….तर “मुळा कालवा’च्या पुनरावृत्तीची भिती

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराचा एक दिवसाचा पाणी साठा करणाऱ्या बिट्रीशकालीन रावेत बंधाऱ्याची आयुमर्यादा संपली आहे. या जीर्ण बंधाऱ्यातून दररोज सुमारे पाच कोटी लिटर पाणी पाझरते. बंधारा फुटून मोठी हानी होण्याचा धोका आहे. या बंधाऱ्याशेजारी नवीन बंधारा बांधण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, गेली अनेक वर्षे केवळ “कागदोपत्री घोडे’ नाचवले जात असल्याने मुळा कालव्याची पिंपरी-चिंचवडमध्ये पुनरावृत्ती होण्याची भिती व्यक्त होत आहे.

पुण्यातील जनता वसाहतजवळून जाणारा मुठा कालवा गुरूवारी दुपारी फुटला. यामुळे शेकडो संसार पाण्यात गेले आहेत. या कालव्याच्या दुरावस्थेबाबत यापूर्वी अनेकदा आवाज उठवूनही शासकीय यंत्रणांचे त्याकडे दुर्लक्ष झाले. त्याची मोठी किंमत पुुणेकरांना मोजावी लागली आहे. या घटनेनंतर पिंपरी-चिंचवडमधील रावेत बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणी पुरवठा केला जातो. सद्य स्थितीमध्ये 490 एम. एल. डी पाणी पिंपरी-चिंचवड महापालिका रावेत बंधाऱ्यातून उचलते. हा बंधारा शंभर वर्षापूर्वीचा असल्याने त्याची आयुमर्यादा संपली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या बंधाऱ्या लगत नव्याने बंधारा बांधण्याच्या संदर्भात महापालिकेने 2013 साली जलसंपदा विभागाकडे परवानगी मागितली होती. परंतु, आजतागायत हा प्रश्‍न लोंबकळत पडला होता. बंधाऱ्याचे “स्ट्रक्‍चर ऑडीट’ करण्याची मागणी देखील वेळोवेळी झाली. मात्र, महापालिका अथवा पाटबंधारे खात्याकडून याबाबत कोणत्याही हलचाली झाल्या नाहीत. दरम्यान, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी जलसंपदा मंत्री विजयकुमार शिवतरे यांच्यासमवेत बैठक घेतली होती. त्यावेळी शिवणे व उर्से येथे बंधारा बांधण्यास जलसंपदा मंत्र्यांनी “हिरवा कंदील’ दाखवला. मात्र, त्यापुढील कार्यवाहीसाठी महापालिका थंड पडली.

स्थैर्यता, भूगर्भ तपासणी रखडली
बंधारा ब्रिटीशकालीन असल्याने त्याची स्थैर्यता तपासण्याचा निर्णयही दरम्यानच्या काळात घेण्यात आला होता. तातडीने भूगर्भ तपासणी केली जाणार होती. मात्र, महापालिकेने पुढे काहीही हलचाली केल्या नाहीत. रावेत बंधाऱ्याची दुरुस्ती करून उंची वाढविण्यासाठी अथवा नवीन बंधारा बांधण्यासाठी आवश्‍यक असलेले सर्वेक्षण करण्यात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून दिरंगाई होत असल्याने बंधारा अधिकाधिक धोकादायक होत चालला आहे.

बिट्रीशकालीन रावेत बंधाऱ्याची आयुमर्यादा संपली आहे. जलसंपदामंत्री विजयकुमार शिवतरे यांच्याकडे बैठक घेत रावेत बंधाऱ्यापासून 15 मीटरवर बंधारा बांधण्यासंदर्भात चर्चा झाली होती. शिवणे व उर्से येथे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला मंजुरी मिळाली आहे. मात्र, महापालिकेचे अधिकारी तात्पुरते कागदी घोडे नाचवतात. त्यांचा पाठपुरावा कमी पडतो. बंधाऱ्यात शहराला एका दिवस पुरेल एवढा साठा असतो. मात्र, शहर वाऱ्यावर सोडल्यासारखे काम महापालिकेतील अधिकारी करत आहेत. महापालिका व पाटबंधारे विभागाने समन्वय साधून हा प्रश्‍न मार्गी लावायला हवा.
– श्रीरंग बारणे, खासदार, शिवसेना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)