अग्रलेख | तुका म्हणे जाय नरकलोका

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्याविरोधातील बलात्कार प्रकरणात बुधवारी जोधपूरमधील येथील न्यायालयाने आसाराम बापूसह शरद व शिल्पी या दोन आरोपींना दोषी ठरवले असून आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आसारामवर होता.

आसाराम व नारायणसाई या दोघांनाही अटक झाली, तरी राजस्थान सरकारच्या आदर्श पुरुषांच्या पुस्तकात त्याचा धडा आणि मोठा फोटो होता. त्यावर आवाज उठविल्यानंतर तो भाग काढून टाकण्यात आला. कथित अध्यात्माच्या जोरावर आणि उच्चपदस्थांशी असलेल्या संबंधाच्या जोरावर आपली कृष्णकृत्ये झाकून जातील, असे आसाराम व त्याच्या मुलाला वाटले असेल; परंतु तो त्यांचा भ्रम होता.

77 वर्षे वय असलेल्या आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावणाऱ्या न्यायालयाने शरद व शिल्पी या सहआरोपींनाही प्रत्येकी 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा ऐकल्यानंतर आपले उर्वरित आयुष्य तुरुंगातच जाणार याची कल्पना आलेला आसाराम कोर्टात ढसाढसा रडला. कितीतरी नाजूक कळ्या उमलण्याआधी कुस्करल्या जात होत्या, तेव्हा त्याला या कळ्यांचे हुंदके ऐकू आले नाहीत. मूळच्या उत्तर प्रदेशच्या शहाजहॉंपूर येथील असलेल्या आणि आसाराम याच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आश्रमात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती.

आसारामने जोधपूरनजीकच्या मनाई भागातील आश्रमात बोलावून 15 ऑगस्ट 2013 च्या रात्री आपल्यावर बलात्कार केल्याचा तिचा आरोप होता. आसारामला इंदूरहून अटक करून 1 सप्टेंबर 2013 रोजी जोधपूरला आणण्यात आले होते. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी आसाराम व 4 सहआरोपींवर 6 नोव्हेंबर 2013 रोजी आरोपपत्र दाखल केले होते. आसाराम स्वतःला संत म्हणवून घेत होता. संतत्त्वाच्या पडद्याआडून त्याची कृष्णकृत्ये चालू होती. संत तुकाराम महाराजांनी केलेल्या संतत्त्वाच्या व्याख्येत आसाराम कोठेही बसत नाही. धर्माच्या नावाखाली धार्मिक कर्मकांडांची अवडंबरे माजवून हे तथाकथित साधू, संत, बाबा, महाराज स्वत:च्या तुंबड्या भरत असतात.

कान फाडूनियां मुद्रा तें घालिती।
नाथ म्हणविती जगामाजीं।।
घालोनिया फेरा मागती द्रव्यासी।
परि शंकरासी नोळखती।।
पोट भरावया शिकती उपाय।
तुका म्हणे जाय नरकलोका।

असे संत तुकाराम महाराज म्हणतात, ते आसारामबापूंच्या बाबतीत प्रत्यक्षात खरे ठरले आहे. अशा लोकांची जागा नरकातच असते, असे ते जे म्हणतात, ते योग्य आहे. आसारामांसारख्या अनेक अपप्रवृत्ती सध्या संताच्या, बाबा-बुवांच्या रुपाने वाढलेल्या आहेत, त्यांच्याबाबतीत संत तुकाराम म्हणतात,

ऐसें कैसें झाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधु।।
अंगा लावुनिया राख। डोळे झांकूनि करिती पाप।।
दावूनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा।।

लैंगिक शोषणाचा त्याचा वारसा त्याचा मुलगा नारायणसाईही पुढे चालवीत होता. त्याच्यावर बलात्काराचे वेगळे गुन्हे दाखल आहेत. संपत्ती, अध्यात्मिक वलय, उच्चपदस्थांशी असलेले संबंध आणि अंधभक्‍तांच्या जीवावर आपण कायदा आपल्याला म्हणू तसा वाकवू शकतो, असा जो मुजोरपणा त्याच्याकडे आला होता, त्याला न्यायालयाच्या निकालाने चांगलीच चपराक बसली आहे.

