तीन महिन्यात परस्पर संमतीने घटस्फोट

अपवादात्मक परिस्थितीमुळे सहा महिन्याचा वेटींग पिरीअड न्यायालयाने वगळला

पुणे- दोघेही उच्चशिक्षित… त्याला सरकारी नोकरी..तर ती आयटी कंपनी मोठ्या पदावर कार्यरत…दोघांचे लग्न झाले…मात्र, त्यानंतर काही दिवसातच दोघांमध्ये वैचारिक मतभेद सुरू झाले…दोघांचे पटेनासे झाले…दोघांनी वेगळे राहण्यास सुरूवात केली…तिला नोकरीसाठी परदेशात जायचे होते…तर त्याचीही पदली होणार होती…दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दावा दाखल केला. विशेष म्हणजे अवघ्या तीन महिन्यात हा दावा निकाली काढत न्यायालयाने दोघांना घटस्फोट मंजुर केला. परस्पर संमतीने दावा दाखल केल्यानंतर सहा महिन्याचा वेटींग पिरीअड असतो. मात्र, हा पिरीअड वगळून न्यायालयाने घटस्फोटाचा दावा मान्य केला.
कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश सुभाष काफरे यांनी हा आदेश दिला आहे.
माधव आणि माधवी ( दोघांची नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघांनी न्यायालयात घटस्फोट मिळावा म्हणून दावा दाखल केला होता. माधवी उच्चशिक्षित असून ती पुण्यातील एका आयटी कंपनीत मोठ्या पदावर काम करते. तर माधव सरकारी नोकरी करतो. दोघांचे ऑक्‍टोबर 2014 मध्ये लग्न झाले. त्यांना एक मुलगा आहे. वैचारिक मतभेदामुळे त्यांचे एकमेकांशी पटनासे झाले. त्यांना एकमेकांबरोबर संसार करणे कठीण झाले. त्यामुळे ते 18 महिन्यांपासून वेगळे राहत होते. त्यांनी परस्परसंमतीने घटस्फोट मिळावा म्हणून ऍड. शशिकांत बागमार, ऍड. निनाद बागमार यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला.
दरम्यानच्या काळात माधवीला कंपनीमार्फत इंग्लंडला कंपनीच्या एका प्रोजेक्‍टसाठी जायचे होते. तिला प्रोजेक्‍टमध्ये महत्त्वाची जबाबदारी होती. तर त्याची सरकारी नोकरी असल्यामुळे त्याची बदली होणार होती. त्या दोघांनाही पुण्यात थांबणे शक्‍य नव्हते. त्यांच्या वकिलांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. घटस्फोट मिळण्यासाठी लागणारा सहा महिन्याचा कालावधी वगळण्यात यावा, असा अर्ज त्यांनी दिला. अपवादात्मक परिस्थितीमध्ये घटस्फोट मिळण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी वगळणे गरजेचा आहे, असा युक्तीवाद वकिलांनी केला. न्यायालयाने तीन महिन्याच्या आत दोघांचा अर्ज मान्य केला. हिंदु विवाह कायदा कलम 13 ब प्रमाणे पती पत्नी सहसंमतीने घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज करु शकतात. हा अर्ज करण्यासाठी पती पत्नी एकमेकांपासून एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी वेगळे राहत असतील तर हिंदु विवाह कायद्याचे कलम 13 ब प्रमाणे कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट मिळावा म्हणून अर्ज दाखल करु शकतात. हा अर्ज निकाली काढण्यासाठी अर्ज केल्यापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत थांबण्याची तरतूद कायद्यात होती. मात्र अपवादात्मक परिस्थितीमध्ये सहा महिन्याचा कालावधी वगळण्यात यावा, असा आदेश या दाव्यात न्यायालयाने दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)