…तर पेट्रोल-डिझेल, दूध-भाज्याही फुकट द्या!

उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला : शिवसेना केबलचालकांच्या पाठिशी
मुंबई – राज्यातील केबल चालकांच्या पाठिशी शिवसेना खंबीरपणे उभी असून केबलचालकांच्या व्यवसायाला कुठलाच धक्‍का पोहोचू देणार नाही. डिजिटल इंडियात सध्या केबल फुकट मिळत आहे. मग पेट्रोल-डिझेल, दूध-भाज्या सगळेच फुकट द्या. डिजिटल इंडियात जर फुकट मिळत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याकडून शिकले पाहिजे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

रंगशारदा सभागृहात केबलसेनेच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. केबल व्यवसायात जिओ केबल नेटवर्कने प्रवेश केल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून केबल व्यवसाय करणा-या व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मी केबलवाल्यांना बळ द्यायला आलो असल्याचे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, बदलत्या जमान्यासोबत तंत्रज्ञान बदलले. गेल्या काही दिवसांत आलेल्या बातम्यांमुळे केबलचालकांमध्ये अस्वस्थता आहे. पुर्वी आमच्या कॉलनीत एकाच घरात टीव्ही होता. आता सगळीकडे टीव्ही आहे. तुम्ही तीस वर्षे राबून हा व्यवसाय उभा केला आहे. मी तुमचा व्यवसाय जाऊ देणार नाही. मागच्या वेळेस सेटटॉप बॉक्‍स आले. तेव्हा देखील भाजपाचे सरकार होते. पण बाळासाहेब मात्र केबलचालकांच्या पाठिशी ठाम उभे होते.

जिओ केबल नेटवर्कने सध्या केबलचालकांची झोप उडविली असून काही महिने ही सेवा फुकट देणार आहे. मात्र यामुळे केबल ऑपरेटर आणि डिस्ट्रिब्युटर यांच्या पोटावर पाय येणार आहे. मात्र केबल चालकांच्या व्यवसायाला कुठलाही धक्‍का पोहोचू देणार नाही, अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली. माझ्या लोकांना उद्‌ध्वस्त करून मार्केटमध्ये उतरू नका. लढा देण्याची आमची तयारी आहे. पण आमचे मत आहे की या लोकांशी करार करा, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

रोजी-रोटी डाउनलोड होत नाही!
देशात सगळीकडे डिजिटल इंडियाचा नारा दिला जातोय. पण डिजिटल इंडिया कसला करताय, असा सवाल करतानाच डिजिटल इंडियाने रोजी-रोटी काही डाउनलोड करता येत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. जिओ सर्व फुकटात देणार असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याकडून काही शिकून घ्यावे, असा टोला लगावतानाच डिजिटल इंडियात केबल फुकट मिळत असेल तर पेट्रोल-डिझेल, दूध भाज्या सगळेच मोफत द्या, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)