तीन तासांत 15 गावांत 1800 घनमीटर खोदकाम

बारामतीच्या जिरायती भागात “मी बारामतीकर’च्या माध्यमातून महाश्रमदान : 7 हजार 640 हात राबले

बारामती- सत्यमेव जयते वॉटर कप, पाणी फाउंडेशन व बारामतीतील ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या यांच्या संयुक्‍त विद्यमाने राबवण्यात आलेल्या “मी बारामतीकर’ अभियानातून रविवारी (दि. 5) तालुक्‍यातील 15 गावांमध्ये महाश्रमदान करण्यात आले. त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील 7 हजार 640 नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत तीन तसांत 1800 घनमीटर खोदकाम केले. त्यामुळे येत्या काळात बारामतीच्या जिरायत भागांची पाणी समस्या सुटण्यासाठी मदत होणार आहे.

बारामती तालुक्‍यातील काऱ्हाटी, भिलारवाडी, जराडवाडी, चौधरवाडी, जळगाव सुपे, देऊळगाव रसाळ, नारोळी, सायबाची वाडी, सुपे, दंडवाडी, सिद्धेश्‍वर निंबोडी, मोढवे, मुर्टी या गावामंध्ये महाश्रमदान करण्यात आले. जिरायती गावाच्या दुष्काळमुक्‍तीला गावापासून ते शहरापर्यंत साऱ्यांचाच हातभार लागावा व गावकऱ्यांना पाठबळ मिळावे या हेतूने झालेल्या या महाश्रमदानात तालुक्‍यातील हजारो श्रमदात्यांनी सहभाग घेतला. रविवारी तीन तासांत झालेल्या महाश्रमदानात 1800 घनमीटर खोदकाम करण्यात आले, ज्यातून पहिल्या पावसात एकावेळी तालुक्‍यात एवढे पाणी साठणार आहे.

या महाश्रमदानासाठी गेल्या 20 दिवसांपासून नियोजन सुरू होते. या नियोजनात अगदी प्रत्येक गावांत अधिकाधिक श्रमदाते नियोजनपूर्वक जातील व कोणत्याही गावात किमान दीड हजारांपेक्षा संख्या कमी राहणार नाही याची काळजी घेतली जात होती. एकाच दिवशी एकाच वेळी 15 गावांत हजारोंनी टिकाव, खोरी हातात घेऊन खोदलेले सलग समतल चर येणाऱ्या पावसाळ्यात पहिल्याच पावसात त्या गावाला आश्‍वासक दिलासा देतील या दृष्टीने केलेले हे नियोजन प्रथमदर्शनी यशस्वी ठरले.

या महाश्रमदानात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, महाश्रमदानाच्या आयोजक सुनंदा पवार यांनी स्वतःही यामध्ये सहभाग घेतला. अजित पवार यांनी जराडवाडी येथे भेट देऊन श्रमदान केले व सहभागी श्रमदात्यांचे कौतुक केले. राजेंद्र पवार यांनी सायंबाचीवाडी येथे श्रमदान केले. रोहित पवार यांनी 15 गावांना भेटी देत युवकांबरोबर श्रमदान करीत स्वयंसेवकांचे कौतुक केले.

 • बारामतीच्या जिरायत भागातील 24 गावांना वर्षांनुवर्षे पाण्याचा प्रश्‍न भेडसावतो आहे. दरम्यान, या ठिकाणी योजना राबवल्या असल्या तरी त्याला मागील पाच वर्षांत सरकारचे सहकार्य लाभत नाही. या पार्श्‍वभूमीवर येणाऱ्या पावसाळ्यात या श्रमदानाचे फळ मिळेल. शेतकऱ्यांच्या पाण्याबाबत सरकारने सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी.
  – रोहित पवार, जिल्हा परिषद सदस्य
 • 4 ते 70 वर्षे वयोगटातील हात राबले
  चार वर्षांच्या चिमुकल्यापासून ते 70 वर्षांच्या आजोबांबरोबरच माजी उपमुख्यमंत्र्यांपासून वेगवेगळ्या भागातील हजारो नागरिकांचे हात या श्रमदानाच्या निमित्तान राबले. बारामतीच्या 15 गावांमधील माळरान हजारोंच्या गर्दीने फुलली. ती केवळ “मी बारामतीकर’ अभियानातून झालेले महाश्रमदानाच्या निमित्ताने. या अभियानाची फलनिष्पती आता पावसाळ्यातच पाहायला मिळून बारामतीच्या जिरायत भागाच्या जनतेला दिलासा मिळेल हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्‍त होऊ लागली आहे.
 • तालुक्‍यातील गावांमध्ये जलमित्र, ग्रामस्थांचे श्रमदान
  गावे…जलमित्र…ग्रामस्थ…एकूण
  देऊळगाव …200…200… 400
  दंडवाडी…200…150…350
  जळगाव सुपे… 140…110…250
  काराटी… 50…820…870,
  नारोली… 150…70…220
  जोगवडी…300…200…500
  चौधरवाडी… 700…150…850
  भिलारवाडी…150…50…200
  सुपे…500…500…1000
  सायंबाचीवाडी…1250…250..1500
  कऱ्हावागज…150…50…200
  मूर्टी… 100…100…200
  सिद्धेश्‍वर निंबोडी…700..200..900
  पानसरे वाडी…150…50…200
  एकूण………………. 7 हजार 640.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.