तुळशीबागेत काम करत गाठले यशाचे “आकाश’

रात्रशाळेतील आकाश धिंडलेने बारावीत मिळवले 79%

प्रभात वृत्तसेवा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे,दि.30 – सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत तुळशीबागेत दुकानात येणाऱ्या महिलांना मेकअपचे साहित्य दाखवायचे, कधीकधी तर त्यांना ते आवडण्यासाठी थोडासा साजही स्वत:वर चढवायचा आणि दुकानातून दमून भागून घरी जाण्याऐवजी शाळेत जायचे असा दिनक्रम वर्षभर पाळत पुना नाईट हायस्कूलमधील आकाश धिंडले या विद्यार्थ्याने इयत्ता बारावीच्या परीक्षेत 79.23 टक्‍के गुण मिळवत हायस्कूलमध्ये प्रथम येण्याचाही मान मिळवला आहे.

पुना नाईट हायस्कूल व श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिवसा कष्ट करत व रात्रीच्या वेळी अभ्यास करत नेत्रदीपक यश मिळवले आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षेत वाणिज्य शाखेत 79.23 टक्‍के मिळवत आकाश धिंडले याने प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. दिनेश यादव या विद्यार्थ्यांने 75.69 टक्‍के गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळवला आहे तर विठ्ठल ईश्‍वरकट्टी या विद्यार्थ्यांने 75.23 टक्‍के गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळवल्याची माहिती प्राचार्य अविनाश ताकवले यांनी दिली.

सरस्वती विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष प्रा.विनायक आंबेकर म्हणाले, हे विद्यार्थी दिवसा कष्ट करुन रात्रीच्या वेळी शिक्षण घेतात, अशा विद्यार्थ्यांना सरस्वती विद्या मंदिर संस्थेच्या माध्यमातून मोफत पाठ्यपुस्तके, वह्या आदी शैक्षणिक साहित्य दिले जाते. त्यांच्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांच्या व्याख्यानमालेचेही आयोजन केले जाते. तसेच त्यांना अभ्यासासाठी अभ्याससिकेलचीही सोय करण्यात आली आहे. प्रथम येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी संस्थेने स्वीकारली आहे.

आकाश म्हणाला, मी सध्या मी पुण्यात चुलतीकडे राहतो आहे. आई, वडिल व भाऊ हे गावी राहतात. तर दिनेश यादव म्हणाला, मी पुण्यात भाऊ आणि वहिनीबरोबर रहातो. आई व बहिण गावी असतात. मी याआधी हॉटेलमध्ये काम करत होतो. त्यानंतर मी आता क्‍लिनिकमध्ये काम करत आहे. घरची परिस्थिती फारशी चांगली नसल्याने मी नोकरी करत शिकण्याचा निर्णय घेतला. सध्या तरी वाणिज्य शाखेतील पदवी घ्यायची आहे. अजून पुढे काय करायचे हे ठरविले नाही.

वयाच्या तिशीतही शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास
खरे तर एकदा जबाबदारी आली की शिक्षण राहूनच जाते असे म्हटले जाते. मात्र हे वाक्‍य खोटे करत विठ्ठल ईश्‍वरकट्टी या प्रशालेत तिसऱ्या आलेल्या 30 वर्षीय विद्यार्थ्यांने 75 टक्‍के गुण मिळवले. 2005 साली घरचे कर्ज, आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. मात्र वयाच्या तिशीतही घरातील परिस्थिती सुधारायला लागल्यानंतर बारावीपर्यंचे शिक्षण काम करत करत पूर्ण करण्याचा ध्यास घेत ईश्‍वरकट्टी यांनी परीक्षेत यश मिळवले.

घरची परिस्थिती फारशी चांगली नसल्याने मी काम करत शिकण्याचा पर्याय निवडला. सकाळी 10.30 ते 6 पर्यंत दुकानात काम केल्यानंतर मी संध्याकाळी साडेसहा ते 9.30 या वेळेत रात्रशाळेत जात असे. रोज अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नसे. परंतु परीक्षेच्या काही दिवस आधी मी सुट्टी घेऊन अभ्यास केला होता. पुढे जाऊन मला सीएस करायचे आहे व त्यानंतर मला सीए व्हायचे आहे.
आकाश धिंडले, विद्यार्थी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)