तूर :एकात्मिक पीक उत्पादन तंत्रज्ञान (भाग २) 

नारायण निबे  (विषय विशेषज्ञ, कृषिविद्या कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव ने 
पूर्वमशागत :- रब्बी हंगामाचे पिक निघाल्यानंतर जमिनीची चांगली खोल नांगरट करावी आणि उन्हाळ्यात जमीन चांगली तापू द्यावी. त्यामुळे जमिनीतील किडी, अंडी व कोष इ. नष्ट होतात. मान्सूनचा पाऊस झाल्यावर वापसा येताच 1-2 कुळवाच्या पाळ्या देऊन काडीकचरा स्वच्छ वेचून जमीन पेरणीसाठी तयार ठेवावी. शेवटच्या कुळवणीच्या अगोदर 5 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकावे.
स्थानिक उन्नत आणि संकरीत वाण : (योग्य वाणांची निवड) :- पक्वता कालावधीनुसार तुरीच्या वाणांची वर्गवारी तीन वर्गात करण्यात येते.
1. लवकर पक्व होणारे वाण – जे वाण 140 ते 160 दिवसात तयार होतात.
2. मध्यम कालावधीत पक्व होणारे वाण – जे वाण 160 ते 200 दिवसात तयार होतात.
टिप :- सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात मध्यम (160-200 दिवस) कालावधीत पक्व होणाऱ्या वाणांची लागवडीसाठी निवड केली जाते. परंतु बदलत्या हवामानात उशिरा सुरु होणाऱ्या पावसामुळे लवकर (140 ते 160 दिवस) पक्व होणाऱ्या तुरीच्या वाणांची लागवडीसाठी निवड करावी.
लागवडीचा हंगाम आणि लागवड :- पेरणीची वेळ : तुरीची पेरणी वेळेवर होणे आवश्‍यक आहे. तुरीची पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात करावी. पेरणी जसजशी उशिरा होईल तसतसे उत्पादन घटत जाते. यासाठी 10 जुलैपूर्वी तूर पिकाची पेरणी करून घ्यावी.
बियाणे प्रमाण :- आय.सी.पी.एल. 87 च्या पेरणीसाठी हेक्‍टरी 18 ते 20 किलो मध्यम मुदतीच्या राजेश्‍वरी, विपुला व ए.के.टी. 8811 वाणासाठी हेक्‍टरी 12 ते 15 किलो. तुरीची रोपाद्वारे लागवड करावयाची झाल्यास वरील शिफाराशीच्या निम्मे बियाणे लागते.
पेरणीचे अंतर :- अति लवकर तयार होणाऱ्या वाणांकरिता 45 बाय 10 सें.मी. लवकर तयार होणाऱ्या वाणांकरिता 60 बाय 20 सें.मी. लवकर तयार होणाऱ्या वाणांकरिता 45 बाय 10 सें.मी. आशादायक उत्पादनासाठी 180 बाय 30 सें.मी. किंवा 90 बाय 60 सें.मी.
बीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 2 ग्रॅंम. थायरम + 2 ग्रॅम कार्बेडॅंझीम किंवा 5 ते 10 ग्रॅंम. ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाण्यास चोळावे. यानंतर प्रत्येकी 250 ग्रॅंम. रायझोबियम + पी.एस.बी. 10 किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. (तक्‍ता पहावा)
 वरीलपैकी एक प्रकारच्या खतांच्या शिफारशीत खतांच्या मात्रा पेरणीच्या वेळी बियाण्यापासून 3 ते 5 से.मी. खोलीवर पेरणी करावी.
पाणी व्यवस्थापन :- तूर खरीप हंगामातील पिक असल्याने पावसावर वाढते. पण पावसात खंड पडल्यास आणि सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पुनर्लागवडीनंतर लगेचच 30 ते 35 दिवसांनी कळी अवस्थेत आणि 60 ते 70 दिवसांनी शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाणी द्यावे. तसेच हंगामात पावसाचा मोठा ताण पडल्यास 13 : 00 : 45 ग्रॅम 10 लिटर 10 दिवसाच्या अंतराने दोनदा फवारावे किंवा 2 टक्के युरिया /डी.ए.पी. ची फवारणी करावी.
आंतरमशागत :- पिकात 15 ते 20 दिवसांनी कोळपणी व पुढे 15 दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करावी. अधिक उत्पादनासाठी पिक पेरणीनंतर 45 ते 60 दिवस शेत तणविरहित ठेवावे.
तण नियंत्रण :- तुरीचे पिक पावसाळ्यात घेतले जात असल्यामुळे त्यात वेगवेगळ्या तणांचा प्रादुर्भाव होत असतो. सुरुवातीच्या काळात तूर 30 ते 45 दिवस सावकाश वाढते. यामुळे सुरुवातीच्या कातळ तणांचा प्रादुर्भाव जाणवतो.
