..तर 51 मार्गांवरील फेऱ्या होणार बाधित

पीएमपीएमएलला बसणार फटका : मेट्रो धान्य गोदाम मार्गिका काम

पुणे – पुणे मेट्रोच्या वनाझ ते शिवाजीनगर धान्य गोदाम मार्गाचे काम पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर येत्या आठवड्यात सुरू होणार आहे. या कामामुळे “पीएमपीएमएल’चे 51 मार्गांवरील फेऱ्या बाधित होणार असून, पर्यायाने आर्थिक फटका बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मेट्रोच्या कामासाठी रस्त्याचा बराचसा भाग अडथळ्यांनी बंद करण्यात आल्यानंतर बस वळवण्यासाठी आणि शहरातील अन्य वाहतुकीला याचा फटका बसणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) वनाझ ते शिवाजीनगर दरम्यानचे काम पौड रस्ता, कर्वे रस्त्यापासून सुरू केले होते. तसेच, नदीपात्रातही मेट्रोच्या कामाला गती मिळाली होती. आता नदीपात्रातून धान्य गोदामाकडील मुख्य रस्त्यावरील कामाला सुरुवात करण्याचे नियोजन “महामेट्रो’ने केले आहे.

कॉंग्रेस भवन ते धान्य गोदामापर्यंतच्या कामासाठी “ना हरकत प्रमाणपत्र’ देण्याची विनंती “महामेट्रो’ने यापूर्वीच वाहतूक पोलिसांकडे केली होती. गणेशोत्सवामुळे शहरात होणारी गर्दी लक्षात घेता, पोलिसांनी उत्सवानंतरच हे काम सुरू करता येईल, असे कळविले होते. उत्सवाची सांगता झाल्याने आता हे काम सुरू करण्याची तयारी “महामेट्रो’ने केली आहे. येत्या आठवड्यात या कामाला सुरुवात करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

मेट्रोची मार्गिका नदीपात्रातून कॉंग्रेस भवनजवळ मुख्य मार्गावर येते. या ठिकाणी मेट्रोचे खांब रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकाच्या जागेतच उभे केले जाणार आहेत. त्यासाठी पौड रस्ता, कर्वे रस्त्याप्रमाणे या ठिकाणी नऊ मीटर जागेत बॅरिकेडिंग केले जाणार आहे. या बॅरिकेडिंगमुळे रस्त्याची रुंदी कमी होणार असून, महापालिका शहरातील प्रमुख बसस्थानकांपैकी एक असून या ठिकाणी बहुतांश भागात जाणाऱ्या पीएमपीएमएलच्या बसेसची ये-जा असते. याशिवाय रात्रीच्या वेळी येथे रस्त्यावरच मोठ्या संख्येने बसेस पार्क केल्या जातात. त्यामुळे आधीच बसमुळे निम्मा रस्ता अडलेला असतो, त्यातून मेट्रोचे खांब उभारण्यासाठी केलेले बॅरीकेडींग आणखी उरलेला निम्मा रस्ता ब्लॉक करणार हे निश्‍चित आहे. या प्रश्‍नामुळे जर पीएमपीएमएलच्या याठिकाणाहून निघणाऱ्या बसेसचे थांबे दुसरीकडे हलवल्यास प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

पर्यायी जागेचा शोध
कुणाल कुमार महापालिकेचे आयुक्त असताना त्यांच्यासमवेत काही महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये महापालिका भवन येथील पीएमपीचे स्थानक तात्पुरत्या काळासाठी शिवाजीनगर धान्य गोदाम येथे स्थलांतरित करण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली होती. महापालिकेसमोर मेट्रोचे काम सुरू होण्यापूर्वी हे स्थानक स्थलांतरित केले जाईल, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत होती. धान्य गोदामाच्या जागेतील सर्व गोडाऊनचा ताबा अद्याप महामेट्रोला मिळालेला नाही. तर, कामगार पुतळ्याच्या बाजूला महामेट्रोने कार्यालय सुरू केले आहे. त्यामुळे या ठिकाणी पीएमपी स्थानकासाठी जागा कशी उपलब्ध होणार, हा प्रश्‍न देखील यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)