आढळराव पाटील यांची राष्ट्रवादीवर टीकेची झोड : तळेगाव ढमढेरे परिसरात संपर्क दौरा
तळेगाव ढमढेरे- गेल्या 15 वर्षांत राज्यात सत्ता उपभोगली. नंतरही त्यांनी केवळ भ्रष्टाचारा व्यतिरिक्त काही केलं नाही, म्हणूनच जनतेने त्यांना नाकारले. आज ते विचारतात मी काय केलं? पण त्यांना मी एकच सांगू इच्छितो की, हजारो कोटींची विकास कामे आणि निष्कलंक प्रतिमा याच्या बळावरच मी ताठ मानेने जनतेपुढे कौल मागायला आलो आहे. तुमच्यासारखं तोंड लपवून फिरण्याची वेळ माझ्यावर आलेली नाही अशा शब्दांत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवली. तळेगाव ढमढेरे येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते.
खासदार आढळराव पाटील आज (दि. 2 एप्रिल रोजी) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, दरेकरवाडी, धानोरे, विठ्ठलवाडी, टाकळी भीमा, शिवतक्रार म्हाळुंगी, पारोडी, इंगळेनगर, दहिवडी उरळगाव, अरणगाव, आलेगाव पागा, राक्षेवाडी आणि रांजणगाव सांडस आदी गावांचा जनसंपर्क दौरा केला. या दौऱ्यात शिवसेना- भाजप- आरपीआय- रासप महायुतीचे पदधिकारी व कार्यकर्ते यांनी एकजुटीचे दर्शन घडवीत शिरुर तालुक्यात चांगला समन्वय साधल्याचे दिसून आले. या जनसंपर्क दौऱ्यात भाजपा आमदार बाबुराव पाचर्णे, आरपीआयचे तालुका अध्यक्ष नवनाथ कांबळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, तालुकाप्रमुख पोपट शेलार, भाजपा तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल गवारे, संभाजीराव ढमढेरे, संदीप ढमढेरे, रोहिदास शिवले, चेतना ढमढेरे, बापूसाहेब शिंदे, राजेंद्र भुजबळ, डॉ. सुधीर ढमढेरे, चंद्रकांत भुजबळ आदी सहभागी झाले होते.
शिरुरच्या जनतेने मला त्यांचा खासदार म्हणून निवडून दिलं आहे. त्यांच्या हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून आजवर केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी तुमच्यासमोर आलो आहे. खासदारनिधी, पंतप्रधान ग्रामसडक योजना, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून तळेगाव ढमढेरे-रांजणगाव सांडस या एकाच जिल्हा परिषद गटात जवळपास 26 कोटींची कामे मी केली आहेत तर संपूर्ण मतदारसंघात सुमारे 14 हजार कोटींहून अधिक रकमेची कामे केली आहेत. मी केलेल्या कामांची कार्यपुस्तिका जनतेला सादर केली आहे. पण मला तुम्हाला विचारायचे आहे की, यापूर्वी राष्ट्रवादीच्या खासदाराने तुम्हाला कार्यअहवाल सादर करण्याचे धाडस केले होते का? पंधरा वर्ष राज्यात यांचं सरकार होतं, पण केवळ टक्केवारीचं राजकारण करण्यात मशगूल असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धरणांच्या कामात भ्रष्टाचार केला. त्यामुळेच आज महाराष्ट्राला दुष्काळाचा सामना करावा लागतोय, अशी कठोर टीका खासदार आढळराव पाटील यांनी केली.
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेसारखा रु. 7500 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असेल वा नाशिकफाटा ते खेड रस्त्याचे सहापदरीकरण, राजगुरुनगर ते सिन्नर रस्त्याचे चौपदरीकरण, तळेगाव-चाकण-शिक्रापूर-न्हावरा रस्त्याचे रुंदीकरण, पुणे-नगर रस्ता यांसह हजारो कोटींचे प्रकल्प मंजूर करण्यासाठी गेल्या पाच वर्षांत मी माझे सर्वस्व पणाला लावले. या सर्व कामांना मंजुरी मिळाली असून आगामी काळात हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याला माझे प्रथम प्राधान्य राहणार आहे.
आज सकाळी साडेदहा वाजता तळेगाव ढमढेरे गावात जोरदार रॅलीद्वारे काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच ग्रामस्थांनी ठिकठिकाणी खासदार आढळराव पाटील यांचे जोरदार स्वागत केले.
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी जगात भारताची प्रतिमा उंचावली. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करुन दहशतवादी हल्ले करणाऱ्या अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करुन भारतीय जनतेच्या अपेक्षांची पूर्ती केली. भ्रष्टाचाराला आळा घालून शासकीय योजनांचे अनुदान थेट लाभार्थींच्या बॅंक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेऊन भ्रष्टाचाराला आळा घातला. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून रस्ते असेल, जलयुक्त शिवार असेल, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भ्रष्ट कारभारामुळे बंद पडलेली धरणांची कामे पूर्ण करणे अशी असंख्य कामे युतीच्या सरकारने केली आहेत. आजवरच्या कुठल्याही खासदाराने केली नसतील इतकी कामे आढळरावदादांनी केली आहेत.
-बाबुराव पाचर्णे, आमदार शिरूर-हवेली (भाजप)