तुरीचे पिक पेरणीपासून 45 दिवसापर्यंत तण विरहित ठेवल्यास तुरीच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते. त्यासाठी पिक 15 ते 20 दिवसांचे असताना पहिली व 30 ते 45 दिवसांचे असताना दुसरी खुरपणी करावी. परंतु पावसामुळे तसेच मजुरांच्या कमतरतेमुळे खुरपणी करणे शक्‍य होत नसल्यास रासायनिक तणनाशकाचा वापर खालीलप्रमाणे करावा.
आंतरपिक :- नैसर्गिक संसाधनांचा (पाणी, पोषण, तत्व आणि सूर्यप्रकाश) योग्य वापर करून आंतरपिक पध्दतीतून जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो. आंतरपिकामुळे मुख्य पिकाची जोखिम कमी करता येऊ शकते. तूर पिकाची लागवड रुंद सरीवर केली जात असल्यामुळे दोन ओळींमध्ये कमी कालावधीत येणारी आंतरपिके सहजासहजी घेता येतात. महाराष्ट्रात तूर पिकामध्ये खालीलप्रमाणे आंतरपिके घेण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.
बाजरी + तूर (2:1), तूर + सूर्यफूल (1:2) सोयाबीन + तूर (4 : 2) तूर + ज्वारी (1:2) किंवा (1 : 4) तूर + कापूस (1:6) किंवा (1 : 8) तूर + भुईमुग (1 : 3) तूर + मुग (1 : 3) तूर + उडीद (1 : 3)
शेंडे खुडणे : बॅगमध्ये बियाणे टाकल्यापासून 30 आणि 60 व्या दिवशी तुरीच्या झाडाचे शेंडे खुडल्यास फांदयाच्या संख्येत वाढ होऊन उत्पन्नात वाढ होते.
किडींची ओळख आणि नियंत्रण :- तुरीवरील किडींचे एकात्मिक नियंत्रण :- तुरीवर प्रामुख्याने हेलिकोव्हर्पा, शेंगमाशी, पिसारी पतंग या किडींच्या प्रादुर्भावाने पीक उत्पादनात घट येते. हे लक्षात घेऊन एकात्मिक पद्धतीने कीड नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.
(1) तुरीवरील हेलिकोव्हर्पाची अळी अळी लहान असताना पानावर, तर पीक फुलोऱ्यावर असताना कळ्या फुले व शेंगावर प्रादुर्भाव करते. सहसा पानांवरील प्रादुर्भाव आर्थिकदृष्ट्‌या नुकसानकारक नसतो. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचा प्रादुर्भाव कळी व फुलांकडे तर नंतरच्या अवस्था फुलांपेक्षा शेंगावर जास्त प्रमाणात आढळून येतात. अळी शेंगावर अनियमित आकाराचे छिद्र पाडून, अर्धी आत व अर्धी बाहेर राहून शेंगातील अपरिपक्व दाणे खाते.
2) तुरीवरील पिसारी पतंग – लहान अळी कळ्या, फुलांना छिद्र पाडून खाते. मोठी अळी तुरीच्या शेंगावरील साल खरडून शेंगांना छिद्र पाडून दाणे खाते, अळी शेंगेच्या आत कधीच शिरत नाही. पावसाळ्याच्या उत्तरार्धात या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसतो.
3) तुरीच्या शेंगावरील माशी – शेंगमाशीची एक अळी शेंगेच्या आत राहून एका दाण्यावर उपजीविका पूर्ण करते. अळीची प्रथमावस्था बिजावरणावर उपजीविका केल्यानंतर दाण्याला छिद्र पाडते. अळी शेंगातील दाणे अर्धवट कुरतडून खात असल्यामुळे दाण्यांचे मुकणी होते. असे बुरशीग्रस्त दाणे खाण्यासाठी अथवा लागवडीसाठी अयोग्य ठरतात. प्रादुर्भावग्रस्त बियाण्याची उगवण कमी होते. अशा बियाण्यास बाजारभावही कमी मिळतो. शेंगाच्या बाह्यनिरीक्षणावरून या अळीच्या प्रादुर्भाव लक्षण दिसून येत नाही. पूर्ण विकसित अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी बाहेर पडण्यासाठी शेंगेला छिद्र पाडते तेव्हा नुकसानीचा प्रकार लक्षात येतो.
एकात्मिक नियंत्रणाच्या उपाययोजना :- 1) उन्हाळ्यात जमिनीची नांगरणी केल्यामुळे किडींचे कोष पक्षी वेचून खातात, तीव्र उन्हामुळे कोष मरतात.
2) कीड प्रतिबंधक जातींचा वापर आर्थिक नुकसान कमी करण्यास मदत करतो.
3) शेतात दर हेक्‍टरी 20 पक्षी स्थानके उभारल्यामुळे अळ्यांची संख्या कमी होण्यास मदत होते.
4) तुरीसोबत ज्वारी, बाजरी, मका, मूग व सोयाबीन आंतरपीक म्हणून घेणे फायदेशीर ठरते.
5) हेलिकोव्हर्पा अळीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास तुरीचे झाड थोडेसे वाकडे करून हळुवार हलवून अळ्या पाडून नष्ट कराव्यात.
आर्थिक नुकसानीच्या पातळी :- लिंगाकर्षक सापळ्यात हेलिकोव्हर्पा नर पतंगांची संख्या सतत तीन दिवस प्रती सापळा 8-10 पेक्षा जास्त. हेलिकोव्हर्पा अळीच्या 1-2 अळ्या प्रती झाड. पिसारी पतंगाची अळी प्रती 2 झाडे. किंवा 5 टक्के प्रादुर्भावग्रस्त शेंगा आढळून आल्यास.
वनस्पतीजन्य किटकनाशके :- सुरवातीच्या काळात 5 टक्के निंबोळी अर्काची 10 दिवसाच्या अंतराने 2-3 फवारण्या कराव्यात.
जैविक नियंत्रण :-
1) तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या प्रभावी व्यवस्थापनाकरिता प्रती हेक्‍टर एच.एन.पी.व्ही. 500 रोगग्रस्त अळ्यांचा अर्क फवारावा.
2) विषाणूच्या फवाऱ्याची कार्यक्षमता अतिनील किरणात टिकविण्यासाठी अर्धा लिटर पाण्यात 50 ग्रॅम नीळ मिसळून हे द्रावण 1 मि.लि. प्रती लिटरप्रमाणे अर्कात मिसळून फवारणी करावी.
3) फवारणी शेतात प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्या असताना केल्यास अतिशय प्रभावी ठरते.
रासायनिक किटकनाशकांचा वापर :- तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी किडींनी आर्थिक नुकसानीची संकेत पातळी गाठल्यानंतर रेनाक्‍सीपार (कोराजन) 20 तवयवी एस.सी. 2.5 मि.लि. किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (5 टक्के) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
रोगांची ओळख आणि नियंत्रण :
तुरीवरील मर रोग : वर्षानुवर्ष एकाच शेतात रोगाला बळी पडणाऱ्या वाणांची लागवड केल्यास फ्युजेरीयम नावाच्या बुरशीची जमिनीत वाढ होते आणि ही बुरशी जमिनीत 2 ते 3 वर्षापर्यंत आपले वास्तव्य करते. मर रोगाचा प्रसार हा बियाणे आणि जमिनीत सुप्तावस्थेत असणाऱ्या बिजाणुंमुळे होतो. जमिनीचे तापमान 25 ते 28 अंश से. व ओलावा 20 ते 25 टक्के असल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसतो. रोगाचा प्रादुर्भाव पिकांच्या रोपावस्थेपासून ते पक्वतेपर्यंतच्या काळात केव्हाही होऊ शकतो. झाडांना कळ्या लागल्यापासून ते फुलोरा येणाऱ्या काळात त्यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर प्रथम झाडांची शेंड्याकडील पाने कोमेजू लागतात. कालांतराने पाने पिवळी पडतात, जमिनीकडे वळू लागतात, वाळतात. पाने गळून नंतर शेवटी फक्‍त तूरकाठीच राहते. काही झाडांवर जमिनीपासून ते खोडापर्यंत काही फुटांपर्यंत तपकिरी व नंतर काळा होत जाणारा पट्टा स्पष्ट दिसतो.
मुळावर काळे डाग पडल्याचे आढळून येते. खोडाचा उभा छेद घेतल्यास त्याचा मधला भाग संपूर्ण तपकिरी काळा पडल्याचे आढळून येते. हेच या रोगाचे मुख्य लक्षण आहे. शेतात एखाद्या-दुसऱ्या झाडावर रोगाचा प्रारंभ होतो. त्यानंतर त्या झाडाभोवतीची झाडे रोगग्रस्त होतात, तसेच शेतात ठिकठिकाणी रोगाची लागण झालेली दिसून येते. काही झाडांवर एकाच फांदीवर रोगाची लक्षणे दिसून येतात.
या रोगाचा प्रसार प्रामुख्याने रोगग्रस्त जमिनीतील बुरशी बीजाणूपासून होतो. वर्षानुवर्षे एकाच शेतात रोगाला बळी पडणाऱ्या वाणांची लागवड केल्यास जमिनीमध्ये फ्युजेरियम नावाच्या बुरशीची वाढ होऊन मर रोगाचा प्रसार होतो.
मर रोगाचा प्रसार हा बियाणे आणि जमिनीत सुप्त अवस्थेत असणाऱ्या बीजाणूमुळे होतो. हे बीजाणू जमिनीमध्ये वर्षानुवर्षे राहतात. जमिनीतील तापमान 25 ते 28 अंश से. ओलावा 20 ते 25 टक्के असल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणावर दिसतो.
नियंत्रणाचे उपाय :- पेरणीसाठी प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी.(उदा. फुले राजेश्‍वरी, बी.डी.एन.-1 व 2 बी.एस.एम.आर.-736, बी.एस.एम.आर. 853 व आय.सी.पी.एल. – 87 ).
(क्रमश:) 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)