तांत्रिक अडचणी सोडवणे प्रशासनाचे काम

भोर- आजच्या सरकारची नीरा-देवघर धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्याची भूमिका असून त्यासाठीच प्राधिकरण निर्माण झाले आहे. तांत्रिक अडचणी सोडवणे हे प्रशासनाचे काम असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पुनर्वसन तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केले.
जनजागर प्रतिष्ठान पुणे, तर्फे देवघर येथे नीरा देवघर प्रकल्पग्रस्तांचा महामेळावा आयोजित केला होता, त्यावेळी नीरा-देवघर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना भंडारी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे राज्य समन्वयक माधव कुलकर्णी होते, तर सातारा जिल्हा समन्वयक देवराज देशमुख, पुणे जिल्हा समन्वयक संतोष दिघे, नीरा-देवघर धरणग्रस्त पुनर्वसन विकास शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे, “जनजागर’चे सचिव सुनील शिंदे, भोर तालुका भाजप युवाचे अमर बुदगुडे, नीरा-देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, ज्ञानोबा धामुणसे, प्रकाश साळेकर, अंकुश मळेकर, वारवंडचे सरपंच लक्ष्मण दिघे, दुर्गाडीचे भाऊ पोळ, हभप राजाराम किंद्रे, भाजपचे बाळासाहेब सांगळे, देवघरच्या सरपंच बायडाबाई कंक यांसह प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
यावेळी संतोष दिघे यांनी ऍवॉर्ड आणि संकलन रजिस्टरचा मेळ घालून गावनिहाय सर्व्हे करण्यात यावा, महसूल दप्तरी नोंदी असलेला एकही कागद प्रकल्पग्रस्तांना मागू नये, पुनर्वसनाची कोणतीही फाईल सात दिवसांपेक्षा जास्त काळ टेबलावर राहू नये, प्रकल्पग्रस्तांना कमी व्याजदराने रोजगारासाठी कर्ज मिळावे आणि समुह गटालाही याचा लाभ मिळावा अशा मागण्या केल्या असून त्या मान्य न झाल्यास आंदोलनचा इशारा दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)