तुम्ही फक्‍त पत्रकबाजीच करा

अशोक मोने यांचा राजेशिर्के यांना टोला : नेत्यांनी तुमचे अधिकार काढल्याचे कारण जाहीर करा

सातारा, दि. 26 (प्रतिनिधी) – दस्तुरखुद्द नेत्यांनीच कानपिचक्‍या देवून यापुढे सातारा नगराध्यक्षा अथवा कोणीही परस्पर निर्णय घेवू नयेत. काम मंजूर करताना मला विचारावे, असे आदेश देवून नगराध्यक्षांसह साविआ आघाडीतील सर्वांचेच अधिकार काढून घेतले. हे सत्तारुढ आघाडीतील दुफळीमुळे झाले का टक्‍केवारीसाठी लागलेल्या कळवंडीमुळे, याचे उत्तर उपनगराध्यक्ष सुहाश राजेशिर्के देतील का? असा टोला विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी लगावला. दरम्यान, आता पालिकेचा कारभार थेट जलमंदीरवरुन चालणार असल्याने तुम्ही फक्‍त खुर्चीवर बसून पत्रकबाजीच करा, असा टोमणाही त्यांनी मारला.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात मोने यांनी म्हटले आहे की, साविआमध्ये झालेली दुफळी शहराच्या विकासासाठी दुफळी झालेली नाही, हे सातारकरांना कळून चुकले आहे. तुमच्या टक्‍केवारीच्या कळवंडीला कंटाळूनच तुमच्या नेत्यांनी तुम्हाला कानपिचक्‍या देवून नगराध्यक्षा आणि तुमचे अधिकार काढून घेतल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागात काम करताना फार दिवे लावले, स्वेच्छानिवृत्ती घेवून भाऊबंदकीच्या जीवावर राजकारणात आलात. त्यामुळे तुम्हाला सामान्य जनतेच्या समस्या काय कळणार? असा सवाल मोने यांनी केला आहे. मी सलग 30- 35 वर्ष निवडून येत आहे. हे तुम्हीच सांगताय. मी सातारकांसाठी तसे काम केले आहे, म्हणूनच मी सातत्याने निवडून येत आहे. हे टक्‍केवारीसाठी पालिकेत येणाऱ्यांना ते कळणारही नाही आणि रुचणारही नाही.
मी आणि अविनाश कदम यांच्यात विकासकामांवरुनच मतभेद होते. तुमच्यातील दुफळी विकासकामांवरुन असती तर नेत्यांनी कान उपटले नसते आणि तुमचे अधिकार काढून घेण्याची वेळ आली नसती. साधा एक छोटा पूल बांधता येत नाही आणि कास धरण उंची वाढवणे, ग्रेड सेपरेटर यासारखी कामे आमच्या नेत्यांनी आणली, असा ढोल बडवण्याचा उद्योग सुरु आहे. परंतु, कास धरणाची उंची वाढवण्याचे काम आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यामुळेच मंजूर झाले आहे, हे सुज्ञ सातारकरांना माहिती आहे. कोटेश्‍वर पूल पाडल्यानंतर त्याचे काम रखडून ठेवले. शाहुपूरीतील नागरिकांना सातारा शहराला वळसा घालून जावे लागत आहे, उद्यानांची दुरावस्था, रस्त्यांतील खड्डे, भरुन वाहणाऱ्या कचराकुंड्या याला जबाबदार कोण आहे? याचे उत्तर खोट्या पत्रकबाजीत महारथ हासिल केलेल्या उपनगराध्यक्षांनी द्यावे, असे आव्हानही मोने यांनी राजेशिर्के यांना दिले आहे.
सातारकर जनतेने तुम्हाला विश्‍वासाने सत्ता दिली. त्यामुळे न केलेल्या कामांचा ढोल बडवत बसण्यापेक्षा नागरिकांच्या मुलभूत गरजा तरी पुर्ण करा. किमान लोकसभेच्या निवडणूकीपर्यंत टक्‍केवारीपासून बाजूला रहा, नेत्यांना तरी फायदा होईल, असे मोने यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)