पुणे,दि.5- तिहेरी तलाकचा पुण्यातील पहिला गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पतीने पत्नीला नोटीस पाठवून त्यामध्ये तीन वेळा तलाक तलाक तलाक असा उल्लेख केला होता.
याप्रकरणी मांजरी येथे रहाणाऱ्या एका 29 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानूसार जावेद नासीर शेख( रा.मुंढवा ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी महिलेचा जावेदबरोबर पाच वर्षापूर्वी विवाह झाला होता. तीने पती व सासरच्या लोकांविरुध्द कौटुंबिक हिसाचारा अंतर्गत हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. ती मागील दोन वर्षापासून मांजरी येथे माहेरी रहात आहे. दरम्यान 9 ऑक्टोबर रोजी जावेदने तिला नोटीस पाठवून ” मै जावेद नासीर शेख रिनाज जावेद शेख तुमको तलाक देता हू’असा तीन वेळा उच्चार करुन विवाह संपुष्टात आणला आहे. याप्रकरणी ऍवॉलिशन ऑफ ट्रीपल तलाक अंडर द मुस्लिम वुमन प्रोटेक्शन ऑफ राईट ऑन मॅरेज ऍक्ट 2019 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करत आहेत.