तिकीट तपासणीसांसाठी अलिशान गाड्या?

संग्रहित छायाचित्र

पीएमपीकडून दोन स्विफ्ट गाड्यांची खरेदी


खरेदी करण्यात आलेल्या गाड्या नेमक्‍या कोणासाठी

पुणे – पीएमपीतील फुकट्या प्रवाशांची तपासणी करुन उत्पन्न मिळवून देणाऱ्या तिकीट तपासणीसांना (चेकर) पुरेशा गाड्या उपलब्ध नाहीत. यामुळे अनेकदा बसेस तपासणीवर मर्यादा येऊन वाहनाअभावी पीएमपीनेच प्रवास करुन बसेस तपासणी करावी लागते. या पार्श्‍वभूमीवर तपासणीसांसाठी जीप खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाकडून प्रस्तावित होता. मात्र, प्रशासनाकडून नुकत्याच दोन अलिशान स्विफ्ट गाड्या खरेदी करण्यात आल्या असून तिकीट तपासणीसांसाठी त्या वापरण्यात येणार आहेत का? असा सवाल जाणकरांकडून उपस्थित केला जात आहे.

शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य कणा असलेल्या पीएमपीचे उत्पन्न घटत चालले आहे. दिवसेंदिवस घटत चाललेल्या उत्पन्नामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएल) तोट्यात आहे. यात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढत असलेल्या इंधनदराचा मोठा फटका पीएमपीला बसत आहे. महिन्याला तब्बल 67 लाखांचा फटका पीएमपीला सहन करावा लागत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीएमपी ताफ्यातील वाहन तपासणीसांना (चेकर) शहरातील विविध ठिकाणी जाऊन बसेसची तपासणी करावी लागते. यासाठी त्यांना गाडीची आवश्‍यकता असते. मात्र, पीएमपीच्या ताफ्यात चेकर कर्मचाऱ्यांसाठी अवघ्या चार गाड्या असल्याने गाड्यांची कमतरता आहे. यामुळे अनेक चेकर पीएमपीनेच फिरुन बसेस तपासणी करतात. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चेकर कर्मचाऱ्यांसाठी जीप खरेदी करण्याचे ठरले होते. मात्र, प्रत्यक्षात जीप खरेदी न करता प्रशासनाने दोन स्विफ्ट गाड्या खरेदी केल्या आहेत. यामुळे तिकीट तपासणी करणाऱ्यांसाठी त्या खरेदी केल्या आहेत की, प्रशासनातील अधिकारी तसेच पदाधिकारी यांना वापरण्यासाठी या गाड्यांचा वापर होणार, असा प्रश्‍न जाणकरांकडून उपस्थित केला जात आहे. गव्हर्मेंट ई- मार्केट प्लेसवरुन गाड्यांची खरेदी करण्यात आली असून सुमारे साडेपाच लाखांची एक गाडी असल्याचे सांगण्यात येत आहे.

पैशांअभावी पगार उशीरा
तोट्यात असलेल्या पीएमपीला मार्गावर आणण्यासाठी प्रशासनाकडून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुुरु आहेत. मात्र, घटती प्रवासी संख्या, इंधनदरवाढ यामुळे पीएमपीचा पाय खोलात जात आहे. याचा फटका पीएमपी कर्मचाऱ्यांनाही बसत असून गेल्या महिन्यातील पगारही तीन ते चार दिवस उशीरा झाल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. गेल्या अनेक वर्षातून प्रथमच पगाराला उशीर झाल्याचे कर्मचारी सांगत आहे. यामुळे काही प्रमाणात पीएमपी तोट्यात असल्याने याचा फटका कर्मचाऱ्यांनाही सहन करावा लागत आहे.

तिकीट तपासणीसांची संख्या वाढवली
पीएमपीने फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असून तिकीट तपासणीसांची संख्या तुलनेने कमी आहे. सद्यस्थितीत तीन कर्मचाऱ्यांचे मिळून एकूण 16 पथके तिकीट तपासणीचे काम पाहतात. सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात 8 पथकांच्या माध्यमातून काम पाहिले जाते. मात्र, त्यांच्यासाठी अवघ्या चार गाड्या आहेत. अशातच गेल्या महिन्यापासून काही तिकीट तपासणीस वाढवण्यात आल्याचे प्रशानसाकडून सांगण्यात आले. यामुळे येत्या काळात चेकरची संख्या वाढल्याने गाड्याही जास्त लागणार आहेत.

पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या गाड्यांची आयुमर्यादा संपल्याने दोन गाड्या स्क्रॅप करण्यात आल्या. जुन्या गाड्या वापरण्यासाठी इंधनही जास्त लागते. या पार्श्‍वभूमीवर दोन नव्या गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. दरम्यान, तिकीट तपासणीसांसाठी जीप खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
-दत्तात्रय माने, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)