…तर पाण्यासाठी प्रसंगी न्यायालयात जाऊ

बारामती, इंदापूर तालुक्‍यातील विविध संस्था, नागरिक संतप्त

पुणे – नीरा देवधर प्रकल्पातील कालव्याचे पाणी बारामती आणि इंदापूर तालुक्‍यासाठी बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप होत असताना आता या तालुक्‍यांमधील नागरिकांमधूनही संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी आणि संस्थांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असतानाच नीरा देवघर प्रकल्पातून इंदापूर, बारामती तालुक्‍यातील गावांना होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला. परिणामी, दोन्ही तालुक्‍यांतील स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त करत पाणी तत्काळ देण्याची मागणी केली आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे हा निर्णय घेतला गेल्याचेदेखील आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान, इंदापूरला नीरा डाव्या कालव्यातून चार टीएमसी अतिरीक्त पाणी द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच बारामती, इंदापूरचे बंद केलेले पाणी सुरू करावे, अन्यथा जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारादेखील अनेक सेवाभावी संघटना, स्थानिक संस्था, मंडळांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.