… तर पद्मभूषण पुरस्कार परत करणार

अण्णा हजारे यांचा इशारा : जलसंपदामंत्री महाजनांची शिष्टाई निष्फळ

पारनेर – लोकपाल, लोकायुक्त नियुक्त करा, तसेच शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करा, या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीत सुरू केलेल्या उपोषणाच्या पाचवा दिवशी रास्ता रोको आंदोलनासह सत्ताधारी व विरोधकांनी हजारेंची भेट घेवून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. दरम्यान सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणार असेल तर येत्या 7 ते 8 फेब्रुवारी रोजी पद्मभूषण पुरस्कार राष्ट्रपतींना परत करण्याचा इशारा हजारे यांनी दिला आहे. दरम्यान रविवारी दुपारी जलसंपदामंत्री गिरिश महाजन यांनी अण्णांची भेट घेतली. या मागण्यांची सरकारने दखल घेतली असून, त्या लवकरच पूर्ण करण्यात येतील, अधिवेशन झाल्यानंतर लोकायुक्‍त नियुक्‍तीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आंदोलनाच्या आजच्या पाचव्या दिवशी राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाम मलिक यांच्या वक्‍तव्याचा निषेध करून त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच अण्णांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ग्रामस्थांसह तालुक्‍यातील अनेक मान्यावरांनी नगर-पुणे महामार्गावरील सुपे येथे, नगर-कल्याण रस्त्यावरील भाळवणी येथे रास्तारोको आंदोलने केली. जिल्ह्यातही विविध ठिकाणी आण्णांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी अनेकांनी राळेगणसिद्धीला जाऊन अण्णांची भेट घेतली. सकाळी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी अण्णांची भेट घेवून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
दुपारी अडीचनंतर जलसंपदामंत्री महाजन हे अण्णांच्या भेटीला आले. यावेळी अण्णांच्या बहुतेक मागण्या अर्थसंकल्पाच्या रुपाने मान्य झाल्या आहेत. कामगारांना पेन्शन, शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक मदत देण्याचे नियोजन अर्थसंकल्पात केले आहे. त्यामुळे काही मागण्या मान्य झाल्यात जमा आहेत. उर्वरित काही मागण्यांसाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे ना. महाजन यांनी अण्णांना सांगितले. मात्र यावर अण्णांनी अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही.

महाजन म्हणाले, अण्णांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं करून दिलं आहे. त्यांनीही अण्णांच्या बऱ्याचशा मागण्या मान्य असल्याचे यावेळी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांचे पत्र घेऊन उद्या मी पुन्हा येणार आहे. उद्या अण्णा उपोषण सोडतील, असा प्रयत्न आहे. मसुद्यासंदर्भात संयुक्त समिती स्थापन करणार असून, अण्णांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने केलाय, तसाच कायदा आम्ही राज्यात केला आहे. आमचं केंद्राशी बोलणं सुरू असून, केंद्र सरकारचं एक पत्र उद्या अण्णांना देणार आहे. लोकपाल नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचा दावाही त्यांनी केला. ना. महाजन यांच्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अण्णांची भेट घेवून चर्चा केली. उद्या सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे राळेगणसिद्धीमध्ये येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच रात्री उशीरा ग्रामसभा सुरू होती.

अण्णांच्या भेटीत विखेंचा भाजप-सेनेला टोला
अण्णांचे बरेच प्रश्‍न केंद्र सरकारशी निगडीत आहेत. त्यामुळे आपण लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा करणार आहे. लोकपालबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. शेतकऱ्यांना फक्त सहा हजार रुपये देऊन त्यांचा प्रश्‍न सुटणार नाही. आंदोलनास कॉंग्रेस पक्षाचा पाठिंबा असून, यापुढील आंदोलनासाठी तुमची तब्येत, चांगली राहिली पाहिजे, अशी विनंती अण्णांना केल्याचे यावेळी ना. विखे यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकाविषयी विचारले असता ते म्हणाले, भाजप-शिवसेना हे पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याकडे कुठलेही पुरावे नसताना खोटे व बदनामीकारक वक्तव्य त्यांनी केले. फक्त राजकीय फायदा डोळ्यांसमोर ठेवून जाणीवपूर्वक त्यांनी आपली बदनामी केली, असे अण्णांनी सांगितले. त्यांचे वकील अॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांच्यावतीने मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मलिक यांनी जाहीर लेखी माफी मागावी व तसा खुलासा करावा, तसे न केल्यास फौजदारी व दिवाणी स्वरूपाचे खटले व दावे मलिक यांच्या विरोधात दाखल करावे लागतील, असा इशारा या नोटिशीद्वारे देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.