…तर आमदारांनी राजीनामा द्यावा!

पिंपरी – भाजप व सहयोगी आमदारांना शहराच्या विकासाची एवढी चिंता वाटत असेल, तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन, महापालिकेत महापौर व स्थायी समिती अध्यक्षपद मिळवून महापालिकेचा कारभार बघावा, अशी उपरोधिक टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांचा नामोल्लेख टाळत केली.

साने म्हणाले की, सत्ताधारी भाजपचे 77 नगरसेवक निवडून आल्यानंतरही त्यांच्या कार्यपद्धतीवर या दोन्ही आमदारांचा तिळमात्र विश्‍वास नाही. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात कर्तृत्व दाखविण्याऐवजी हे दोन्ही आमदार महापालिकेत येऊन अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. या दोन्ही आमदारांबरोबरच शिवसेनेचा आणखी एक आमदार आणि खासदारांनी देखील महापालिकेत लक्ष देणे थांबवावे. शहराचा एवढाच कळवळा असेल, तर द्यावा त्यांनी पदाचा खुशाल राजीनामा आणि बसावे महापालिकेत, असा पुनरुच्चार देखील केला. तसेच सत्ताधाऱ्यांच्या या भ्रष्टाचाराला नागपूरवरून आयात केलेले आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा देखील पाठिंबा आहे. त्यामुळे सत्ताधारी व आयुक्त हर्डीकर हे सर्व जण दरोडेखोरांची टोळी असल्याची टीका केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विविध विकास कामांच्या निविदेत झालेल्या “रिंग’ची दखल घेत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 360 निविदा रद्द केल्या आहेत. याचा दाखला देत साने म्हणाले की, बोऱ्हाडेवाडीतील भ्रष्टाचारावर होत असलेली टीका व विरोधकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच दोन लाख ते सुमारे एक कोटीपर्यंत खर्चाच्या निविदा आयुक्तांनी रद्द केल्या आहेत. या सर्व ठेकेदारांनी “रिंग’ केल्याने, त्यांना काळ्या यादीत टाकावे, अन्यथा या ठेकेदारांना आयुक्तांचे समर्थन असल्याचा अर्थ निघेल, असे ते म्हणाले. या सर्व निविदांची चौकशी करण्याची मागणी दत्ता साने व शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी देखील आयुक्तांकडे केली आहे.

शहरात बांधकामाचा दर 1200 ते 1500 रुपये इतका आहे. तर “लॅविश’ बांधकामासाठी कमाल 2000 रुपये दर असताना, शहराच्या बोऱ्हाडेवाडीतील प्रस्तावित पंतप्रधान आवास योजनेच्या गृहप्रकल्पाला 2900 रुपये दर ठरविण्यात आला आहे. मात्र, या प्रकल्पात लाभार्थ्यांकडून पार्कींग शूल्क आकारण्यात आल्याचे धक्कादायक समर्थन सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले आहे. शासकीय नियमानुसार कोणत्याही गृहप्रकल्पात पार्कींग शूल्क आकारता येत नाही. त्यामुळे पवार यांचे या भ्रष्टाचाराला असलेले समर्थन संशय निर्माण करणारे आहे. त्यामुळेच ते असे बेताल वक्तव्य करत आहेत.
– दत्ता साने, विरोधी पक्षनेते, पिंपरी-चिंचवड महापालिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)