…तर ते महापालिकेचेही खासगीकरण करतील!

पिंपरी – महापालिकेतील सत्ताधारी भाजपने विविध प्रकल्पांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. सत्ताधारी उद्या महापालिका खासगी संस्थेस भाडेत्त्वावर चालविण्यास देण्याची निविदा काढतील, अशी उपरोधिक टीका शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर यांनी केली आहे. रुग्णालयाच्या खासगीकरणाचा विषय मागे घ्या. अन्यथा शिवसेनेच्या स्टाईलने विरोध करु, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात बाबर यांनी म्हटले आहे की, भोसरीतील रुग्णालय खासगी संस्थेस चालविण्यास देणे, संतपीठासाठी खासगी कंपनी बनविणे, स्मार्ट सिटी कंपनी आणि त्यातील खासगी कंपन्यांना कंत्राटे असतील, कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प खासगी कंपनीला उभारण्यास आणि चालविण्यास देणे असेल, कचरा उचलण्याचे कंत्राट दोनच खासगी कंपन्याना विभागून देणे असे स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व महत्त्वाच्या सेवांचे खासगीकरण करण्याचा घाट सत्ताधारी भाजपने घातला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भोसरीतील रुग्णालयाच्या खासगीकरणामागे सत्ताधारी पक्षाचे आमदार यांचे पडद्यामागचे सूत्रधार त्यांचे ब्रेन असलेली मंडळी आहेत. हे सर्वश्रुत आहे. या खासगी कंपन्यांना कोट्यवधी रुपयांची कंत्राटे देऊन त्यात छुप्या पद्धतीने हिस्सेदारी घेतली जात आहे. खासगी कंपन्याशी हे सर्व करार लांब मुदतीचे आहेत. म्हणजे सत्ता असो व नसो पुढील 10 ते 20 वर्षे महापालिकेच्या माध्यमांतून कोट्यवधी रुपयांच्या कमाईची व्यवस्था या हुशार चाणक्‍यांनी करुन ठेवली आहे.

सर्वसाधारण सभेमध्ये अवघ्या दहा मिनिटांमध्ये कुठलीही चर्चा न करता रुग्णालयाच्या खासगीकरणाचा विषय सत्ताधारी भाजपाने बहुमताच्या जोरावर पारित केला. सर्वसामान्य गोरगरीब जनतेला चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा मोफत किंवा माफक दरात देणे ही महापालिकेची मूलभूत जबाबदारी आहे. महापालिकेचा खर्चाकडे न बघता, चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा पुरविणे हे महापालिकेचे उद्दीष्ट असायला हवे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)