तस्मै श्री गुरवे नमः (गुरुपौर्णिमा विशेष)

पराशर व सत्यवती यांच्या पोटी जन्माला आलेल्या महर्षि व्यासांचा जन्मदिवस आषाढ पौर्णिमा “गुरुपौर्णिमा’ म्हणून साजरी होतो. जे तुम्ही निसर्गातून घेता त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस गुरुपौर्णिमा.

आषाढमेघांनी ग्रासलेला महिना आकाश ढगाळ पाऊसाच्या चैतन्यमय सरी अशावेळेस आकाशात चंद्र बघायला मिळेल हे दुर्मिळ आणि चंद्राच्या शितल किरणाशिवाय पौर्णिमेचे महत्त्व काय, मग इथे गुरुंना चंद्र मानून शिष्यांना ढगांचे स्वरुप देवून पौर्णिमेचे महत्त्व न कळत दर्शविण्याचा प्रघात असावा. शिष्यांच्या सहवासात प्रकाशमय चंद्र न कळत मनात जागृती निर्माण करण्याचे काम करतो. अशा प्रतिमा मानून आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणून संबोधिले गेले असावे.

अज्ञान व ज्ञान यांचा समन्वय घडविणारा तो गुरु, आपल्या आयुष्याला अंधारातून प्रकाशाकडे मार्गक्रमण करायला शिकविणारा “गुरु’ सजीव असो वा निर्जीव, प्रत्येक टप्प्यावर छोटया कृतीतून आपल्या ज्ञानात भर घालणारी प्रत्येक गोष्ट गुरुमुळेच घडते. अगदी चालताना रस्त्यावर ठेच लावणारा दगड यापासून आपण न कळत काही तरी शिकतोच.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुरुपौर्णिमा गुरुप्रती असलेली श्रध्दा व त्याग यांचे द्योतक प्रत्येक क्षेत्रात आपले योगदान देणाऱ्या गुरुंचा सन्मान करणे मग त्यात साहित्य, संगीत, चित्रकला या आणि अशा अनेक क्षेत्रातील लोकांचा सन्मान करण्याचा दिवस “गुरुपौर्णिमा’ भगवान श्रीराम देवअवतार असूनही गुरु अंकित होते. चांगले संस्कार देणारा प्रकाशाची वाट दाखवणारा “गुरु’ तर सत्याची कास धरायला लावणारा तो “सद्‌गुरु’ अगदी संत एकनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींना “श्रीगुरु’ म्हणून संबोधिले आहे. “गुरु’ सगळया जगाचा उध्दार करणारा “जगद्‌गुरु’ म्हणून संबोधिले जातात. श्रीकृष्ण, आद्य शंकराचार्य हे जगद्‌गुरु आणि संत तुकाराम महाराजांनाही जगद्‌गुरुची उपाधी लागू पडते, जे जगाच्या कल्याणासाठी झटले ते जगदगुरु.

अंधकाराचा नाश करुन प्रकाशाची वाट दाखविणारा “गुरु’ सत्याची कास धरायला लावणारा “सद्‌गुरु’ तर सद्‌वस्तूंची ओळख करुन देणारा सद्‌गुरुपेक्षाही मोठा “श्रीगुरु’ आणि जगाच्या कल्याणासाठी झटणारा जगद्‌गुरु, अशी गुरुंची विभागणी केली तरी मर्म एकच अज्ञान व ज्ञान यांचा सन्मवय साधणारा मार्गदर्शक त्याचे पूजन करण्याचा दिवस म्हणजे “गुरुपौर्णिमा’

“गुरु’ मानवी आयुष्यातील सगळया नात्यांचा सूत्रधारच म्हणूयात कारण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तो एक मार्गदर्शक म्हणून कधी आपल्यापुढे, कधी मागे तर कधी शेजारी उभा असतो. कधी आई-वडील तर कधी भाऊ-बहिण, कधी मित्र तर कधी आप्तस्वकीय यांच्या रुपाने आनंद पसरवत राहतो आणि अशा सत्व रज तम या त्रिगुणाच्या पलीकडे विस्तारलेल्या अशा गुरुंचे स्मरण करण्याचा दिवस “गुरुपौर्णिमा’.

कालखंडानुसार गुरु संकल्पना कधी न बदलणारी शाश्वलतच. जगण्याचे संदर्भ बदलले तरी त्याचे प्रगटीकरण करण्यास खऱ्या अर्थाने मार्गदर्शकाचीच गरज लागते. मग तो वस्तूच्या रुपात, व्यक्तीच्या रुपात असो, ज्ञानदानाचे काम करतो. गुरु म्हणजे आत्मा, अज्ञानाकडून ज्ञानापर्यंत पोहचिवणारा, निसर्ग आणि चराचरातील प्रत्येक वस्तू, गोष्टी, व्यक्ती गुरुंची भूमिका बजावून समृध्द करतात. डिजीटलायझेशनच्या जमान्यातील मोबाईल, संगणक त्यातील विविध प्रणाली जसे “काय चाललय?’, “चेहरा पुस्तिका’ आपल्या माध्यमातून ज्ञानदानाचेच काम करताना दिसतात. चांगल्या दृष्टीकोनातून पाहिले तर हे आधुनिक

“ई-गुरु’च नव्याचे स्वागत करताना आपल्या परंपरांचा विसर आपल्याला पडत नाही. ते दिवस आपण अजूनही लक्षात ठेवतो हेही नसे थोडके, गुरुंची बदलती भूमिका आपल्याला आपल्या मुळांशी घटृ रोवून ठेवण्यास मदत करते. जुन्यातून नवनिर्मिती हे संदर्भ अंमलात आणण्यासाठी उपयुक्तण ठरणारे आधुनिक ई-गुरु च या गुरुपौर्णिमेचे महत्त्व व्यापक करतांना “गुरु, सद्‌गुरु, श्रीगुरु, जगद्‌गुरु’ ते आताचे ‘ई-गुरु’ असा उल्लेख केला तर वावगे ठरणार नाही. शेवटी मुळ आधार भावना त्याच गुरुप्रती नेऊन ठेवतात जो आत्म्याचा प्रकाश दाखवतो अशा सर्व गुरुरुपी जाणिवांचे, व्यक्तींचे पूजन करुन “गुरुपौर्णिमा’ साजरी करुयात. जसे अर्धवट पिकलेली फळे गोड लागत नाहीत, तसेच ज्ञानासाठी गुरुंची आवश्यकता, महत्त्व आहेच, अशी जाणिव कृतज्ञता व्यक्त करु या, या गुरुचरणी नतमस्तक होऊयात.

“।। तस्मै श्री गुरवे नमः।।”

– मधुर धायगुडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)