तोचि खरा साधू, तोचि खरा संत

शृंखला पायी असू दे
मी गतीचे गीत गाई
दु:ख उधळायास आता
आसवांना वेळ नाही.

एका आयुष्यात माणूस कित्येक आयुष्याचे काम करून ठेवू शकतो याचे आदर्श उदाहरण, ज्यांना गांधीजींनी अभयसाधक म्हटले ते म्हणजे कर्मयोगी बाबा आमटे. मुरलीधर देविदास आमटे म्हणजेच बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर1914 मध्ये हिंगणघाट येथे झाला. घरची परिस्थिती अत्यंत चांगली. सर्व सुखसुविधायुक्त आयुष्य जगत असताना, बाबांच्या आयुष्यातील एका प्रसंगाने त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून टाकले. रस्त्याच्या कडेला हातपाय झडलेला, भर पावसात भिजत, चिखलातून खुरडत जाणारा कुष्ठरोगी तुळशीराम यास पाहून बाबा घाबरले! घरी गेले मात्र, मन काही त्याच्या वेदनेपासून सुटका घ्यायला तयार नव्हते. त्यांनी त्याच्या जखमा साफ केल्या. मात्र, रोगाच्या अंतिम टप्प्यावर असलेल्या तुळशीरामने बाबांच्या हातावर देह ठेवला. या घटनेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि आयुष्याचा उद्देश बदलला. ज्या लोकांना समाज नाकारतो, ज्यांना महारोगी म्हणून गावाच्या बाहेर टाकले जाते, अशांसाठी काम करण्याचे बाबांनी ठरविले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उपनगराध्यक्ष, वकिली, श्रीमंती आणि सर्व सुखांचा त्याग करून बाबांनी पन्नासच्या दशकात आनंदवनची स्थापना केली. हजारो लोकांना जगण्याचे बळ देणारे आनंदवन हे लाखो लोकांना प्रेरणा देण्याचे कार्य करीत आहे. 14 रूपये आणि 6 महारोगी यांच्यापासून सुरू झालेले आनंदवन आज एका विशाल कुटुंबात रूपांतरित झालेले आहे. सात दशके झाली इथे मानवतेची सेवा निरंतर चालू आहे. जगाचा कसलाही संपर्क नाही, शिक्षण आणि आरोग्य काय असते याची जाणीव नाही. विकासापासून कोसो मैल दूर जिथे घड्याळ नावाचे यंत्र माहिती नाही आणि मुंग्यांची चटणी व उंदरांना भाजून खाल्ले जायचे. कुपोषणाने ग्रस्त अशा अत्यंत दुर्गम भागातील आदिवासी लोकांच्या आयुष्यात नंदनवन फुलविण्याचे काम बाबांनी केले.

बाबांनी अनेक प्रकल्प चालू केले. त्यांचे कार्य अव्याहतपणे आजही चालू आहे. यासाठी बाबांचे दोन्ही मुले डॉ. विकास आणि डॉ. प्रकाश आमटे यांनी आपले सर्वस्व अर्पण केलेले आहे. आज आमटे कुटुंबीयांची तिसरी पिढी समाजकार्यात आपले भरीव असे योगदान देत आहे. बाबांनी आपल्या आयुष्यात महात्मा गांधी, विनोबा भावे यांना आदर्श मानले. बाबांच्या संपूर्ण सामाजिक कार्यामध्ये त्यांच्या पत्नी साधनाताई यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे. तत्वशील आयुष्य जगत असताना बाबांकडे असणारी कार्याची स्पष्टता आणि त्यांच्या जगण्यातील माणुसकीचा भाव एक व्यक्ती म्हणून खूप भावतो. त्यांना गांधी शांतता, पद्मविभूषण असे अनेक पुरस्कार मिळाले. मात्र, ते नेहमी म्हणत विषण्ण माणूस आणि दु:खी मुलांच्या चेहऱ्यावरील हास्याचे मोल मला कुठल्याही पुरस्कारापेक्षा जास्त आहे बाबा व्यवसायाने वकील होते. मात्र, कोलकाता येथे जाऊन त्यांनी एक कोर्स करून वैद्यकीय ज्ञान मिळविले. त्या ज्ञानाच्या मदतीने ते असंख्य रुग्णांचे डॉक्‍टर झाले. देशातील विधायक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे बाबा हे स्फूर्तीस्थान होते. नर्मदा बचाव आंदोलन, भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी महत्वपूर्ण योगदान दिले. तरूणांना परिवर्तनवादी चळवळीचा भाग बनवीत त्यांच्यामध्ये समाजाप्रती कार्य करण्याचे बीज बाबांनी पेरले!

शिक्षण, आरोग्य, शेती, पर्यावरण, जलसंधारण, उद्योग, रोजगारनिर्मिती अशा नानाविध क्षेत्रांमध्ये प्रयोग करीत त्यामध्ये बाबांनी यश मिळविले. श्रम ही है श्रीराम हमारा म्हणत आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या भल्यासाठी व्यतित करीत, कृतीशील समाज सुधारकाचे आयुष्य जगणारे बाबा आमटे एक प्रेरकशक्ती म्हणून आपल्या कार्याच्या आणि विचारांच्या माध्यमातून जिवंत आहेत. अखंड सेवावृत्त धारण केलेल्या या महामानवाच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

– श्रीकांत येरूळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)