य वाटते लोकांना. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे जे म्हणतात, त्यामागे वकील हेच मोठे कारण असले पाहिजे. असो.

कारणे काहीही असोत, पण वस्तुस्थिती आहे खरी. त्यामुळे माझ्या मैत्रिणीच्या घरीही माझे फारसे जाणे-येणे नसायचे. तीच माझ्याकडे जास्त असायची. अर्थात या गोष्टीलाही फार वर्षे झाली आहेत. आम्ही शाळेत असतानाची ती गोष्ट.
त्या दिवशी तिच्याकडे गेले, तर तिचे वडील हॉलमध्ये बसले होते. अगदी लहानपणापासून त्यांच्याशी ओळख असली, तरी त्यांच्याशी माझे फारसे बोलणे कधी झाले नव्हते. आता त्यांनी वकिली सोडली होती.

निवृत्त झालेल्या त्यांना मी प्रथमच पाहत होते. त्यांचा एकूण अविर्भाव बदलला होता, आता त्यांच्या चेहऱ्यावरचा वकिली बेरकीपणा जाऊन एक भाबडा जिव्हाळा आला होता. वडिलांचा मुलीसाठी असतो तसा. माझी मैत्रीण-त्यांची मुलगी आता त्यांच्याकडेच राहत होती. बस बाळा, ते म्हणाले. मी बसले. लता, माझी मैत्रीण चहा घेऊन आली. आम्ही तिघेही प्रथमच एकत्र चहा घेत होतो.

बाळांनो, ते आम्हा दोघींना म्हणाले, आज मी तुमच्याशी थोडे बोलणार आहे. मन मोकळे करणार आहे. काळा कोट घालणारा म्हणून वकील मनाचा काळाच असणार अशी एक समजूत आहे, पण ती चुकीची आहे.
मी सांगतो तुम्हाला. मी वकील आहे. खूप वेगवेगळ्या केसेस येत असतात माझ्याकडे. त्या केसेसमधून मी आयुष्य वाचत असतो. माणूस वाचत असतो. जीवनाच्या खोल अंतरंगात शिरत असतो. खूप भीषण रूपं, भयानक चेहरे दिसतात तिथं लपलेले. ते पाहिले ना, की आपला आपल्याला विश्‍वास वाटेनासा होतो, अशी माणसे भेटतात, आणि मनाचा कोंडमारा होतो. मग रात्री घरी आलो की मी मद्यपान करत बसायचो. कुढत बसायचो, मनाच्या कुठल्याशा अंधाऱ्या गुहेत. गेली तीस वर्षे अनुभवतोय मी हा कोंडमारा. आता निवृत्त झाल्यावर मोकळेपणा वाटत आहे.

तू म्हणशील, हे सगळं सोडून का नाही दिलं? पण बेटा, या साऱ्याला दुसरी बाजूही आहे. जेव्हा एखाद्याला न्याय मिळतो ना, तेव्हा त्याच्या डोळ्यातली कृतज्ञता आणि चेहऱ्यावरचं समाधान उजळून टाकतात मनातल्या त्या अंधाराला. नवा जन्म होतो माझा पुन्हा माझ्या अंतरंगात. म्हणून मग ठरवलं. ह्याच वाटेवरून चालत जायचं. काटे टोचले की काढायचे, वादळ आलं की त्यात झुलायचं, विजा कोसळल्या की त्या काळजात भरायच्या आपलं काम करत रहायचं. अन्यायग्रस्तांच्या ओंजळीत न्यायाची फुलं ठेवत राहायची.

आता निवृत्त झालो तरी अशी एखादी केस आली ना, तर मी पुन्हा काळा कोट घालीन. पण तोपर्यंत फक्त लताचा पिता म्हणून जगेन. तिला मी फार वेळ नाही देऊ शकलो. आता ती कसर मी भरून काढीन. तू ही येत जा. आपण जुने दिवस पुन्हा अनुभवू, त्यांचे बदललेले रूप आणि आजवर लपलेल्या भावना पाहून माझे मन भरून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)