तिरंग्याचा राखला सन्मान

लोणीतील ग्रीन फौंडेशनच्या वतीने इतरत्र पडलेले झेंडे उचलले

लोणी काळभोर-26 जानेवारी रोजी असलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त वेगवेगळ्या आकारातील कागदी, प्लॅस्टिक व कापडाचे तिरंगी झेंडे वापरले जातात; परंतु नंतर ते कुठेही टाकून दिले जातात. अशा प्रकारे तिरंगा झेंड्याचा अवमान होऊ नये म्हणून येथील ग्रीन फौंडेशनच्या वतीने हे सर्व झेंडे गोळा करून त्यांचा सन्मान राखण्याचे बहुमोल काम करण्यात आले.
येथील ग्रीन फौंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कामी पुढाकार घेतला होता. या संदर्भात ग्रीन फौंडेशनने परिसरातील सर्व प्राथमिक शाळा, हायस्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांना एक लेखी निवेदन दिले होते. या निवेदनात राष्ट्रध्वजाचा मान कशा प्रकारे राखला जाऊ शकतो या संदर्भात माहिती दिली होती. 22 ते 27 जानेवारी दरम्यान ग्रीन फौंडेशनने या संदर्भात जनजागृती अभियान राबविले आहे. या कामी अमित जगताप यांच्या बरोबर किरण मगर, जयेश पवार, हुसेन गड्डे, निखिल महाजन आदी कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
या संदर्भात बोलताना ग्रीन फौंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप म्हणाले राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे हे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. या मोहिमेत कागदी व प्लॅस्टिकचे ध्वज (तिरंगा) उचलण्याचे कार्य ग्रीन फाउंडेशनने केले. गावातील शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणावरील पडलेले कागदी व प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज उचलण्यात आले. 26 जानेवारी व 15 ऑगस्ट या दिवशी लहान मुले, युवक – युवती मोठ्या उत्साहाने राष्ट्रध्वज घेऊन फिरतात व नकळत कुठेही ठेवतात. यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होतो. असे होऊ नये म्हणून ग्रीन फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रध्वज उचलून त्याचा सन्मान राखण्याचे काम केले आहे. या कामाबद्दल ग्रीन फौंडेशनचे कौतुक करण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)