तो आणि पाऊस…

त्याला पाऊस आवडत नाही आणि पाऊस म्हणजे रोमान्स हे तर त्याच्या गावीही नाही… तिला पाऊस आवडतो. मातीचा सुगंध घेताना ती मोहरते. पाऊस म्हणजे सगळीकडे घाण आणि ट्रॅफिक जाम… पाऊस म्हणजे अवखळ हवा आणि नृत्य बेभान… त्याच्यासाठी पावसाच्या आठवणी आणतात डोळ्यात पाणी… तिच्यासाठी मात्र रोमॅंटिक गाणी…

त्याला आठवते पुरात वाहिलेली आई… आणि त्यासंगे वाहिलेली स्वप्नं, काही… कडवट आठवणी घेऊन पाऊस पाहतो तो, सुन्न! तिच्यासाठी पावसाला महत्त्व अनन्य… अनभिज्ञ ती, हळुवार ती, चाहूल प्रीतीची मनात घेऊन स्पर्श करू पाहाते, मनाला त्याच्या… कुठेतरी सुखद तर कुठे तरी संतप्त कल्लोळ माजवणारा पाऊस…

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दोघांच्या प्रेमात थोडासा कडवटपणा प्रत्येक पावसाळ्यात.. ती रुसते, फुगते, भिजतच राहते पाऊसात… त्याच्या बरसण्यापेक्षा तिचे बरसणे धुंद करते त्याला.. पावसातली ती मग आवडते त्याला… नकळत चालू लागतात त्याचे पाय पाऊस तुडवत तिच्याकडे… ती अजूनही रुसलेली, बेधुंद पाऊस झेलत अंगाखांद्यावर आणि डोळ्यातही.. त्याची पावले झपझप आवाज करत गाठतात तिला… तो तिच्या समोर काही क्षणात… डोळ्यांतील पाऊस लपवत ती उधळते पुन्हा… तो हळूच तिला कवेत घेतो, तशी ती शहारते… पावसाचा सुखकर स्पर्श तोही नव्याने अनुभवतो… काही क्षण विरतात; तो भानावर येतो.

आठवणींसमवेत त्याचा झगडा पुन्हा सुरू होतो… यावेळी मात्र ती सावरते… अबोल, दाटलेल्या डोळ्यातील पाऊस त्याच्या अलगद टिपून घेते… ढगाकडे पाहात दोघे पावसाच्या सरी झेलत जातात…हळव्या झालेल्या मनावर हळूच फुंकर घालत राहतात… प्रत्येक वेळी हा ऋतू असाच जातो…

कधी त्याचा क्षण बावळा; तर कधी तिचा बेधुंद सोहळा असतो…

– मनीषा संदीप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)