तुकोबांच्या पालखीचे 5 जुलैला प्रस्थान

आषाढी वारी : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा कार्यक्रम जाहीर

देहुरोड – जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 333 व्या पालखी सोहळ्याला श्री क्षेत्र देहुगाव येथून ज्येष्ठ कृष्ण सप्तमी गुरुवारी 5 जुलै रोजी प्रस्थानाने प्रारंभ होणार आहे. 7 जुलैला पालखी सोहळा पुण्यात आणि 22 जुलैला श्री क्षेत्र पंढरपूरला पोहचणार आहे. हा पालखी सोहळा 27 जुलैला परतीच्या प्रवाससाला सुरवात करणार असून, सोहळ्याची 8 ऑगस्टला देहूच्या मुख्य मंदिरात समारोप होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अधिक मास (महिना) असल्याने सोहळा कार्यक्रमास नेहमी पेक्षा आठवड्या भराच्या फरकानंतर प्रारंभ होत आहे. परतीच्या प्रवासात एक तिथी वाढल्याने हडपसर येथील मुक्काम वाढविण्यात आले असल्याची माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प बाळासाहेब मोरे यांनी पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प सुनील दामोदर मोरे, ह.भ.प विठ्ठल मोरे, ह.भ.प अशोक मोरे, विश्‍वस्त ह.भ.प. अभिजीत मोरे, ह.भ.प. जालिंदर मोरे, ह.भ.प. सुनील दिगंबर मोरे यांच्या उपस्थीत देण्यात आली आहे. संस्थानच्या वतीने पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

परंपरेनुसार यंदा पालखीचा पुणे येथील नानापेठेतील श्री निवंडुंगा विठ्ठल मंदिरात दोन दिवस मुक्काम वगळता प्रत्येक ठिकाणी एकच मुक्काम होणार आहे. या पालखी सोहळ्याच्या दरम्यान प्रथेप्रमाणे बेलवडी येथे पहिले गोल रिंगण होणार असून, इंदापूर, सराटी येथील माने विद्यालयाजवळ व माळीनगर येथे उभे रिंगण, तोंडले बोंडले येथे धावा तर बाजीराव विहिरीजवळ आणि वाखरीवर भाविकांना उभे रिंगण पहायला मिळणार आहे.

पालखी सोहळा कधी कुठे…
देहूतील मुख्य मंदिरातून 5 जुलै रोजी पालखी प्रस्थान होणार आहे. पहिला मुक्काम श्री क्षेत्र देहूगाव येथील इनामदार साहेब वाड्यात होईल. 6 जुलै आकुर्डी विठ्ठलमंदिर, 7 व 8 जुलै श्री निवंडुंगा श्री विठ्ठल मंदिर पुणे, 9 जुलै लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिर, 10 जुलै यवत, 11 जुलै वरवंड, 12 जुलै उंडवडी गवळ्याची, 13 जुलै बारामती शारदा विद्यालय, 14 जुलै सणसर, 15 जुलै (बेलवडी येथे गोल रिंगण) निमगाव केतकी, 16 जुलै इंदापूर येथे (गोल रिंगण) इंदापूर, 17 जुलै सराटी, 18 जुलै अकलूज (माने विद्यालय येथे गोल रिंगण), 19 जुलै बोरगाव (माळीनगर येथे उभे रिंगण), 20 जुलै पिराची कुरोली (तोंडले बोंडले येथे धावा), 21 जुलै वाखरी तळ (बाजीराव विहिर येथे उभे रिंगण) मुक्काम करणार असून, पालखी 22 जुलै रोजी दुपारी एक वाजल्यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. रात्री पंढरपूर शहरात श्री संत तुकाराम महाराज मंदिरात मुक्कामी विसावणार आहे. तर 23 जुलैला नगर प्रदक्षिणा करून पालखी 27 जुलै दुपारी एक वाजेपर्यंत पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहे. 27 जुलैला दुपारी श्री क्षेत्र पंढरपूरवरून परतीच्या प्रवासाला सुरूवात करणार आहे.

असा असेल परतीचा प्रवास
तुकोबांची पालखी 27 जुलै वाखरी, 28 जुलै महाळुंगे माकडाचे, 29 जुलै वडापुरी, 30 जुलै लासुर्णे, 31 जुलै बऱ्हाणपूर, 1 ऑगस्ट हिंगणीगाडा, 2 ऑगस्ट वरवंड, 3 ऑगस्ट उरूळी कांचन, 4 ऑगस्ट हडपसर येथील बंटर हायस्कूल, 5 आणि 6 ऑगस्ट नवी पेठ पुणे येथील श्री विठ्ठल मंदिर,7 ऑगस्ट पिंपरी येथील श्री भैरवनाथ मंदीर , 8 ऑगस्ट रोजी श्री क्षेत्र देहूगाव येथे पालखी सोहळ्याची सांगता होईल.

संत तुकाराम पालखी सोहळा प्रमुखाची नावे जाहीर
श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी 333 वा पालखी सोहळ्यातील पालखी सोहळा प्रमुखाची नावे जाहीर करण्यात आली आहे. पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प सुनील दामोदर मोरे, ह.भ.प विठ्ठल मोरे, ह.भ.प अशोक मोरे यांची नावे विश्‍वस्त ह.भ.प अभिजीत मोरे, ह.भ.प जालिंदर मोरे, ह.भ.प सुनील दिगंबर मोरे यांच्या उपस्थित संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प बाळासाहेब ऊर्फ पंढरीनाथ मोरे यांनी जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)