तीन कारणांनी उडाला त्रिफळा

चौकाराच्या नादात आढळरावांनी गमावली विकेट : “मोदींना मतदान करा’चा प्रचार भोवला

राजगुरूनगर- सलग तीनवेळा शिवसेनेच्या तिकिटावर खासदार असलेल्या शिवाजीराव आढळराव यांचा त्रिफळा उडविण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या डॉ. अमोल कोल्हे यांना यश आले आहे. दरम्यान, खेड तालुका हा नेहमी खासदार आढळराव पाटील यांच्या मागे उभा राहिला मात्र, बैलगाडा बंदी, विमानतळ, आणि पुणे-नाशिक महामार्ग बाह्यवळण या तीन कारणांमुळे आढळराव पाटील यांना मतदान कमी झाल्याचे आज (गुरुवारी) लागलेल्या निकालाने स्पष्ट झाले.
शिरूर लोकसभा मतदारसंघात तीनवेळा खासदार असलेल्या आढळराव पाटील यांना अपयशाचा सामना करावा लागला. रखडलेले पुणे नाशिक महामार्ग बाह्यवळण, मतदार संघातून हद्दपार झालेले विमानतळ, बैलगाडा शर्यत बंदी या प्रलंबित प्रश्नामुळे त्यांना हे अपयश आल्याचे बोलले जात आहे. सलग तीनवेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा जनतेशी दांडगा संपर्क झाला होता. विकासकामाबरोबरच त्यांनी मतदार संघात जनतेशी जवळीक साधली होती. त्यामुळे त्यांना निवडून येण्याची मोठी खात्री होती. त्यांच्या समोर लढण्यासाठी अनेकांची नावे यावेळी चर्चेत होती; मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अचानक अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव चर्चेत आल्याने आढळरावांना कडवे आव्हान निर्माण झाले. मतदारसंघात त्यांनी जवळपास 25 दिवसांचा प्रचार त्यांना निवडून आणण्यात यशस्वी ठरला.

शिरूर मतदारसंघात जातीचे राजकारण झाल्याने आढळराव पाटील यांना फटका बसला आहे. सुरुवातीला माळी समाजाचे उमेदवार म्हणून हिणवल्याने त्याचा या निवडणुकीत मोठा परिणाम दिसून आला. संपूर्ण माळी समाजाचे मतदान डॉ. अमोल कोल्हे यांना झाल्याने आढळरावांना पराभव पत्करावा लागला. डॉ. अमोल कोल्हे हे संभाजी मालिकेमुळे बहुचर्चित होते. युवक आणि महिला वर्ग डॉ. कोल्हेंकडे आकर्षित झाला होता, त्याचे मतात रुपांतर झाले. यावेळी आढळराव पाटील यांना भाजप पक्षाची साथ मिळाली. युतीचा धर्म भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जरी निभावला असला तरी त्याचा फारसा प्रभाव झाला असे म्हणता येणार नाही. “मोदीं’ना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करा, असा प्रचार झाल्याने मतदारांमध्ये भाजपच्या या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण झाला होता.

  • त्यामुळे आढळरावांना झाला तोटा
    राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ठाम उभे राहिले. मनसेचा पाठिंबा मिळाल्याने डॉ. कोल्हे यांचे मतदारसंघातील पारडे जड झाले. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या बरोबरीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष वगळता इतर पक्षाचे नेते पदाधिकारी उभे होते ते यावेळी नसल्याने आढळराव पाटील यांना तोटा झाला. ही निवडणूक जनेतेने हातात घेतली होती नेत्यांच्या हातात नव्हती असेही बोलले जात आहे.
  • या घटकांमुळे डॉ. कोल्हेंचा विजय
    अभिनेते असल्याने महिला व युवकांची मते
    जातीचे राजकारण (माळी समाज मतदान)
    अठरापगड जाती, मुस्लीम, मागासवर्गीय, राष्ट्रवादी कॉंग्रेसव कॉंग्रेसचे मतदान
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.