आसाराम व त्याचा मुलगा वेगवेगळ्या प्रकरणात तुरुंगात असताना त्याच्या भक्त परिवाराने बाहेर धुडगूस घातला होता. या प्रकरणातील एकूण 44 साक्षीदारांपैकी नऊ साक्षीदारांवर जीवघेणे हल्ले झाले. त्यातील तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण अद्याप बेपत्ता आहे. इतर साक्षीदारांनाही जीवे मारण्याची धमक्‍या येत आहेत. एक नाही, तर अनेक अल्पवयीन मुली, तसेच काही महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप आसाराम व त्याच्या मुलावर होते. त्यातील एका प्रकरणाचा हा निकाल आहे.

आसारामबापूसह शिल्पी, शिवा, प्रकाश आणि शरदचंद्र या सर्वांना न्यायालयाने दोषी ठरवले. आसारामला शिक्षा झाल्यामुळे आपल्याला न्याय मिळाला असल्याची जी भावना पीडितेच्या वडिलांनी व्यक्‍त केली आहे, ती महत्त्वाची आहे. या पीडितेच्या वडिलांनी इतके दडपण, दबाव असताना आसारामला अटक होत नाही, तोपर्यंत केलेले उपोषणच त्याला गजाआड घेऊन गेले. विषयलोलूप असणाऱ्यास संत म्हणणे हा संतत्वाचा अपमान आहे. आसाराम यांच्याबाबतीत संत तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचे, तर अशा कथित संताला “मोजूनी पैजारा’ मारल्या पाहिजेत.

जोधपूरच्या न्यायालयाने ती जबाबदारी अतिशय उत्तमरीतीने पार पाडली आहे. आसाराम व नारायणसाई या दोघांनाही अटक झाली, तरी राजस्थान सरकारच्या आदर्श पुरुषांच्या पुस्तकात त्याचा धडा आणि मोठा फोटो होता. त्यावर आवाज उठविल्यानंतर तो भाग काढून टाकण्यात आला. कथित अध्यात्माच्या जोरावर आणि उच्चपदस्थांशी असलेल्या संबंधाच्या जोरावर आपली कृष्णकृत्ये झाकून जातील, असे आसाराम व त्याच्या मुलाला वाटले असेल; परंतु तो त्यांचा भ्रम होता. कायद्याचे हात लांब असतात आणि ते शिक्षेचा फास गळ्याभोवती आवळू शकतात, असे जोधपूर न्यायालयाच्या निकालाच्या निमित्ताने दिसले.

शिक्षणासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी आलेल्या मुलींच्या असाह्यतेचा फायदा घेऊन त्यांची अब्रू आसाराम लुटत होता. देशभर वाढत असलेल्या बलात्कारांच्या घटना आणि त्याविरोधात असलेला आक्रोश लक्षात घेता आसारामच्या बाबतीत ज्या काही प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रिया असतील, त्या लवकर पूर्ण करून त्याला शिक्षा झाली, तर लोकांचा कायद्यावरचा आणि न्यायालयावरचा विश्‍वास वाढेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील अग्रलेख वाचण्यात आला जिथे ह्या देशाच्या लोकशाहीचीच अब्रू खुलेआम लुटली जात आहे व हे लुटणारे आपल्या तुंबड्या भारत आहेत तिथे आसाराम सारख्या भोंदूने माया जमविण्यासाठी वेगळा मार्ग आचाराला त्यात आस्चर्य वाटण्याचे कारणच काय ?प्रत्यक्ष शिक्षा जेव्हा अमलात येईल तेव्हाच त्याच्या दुष्क्रुत्यांना शिक्षा झाली असे समजावे लागेल कारण सत्तात्त बदलली कि दिलेला न्याय बदलण्याचे प्रकार आपल्या लोकशाही देशात झालेच ना ? व होत आहेत ना ? ह्या लोकशाही देशात न्याय मिळवावयाचा असेल तर एकतर सत्तात हातात हवी अथवा न्याय मिळविण्या जोगा पैसे घाटीशी हवा कारण आपण सर्वच विकाऊ आहोत यंदा कदाचित हा आसाराम जेल बाहेर आलाच तर ह्याच्यावर आज टीका करणारच त्याची तोंड फाटेस्तोवर जाहीर स्तुती करताना दिसतील आता न्यायालया नुसार शिक्षेची अंमलबजावणी झालीच तर आसारामने त्याने ज्या मार्गाने अमाप संपत्ती गोळा केली व ती करताना ज्यांनी हातभार लावला त्याचा लेखी तपशील जाहीर करावा तसे केल्यास नरकात गेल्यावर पापाची कबुली दिल्याने काही प्रमाणात सूट मिळण्याची श्यक्यता आहे जसा वाल्याचा वाल्मिक झाला तसा आसारामचा मर्यादा पुरषोत्तम राम होण्याची श्यक्यता नाकारता येईल का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)