लंडन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंग्लंड दौऱ्यात तिरंग्या ध्वजाच्या झालेल्या अवमाननेबद्दल ब्रिटनने माफी मागितली आहे. मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान काही कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती, भारतातील लैंगिक अत्याचारांच्या कथित घटनांच्या विरोधात लंडनमधील पार्लमेंट स्क्वाअर येथे काही कार्यकर्त्यांनी ही निदर्शने केली होती. त्यावेळी भारताने तिरंग्याच्या अवमाननेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर हा झेंडा बदलण्यात आला होता. झालेल्या एकूण प्रकाराबद्दल ब्रिटीश अधिकाऱ्यांनी माफी व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान काही गटांकडून निदर्शने होण्याची पूर्वसूचना ब्रिटीश प्रशासनाला दिली होती आणि त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते, असे या दौऱ्याशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
लोकांना शांततेने निदर्शने करण्याचा अधिकार आहे, मात्र पार्लमेंट स्क्वायर येथे काही लोकांनी केलेल्या कृत्यांमुळे आम्ही संतप्त आहोत आणि आम्हाला याची खबर लागताच आम्ही उच्चायुक्त यशवर्धन कुमार यांच्याशी संपर्क केला, असे ब्रिटनचे परराष्ट्र आणि राष्ट्रकुल कार्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.
सिख फेडरेशन यूके या संघटनेतील काही खालिस्तान समर्थक निदर्शक आणि पाकिस्तानी मूळ असलेले पीर लॉर्ड अहमद यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने झाली होती. तथाकथित ‘मायनॉरिटीज अगेन्स्ट मोदी’ नावाच्या या निदर्शनात सुमारे 500 जण जमा झाले होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा