तस्मै श्री गुरुवे नमः

पिंपळे-गुरव  – सांगवी, पिंपळे-गुरव परिसरातील मंदिर व शाळांमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्त परिसरातील देवतांच्या मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले.

गुरुपौर्णिमेनिमित्त सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी परिसरातील श्री महादेव, गजानन महाराज, स्वामी समर्थ, श्री दत्तात्रय, तुळजा भवानी आदी देवतांच्या मंदिरांमध्ये होम-हवन, भजन, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. गुरु प्रतिमा तसेच पादुकांचे पूजन करून भक्‍त व साधकांनी सद्‌गुरुंना वंदन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट करण्यात आली होती. कासारवाडी येथील श्री दत्त सेवा कुंज आश्रममध्ये रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली होती. येथे पहाटे “श्री’ ना महाअभिषेक करण्यात आला. सकाळी सामुदायिक होम-हवन झाले. त्यानंतर हभप सुप्रिया साठे यांचे कीर्तन झाले. दुपारी महाप्रसाद, सायंकाळी भजन, हरिपाठाचे आयोजित करण्यात आले. पिंपळे गुरव येथील गुरुदत्त नगर येथे श्री गुरुदत्त सेवा प्रतिष्ठानतर्फे गुरु दत्त मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या ठिकाणी सायंकाळी नगरसेवक शशिकांत कदम, माजी नगरसेवक शंकर जगताप, स्वीकृत सदस्य महेश जगताप आदींच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

नवी सांगवी येथील साई चौकातील साई मंदिर येथे ओम साई ट्रस्ट व नगरसेवक नवनाथ जगताप मित्र परिवार तर्फे भाविकांसाठी मंडप उभारणी करून दर्शन रांगेची व्यवस्था केली होती. येथे पहाटे श्री साईंची काकड आरती झाली. सकाळी होम-हवन, दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी महाआरती व साई गीतांचा कार्यक्रम झाला. सांगवी येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात डॉ. गजानन खासनीस प्रस्तूत श्री गजानन विजय ग्रंथाचे अखंड पारायण व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)